महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुस्वानंद कला प्रतिष्ठान, ठाणे निर्मित ‘डोंगरार्त’ हे नाटक सादर करण्यात आले.
डोंगरार्त नाटकात राजस्थानील रुदाली स्त्रियांच्या प्रथेविषयीचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
राजस्थानात ‘रुदाली’ ही एक प्रथा आहे. उसने रडण्यासाठी जाणाऱ्या स्त्रिया असा त्याचा ढोबळ अर्थ आहे. (मोले घातले रडाया ही मराठीतील म्हण तशाच काहीशा अर्थाची आहे.) काहीजणी यात परंपरेने आल्या तर काहींना हा व्यवसाय करायला भाग पाडले गेले. रुदालीसाठी जाणाऱ्या या विधवांना गावचा जमीनदार, मुखिया यांच्याकडे रुदालीला बोलावले जात असे. अशा स्त्रियांवर अत्याचारही होत असत. पण त्यांना तो मुकाट्याने सहन करावा लागे. या स्त्रियांचे आयुष्य काय असेल? त्या सगळ्याजणी काय नरकयातना भोगत असतील? समाज त्यांना सहज स्वीकारत असले का? समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना येता येत असेल काय? असे अनेक प्रश्न जे लेखकाला पडले, ते त्यांनी या नाटकाच्या रूपात मांडले आहेत.
पडदा उघडतो तेव्हा राजस्थानी गाणी गाऊन मोरणी हिची लग्नासाठी पाठवणी करण्यात येते. तिथे लग्नमंडपात, वयस्क असलेला नवरदेव चक्कर येऊन पडतो व तिथल्या तिथे मृत्यू पावतो. मंडपातील सगळे या दुर्घटनेबद्दल मोरणीला अपशकुनी ठरवून तिला व सावित्रीला मारहाण करतात. शेवटी त्या कशाबशा मंडपातून पळून जातात.
तेवढ्यात एक माणूस जलपाला हाका मारीत घरी येतो, मंडपात घडलेली हकीगत सांगतो व ”मोरणी व सावित्री घरी आल्या आहेत काय?” असे विचारतो. लग्नमंडपात घडलेला प्रकारही तो सांगतो. जलपा त्या दोघींना शोधायला बाहेर पडते. त्या दोघी सापडतात. जलपा त्यांना घरी आणते. माँ व सावित्री जलपाला दोष देतात, ”तू म्हातारा नवरा कसा आणलास मोरणीसाठी? तू मोरणीचा बळी दिलास”, असे सावित्री सांगते. तेवढ्यात तोच माणून पुन्हा चौकशीला येतो व जलपाला म्हणतो, ”आमचा पीसा परत दे. मी पीसा व मोरणीला घेतल्याशिवाय जाणार नाही.” जलपा त्याला दमदाटी करून हाकलते.
माँला मोरणी नेहमी विचारते, ”आपण कोण आहोत, आपला भूतकाळ काय आहे? तू माझी नानी आहेस की आजी? मी जलपा व सावित्री यांना नावाने हाका का मारायच्या?” माँ ह्या प्रश्नांची उत्तरे देत नाही.
गावचा जमीनदार वासनांध असतो. माँ तरुण वयात असताना या जमीनदाराची नजर तिच्यावर पडते. तो माँच्या नवऱ्याला ठार मारतो व माँला आपल्याकडे ठेवून घेतो. जलपा व सावित्री या माँच्या मुली असतात व जमीनदार त्यांचा बाप असतो.
मोरणी ही जलपाची मुलगी असते. तिचाही बाप तोच जमीनदार असतो. मात्र हे सत्य तिच्यापासून लपवून ठेवलेले असते. मोरणीला वाटते, आपली आई सावित्रीच आहे, मोरणीला शिक्षणाची आवड असते. ती तसा प्रयत्न करते. मात्र त्याला यश येत नाही. जमीनदाराची नजर मोरणीवर पडते, तो जलपाच्या घरी येतो, जलपा त्याला मोरणीचा बाप तूच आहेस, असे सांगते, मात्र जमीनदार ते नाकारतो. तो जलपाला सांगतो, ”जर मोरणी माझी मुलगी असेल, तर तिला मला भेटायचं आहे. तिला शिकायचं असेल तर मी तिची व्यवस्था करतो.” जलपाला हे खरे वाटते ती मोरणीला जमीनदाराकडे पाठवते. जमीनदार मोरणीवर अत्याचार करतो. मोरणी त्याला ठार मारते, मोरणीने जमीनदाराला ठार मारल्याचा राग जलपाला येतो ती ‘मोरणी’ला खूप मारते व सांगते, ”तो तुझा बाप होता, आपल्याला पीसा तोच देत होता.” मोरणी जमीनदाराने तिच्या वर जबरदस्ती केल्याचे सांगते जलपाने भरपूर मारहाण केल्याने मोरणीचा मृत्यू होतो.
नेपथ्यात जलपाचे घर आणि झोपडी दाखविली आहे. प्रकाशयोजनेच्या साहाय्याने जमीनदाराच्या वाड्यावरील त्याचे बसण्याचे ठिकाण दाखविले आहे.
……..
श्रेयनामावली
नाटक – ‘डोंगरार्त’
संस्था – सुस्वानंद कला प्रतिष्ठान, ठाणे
लेखन – अपर्णा क्षेमकल्याणी
दिग्दर्शन आणि निर्माती – मीनल दातार
लेखक – अपर्णा क्षेमकल्याणी
संगीत – मंदार देशपांडे
नेपथ्य – प्रदीप पाटील
प्रकाशयोजना – आनंद केळकर
रंगभूषा – अभय शिंदे
केशभूषा – नेहा जगताप
वेशभूषा – शिल्पा दीक्षित
दिग्दर्शन आणि वेशभूषा साह्य – मानसी पुराणिक
संगीत साह्य – आदित्य दुदम
प्रकाश योजना साह्य – चेतन पडवळ
गायक – कविता जोशी, आम्रपाली तांबे, मंदार देशपांडे
रंगमंच व्यवस्था – गौरांग दामले
जाहिरात – नीलेश वेदक
पात्रपरिचय
जलपा – शिल्पा दीक्षित
सावित्री – चैताली राजे
मोरणी – रमा अमीन
माँ – वर्षा ओगले
जमीनदार – सचिन फडतरे
लछमी – अक्षरा चांदिवाले
माणूस – सिद्धेश साळुंके
(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)



कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

