दगडी भिंत : अंध, बधिर हेलन केलरच्या जिद्दीची कहाणी

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी श्रीकला संस्कार न्यास, डोंबिवली या संस्थेने ‘दगडी भिंत’ हे नाटक सादर केले.

दगडी भिंत नाटकाची कथा प्रसिद्ध अमेरिकन लेखिका हेलन केलर (१८८०-१९६८) यांच्यावर बेतलेली आहे. त्या लेखिका, कार्यकर्त्या आणि व्याख्यात्या होत्या. त्यांनी १९ महिन्यांच्या वयातच आजारपणामुळे दृष्टी आणि श्रवणशक्ती गमावली. ॲन सुलिव्हन यांच्या मदतीने त्या अंध-बधिर असूनही बोलणे, वाचणे आणि लिहिणे शिकल्या. पदवी मिळवणारी ती पहिली अंध-बधिर व्यक्ती होती. त्यांनी दिव्यांग हक्कांसाठी संघर्ष केला. तिच्या संघर्षाची कथा लोकांसमोर यावी व आशावाद जागृत व्हावा, हा दिग्दर्शकाचा मानस दिसतो.

नाटकाचा पडदा वर जाताच हेलन केलर घराबाहेरील दगडी भिंतीचा अंदाज घेत उभी असते. तिची शिक्षिका अॅना सॅलिव्हन ही तिला घरात सावकाशपणे घेऊन येते, हेलन केलर ही दिव्यांग मुलगी आहे. अॅनाच्या प्रयत्नाने तीन-चार वर्षांपासून ती थोडे शब्द बोलायला लागली आहे.

हेलन एका आजारामुळे (मॅनेंजायटीस) अंध आणि बहिरी झालेली असते. मुळात हेलन खूप हुशार मुलगी असते. स्वीडन व्होक यांचा प्रभाव तिच्यावर असतो आणि विश्वशांतीचा ध्यास हेलनने घेतलेला आहे.
एकदा प्रिन्स नावाचा एक तरुण पत्रकार हेलनची मुलाखत घेण्यासाठी येतो, अनेक वेगवेगळे प्रश्न तो हेलन यांना विचारतो. अॅना तिच्या शिक्षिकेच्या मदतीने व पॉली थॉम्प्सन या तिच्या मदतनिसाच्या मदतीने त्याला उत्तरे देते. अॅना आणि हेलन या एकमेकींचे प्रतिबिंब असल्यासारख्याच असतात. सुमारे वीस वर्षे त्या दोघी एकत्र राहत असतात. हेलनला अंधांसाठीची ब्रेल लिपी व बोटांची सांकेतिक भाषा अॅना या शिक्षिकेनेच शिकवल्या असतात. प्रिन्स तिला विचारतो, ”तुम्ही कुणा कुणावर प्रेम करता?” त्यावर हेलन सांगते, ”मी माझ्या लाडक्या कुत्र्यावर, दीनदुबळ्या जनतेवर, माझ्या शिक्षिकांवर, मला पत्र लिहिणाऱ्या जनतेवर आणि येशूंवर.” प्रिन्स अॅनाला म्हणतो, ”तुम्ही हेलन किलरला तुमच्याच प्रभावाखाली ठेवलंय.” त्यावर अॅनाला राग येतो व ती त्याला जायला सांगते.

अॅनाचा नवरा मॅसी एकदा घरी येतो. त्यावेळी तो अॅनाला सांगतो की, ”तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन अनिवार्य झालं आहे. नाहीतर डोळा कायमचा निकामी होईल.” मात्र अॅना सांगते, ”जसं आत्म्याला शरीरापासून दूर करता येत नाही, तसं मला व हेलनला दूर करता येणार नाही. तूसुद्धा मला लग्नाआधी कबूल केलं होतंस की, तू मला व हेलनला दूर करणार नाहीस.”

मॅसी अॅनाला सांगतो, ”मी एका मुलाला काही दिवसांसाठी हेलनची काळजी घेण्यासाठी नेमावा असं ठरविलं आहे. तो तरुण असून त्याला अंधांसाठीची ब्रेल लिपी व बोटांची सांकेतिक भाषा येते. तसंच त्याची आईही अंध असल्याने अशा माणसांना कसं सांभाळावयाचं, याची त्याला सवय आहे. तेव्हा आता तू तुझ्या डोळ्यांच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट हो. फक्त थोडे दिवसांचाच प्रश्न आहे.”

तेवढ्यात प्रिन्स येतो. त्याला पाहताच अॅना म्हणते, ”तू पुन्हा कशासाठी आला आहेस.” त्यावर मॅसी म्हणतो, ”मीच त्याला बोलावून घेतलं आहे. मी जो म्हणत होतो तो मुलगा हाच आहे.”

मॅसी डोळ्यांच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याअगोदर प्रिन्सला एक डायरी देते. त्यात हेलन केलरसंबंधी सर्व सूचना व माहिती लिहिलेली असते. ”त्यानुसार तू वाग. तसंच तूसुद्धा ही डायरी पुढे लिहीत जा आणि कोणत्याही परिस्थितीत हेलनला कुठेही बाहेरगावी नेऊ नको.”

अॅना जाणार म्हणून हेलन खूप अस्वस्थ असते. पण अॅनाच्या डोळ्यांचा प्रश्न असल्याने ती मान्य करते. हेलनची काळजी घेण्यासाठी पॉली थॉम्प्सन व प्रिन्स असतात. त्यामुळे अॅना हॉस्पिटलला जाते.

अॅनाच्या गैरहजेरीत प्रिन्स व पॉली हेलनची खूप काळजी घेतात. विशेतः प्रिन्स जास्तच काळजी घेतो. तो काही वेळा दिवे घालवून कामे करण्याचा प्रयत्न करतो. पॉली विचारते, ”तू हे काय करतो आहेस?” त्यावर प्रिन्स म्हणतो, ”हेलनसारखं जगू पाहतोय. तिला येणाऱ्या अडचणी समजून घेऊन तिच्या बरोबर मला जगायचं आहे.” पॉलीच्या हे लक्षात येते की, प्रिन्स हेलनच्या प्रेमात पडला आहे. ती त्याला सांगते, ”तुझ्या भावना तू हेलनला सांग.”

हेलनलाही प्रिन्स आवडू लागतो. मात्र हेलन म्हणते, ”मला हे नातं पुढे न्यायचे नाहीए.” एक मित्र म्हणून तिला प्रिन्स हवा आहे.

अॅनाचे ऑपरेशन झाले आणि ती लवकरच घरी येत आहे, अशी बातमी घेऊन मॅसी येतो. हेलनलाही अॅनाची आठवण येत असते. ती तिच्या आगमनाची वाट पाहत असते. एके दिवशी अॅना येते, हेलनला खूप आनंद होतो. ती तिच्याशी खूप बोलते. मधल्या काळात काय काय झाले ते सांगते. प्रिन्स आता आपली जबाबदारी पूर्ण झाल्याने जायला निघतो. अॅना त्याला सांगते, ”मला कळले आहे की, माझ्या गैरहजेरीत तू हेलनची चांगली काळजी घेतलीस. इतक्या पोटतिडकीने कोणी काम करत नसतं. तेव्हा आता तूही आमच्या सोबत इथेच राहा.” प्रिन्सला आनंद होतो.

अॅना आल्यानंतर हेलन परदेशात व्याख्यानासाठी जाण्याचे ठरवते. मात्र अॅना तिला सांगते, ”आता थोडे दिवस थांब. चिंतन करायला शीक. काही दारं काही काळ बंद करावी लागतात. तू तुझ्या आजपर्यंतच्या प्रवासाचा ग्रंथ लिहायला हवाय. तू ज्या पद्धतीने झगडली आहेस, ते प्रेरणादायी आहे. तू लिहिलं नाहीस, तर तुझा भूतकाळ अंधारात राहील.”

सगळ्यांच्या आग्रहास्तव हेलन केलर तिचे आत्मचरित्र ‘द स्टोरी ऑफ माय लाइफ’ लिहिणार असे जाहीर करते आणि नाटक संपते. नाटकात कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत.

श्रेयनामावली
नाटक – दगडी भिंत
संस्था – श्रीकला संस्कार न्यास, डोंबिवली
लेखिका – संपदा जोगळेकर कुलकर्णी
दिग्दर्शक – आशुतोष वाघमारे
प्रकाशयोजना – विनोद राठोड
पार्श्वसंगीत – आशुतोष वाघमारे
संगीत संयोजन – ओमकार जाधव
नेपथ्य – वृशांक कवठेकर
वेशभूषा – मानसी साळवी
रंगभूषा – उल्लेश खंदारे व भारत सोनवणे
नृत्य – अवनी पटवर्धन
रंगमंच व्यवस्था – मंजिरी साने, खुशाल भगत, अभिराज कुलकर्णी, रिद्धेश सावंत, स्वरांगी जोशी, वैष्णवी देव, चैताली ब्रह्मे, श्रुती चव्हाण, नूतन चौधरी, योगेश विरकर, मीनल लेले, माधवी जोशी, ज्योती दाते, किमया नेरूरकर, स्वानंदी जोशी, प्रतीक्षा धनके

पात्रपरिचय
निखिला इनामदार – अॅना
अथर्व नाईक – प्रिन्स
प्रशांत जोशी – मेसी व मिस्टर केलर
वंशिका इनामदार – पॉली व तरुण मिस अॅना
श्रुती गणपुले – हेलन केलर

(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply