वारकरी : प्रामाणिक कर्तव्यपूर्ती केल्यास देवभक्तीही घडते

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी अंबापेठ क्लब, अमरावती निर्मित ‘वारकरी’ हे नाटक सादर करण्यात आले.

स्वीकारलेले देशभक्तीचे काम निःस्वार्थीपणे, प्रामाणिकपणे, निष्ठेने करत राहिल्यास कर्तव्यपूर्तीसोबत देवभक्तीही घडत असते, असा संदेश ‘वारकरी’ नाटकातून लेखकाला द्यायचा आहे.

पडदा उघडतो तेव्हा अप्पासाहेब शिंदे यांच्या वाड्यावर स्त्री-पुरुष वारीला जाण्यासाठी जमले आहेत आणि तितक्यात दादामहाराज यांचे आगमन होते. त्यांचे स्वागत झाल्यावर सगळे वारकरी जायला निघतात. रखमालासुद्धा वारीला जायचे असते, पण तिचे पती इन्स्पेक्टर राणोजी शिंदे तिला जाऊ देत नाहीत. तसेच दादामहाराजांही ते अपमान करतात.

निर्जला एकादशी असल्यामुळे घरात भगर व आमटी असा प्रसाद असतो. मात्र राणोजी, ”आम्ही वारकऱ्यांचे संरक्षण करून दमलो आहोत ताकदीसाठी मटण आणलंय, त्याचं जेवण करा”, असे पत्नीला फर्मावतात. मात्र रखमा मावशीला सांगून मटण बाहेर टाकून देते व घर पुन्हा स्वच्छ करून घेते. राणोजीला भगर-आमटीसोबत फळे, दूध, सुकामेवा खायला देते व सांगते, ”या आहारामुळे गेलेली ताकद परत येईल.”

तेवढ्यात बातमी येते की, वारीमध्ये वाळूचा ट्रक घुसतो व काही वारकरी जखमी, अत्यवस्थ होतात. ट्रकचा चालक पळून जातो. गावचा पुढारी हरी पाटील व खासदार फोन करून राणोजीला, ”प्रकरण मिटवून टाका, ट्रकचालकाचा तपास करू नका” असे सांगतात. राणोजी तपास थांबणार नसल्याचे सांगतो.

दरम्यान, ट्रक ड्रायव्हर न सापडल्यामुळे दादामहाराज उपोषणाला बसतात. त्यामुळे वारकरी आक्रमक होतात. राणोजी त्यांना आवरण्यासाठी लाठीमार करण्याचा, अश्रुधूर सोडण्याचा आदेश देतात. दादाजींना विनंती करूनही ते उपोषण मागे घेत नाहीत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण होते. राणोजी त्यांना अटक करतात आणि रागाने घरातील पूजेतील विठ्ठलमूर्ती उचलून फोडायला निघतात. रखमा त्याचेच पिस्तूल त्यांच्यावर रोखते, मग ते मूर्ती ठेवतात.

राणोजी घरी नसताना त्यांची बहीण वसुधा वाड्यावर येते, तिला वाड्याची वाटणी करून हवी असते. त्यावर मावशी म्हणते, ”अग, तुझ्या लग्नात भरपूर खर्च झाल्याने वाडा गहाण टाकावा लागला आणि तू तर आता एकटीच राहातेस ना? मग वाटणी कशाला?” तितक्यात राणोजी येतात. वसुधा त्याला सांगते, ”मला वाड्याची वाटणी हवी आहे. नाहीतर मी कोर्टात जाईन.” राणोजी संपूर्ण वाडा तिच्या नावावर करून देतात. ”आम्ही पोलीस क्वार्टरला राहायला जाऊ” असे सांगून निघून जातात.

राणोजी येतात, त्यावेळी वाड्यात एकटी वसुधा असते. ती म्हणते, ”मला वाडा नको आहे. मावशी आणि अनुश्री वाडा सोडून गेल्या, अप्पांनी स्थापन केलेला विठ्ठल तू फोडायला निघालास म्हणून रखमाही वारीला निघून गेली. मी पण वारीला निघालेय, हा वाडा तू परत घे आणि एकटाच राहा.”

राणोजींना भेटायला हरी पाटलांची मुलगी तेजश्री येते. ”तुम्ही माझ्या वडिलांना अटक केली आहे, त्यांना सोडून द्या” असे सांगते. गृहमंत्र्यांकडून दबाव आणते. राणोजी तिचा अपमान करतात. ”याचे परिणाम तुम्ही भोगाल”, असे सांगून ती जाते.

खंडेतोड बातमी घेऊन येतो की, ट्रक ड्रायव्हर मृतावस्थेत सापडला आहे आणि कर्तव्यात कसूर झाल्याबद्दल राणोजींना निलंबित करण्यात आले आहे.

राणोजी घरी एकटेच असतात. ते विठ्ठलाशी बोलतात, मी इतकी वर्षे प्रामाणिकपणे नोकरी करतोय काय फळ मला मिळाले? मी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी झटलो, गोवंश सोडवण्यासाठी जिवाचं रान केलं. मावशी, अनुश्री मला सोडून गेल्या. माझी रखमाही माझ्यापासून दूर गेली. का, तर मी तुझी भक्ती करत नाही म्हणून! असे म्हणून ते विठ्ठलाच्या मूर्तीला जलाभिषेक करायला सुरवात करतात.

रखमा वारीत असते. तिथे तिला नाना महाराजांचा दृष्टांत होतो, ‘देवभक्ती ही नित्यकर्मातूनही साधली जाते, तू तुझ्या विठ्ठलाला सोडून आलीस. जिथे विठ्ठल तिथेच रखुमाई. त्याच्या जनसेवेतच विठ्ठलभक्ती आहे, तू राणोजीकडे परत जा.’

रखमा वाड्यावर येते. तिला राणोजी विठ्ठलाला जलाभिषेक करत असल्याचे दिसते, तिला आनंद होतो. तिला कळते, राणोजींना नोकरीतून निलंबित केले आहे. ती विठ्ठलाकडे साकड घालते.

ट्रक ड्रायव्हरची पत्नी राणोजींना भेटायला येते. तिच्याकडून राणोजींना कळते की, रात्री हरी पाटीलच्या माणसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतलेले असते. राणोजी तिचा सर्व जबाब रेकॉर्ड करतात. वसुधाला फोन करून बोलावून न्यायाधीशांपुढे जाऊन ही जबानी दे, असे सांगतात.

या प्रकरणात राणोजी निर्दोष असल्याचे सिद्ध होते. निलंबन मागे घेतले जाते, दादा महाराज वाड्यावर येतात आणि यंदाच्या विठ्ठल पूजेचा मान ‘रखमा व राणोजी’ यांना दिला असल्याचे सांगतात.

नेपथ्यात राणोजींचा शिंदे वाडा, विठ्ठलाच्या पूजेचे मखर, पालखी दाखवली आहे. देवभक्ती व देशभक्ती याविषयीचे विविध प्रसंग, संवाद तसेच प्रसंगाला अनुसरून अभंग गायन व त्याला मृदुंग व संवादिनीची प्रत्यक्ष साथ संगत घेतल्यामुळे परिणामकारकता वाढली आहे.

श्रेयनामावली
नाटक – वारकरी
संस्था – अंबापेठ क्लब, अमरावती
निर्माता – अॅड. प्रशांत देशपांडे
लेखक-दिग्दर्शक – डॉ. चंद्रकांत रमेशचंद्र शिंदे
नेपथ्य – अॅड प्रशांत देशपांडे
प्रकाशयोजना – गायत्री गुडघे
संगीत संयोजन – डॉ. अवंतिका मानकर
गायक-वादकवृंद – डॉ अवंतिका मानकर, ओम कराळे, श्रवण बोरबळ, सिद्धेश जोशी, पियुष हेलगारे, आराध्य गायकवाड
पार्श्वसंगीत – प्रथमेश पुर्भे
रंगभूषा – प्रतीक्षा गुडधे
वेशभूषा – अॅड. श्रद्धा पाटेकर
सूत्रसंचालन – प्रा. डॉ. दिनेश खेडकर, प्रा. डॉ. मनीष गायकवाड, प्रा. सुकृत चौधरी

पात्रपरिचय
इं. राणोजी शिंदे – डॉ. चंद्रकांत र. शिंदे
रखुमाई – रिया गीते
मावशी – रुचिता खेडकर
इं. खंडेतोड – कौशल खंडेतोड
इं. माहोरे – समृद्धी माहोरे
वसुधा – निर्मिती मणवीर
कल्याणी – अनुश्री शेटे
दादा महाराज – डॉ. मनीष गायकवाड
कीर्ती – कीर्ती बहादुरे
नाना महाराज – डॉ. दिनेश खेडकर
माधव – सौम्य गोलाईतकर
केशव – हर्षल मानेकर
गोविंद – दिव्यांशु जोगे
वनाबाई – डॉ. रेखा मग्गीरवार
तेजस्वीताई – तेजल काळमेघ
सेक्रेटरी – मोहित भिरडे
गौरी – गौरी देवढे
प्रतीक्षा – प्रतीक्षा वडनेरकर
वारकरी – श्रावणी सोनटक्के, राधीका पाखरे, ऋतुजा मेश्राम, वैष्णवी बनसोड, यशस्वी ढवक, प्रतीक यावले, प्रा. सुकृत चौधरी

(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply