महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी वीरशैव समाज, लांजा निर्मित ‘ईठ्ठला’ हे नाटक सादर करण्यात आले.
या जन्मात केलेली पापे याच जन्मात फेडावी लागतात, परिस्थिती आणि हव्यास यापुढे माणूस आपली विवेकबुद्धी गमावून वाईट कृत्ये करतो. मात्र केलेल्या वाईट कर्माची फळे इथेच भोगावी लागतात, असा संदेश ‘ईठ्ठला’ हे नाटक देते. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रत्नागिरी केंद्रावर या नाटकाने दुसरा क्रमांक मिळविला होता.
नाटकाचा पडदा उघडतो, तेव्हा रस्त्यावरून दिंडी जात असल्याचा आवाज येतो. एक प्रमुख वारकरी तुकाच्या घरात येऊन विचारतो, ”वीस-बावीस जणांची दिंडी आहे. जेवणाची व्यवस्था होईल काय?” ”जेवणाची नाही, पण राहायची होईल”, असे तुका सांगतो. मात्र ते वारकरी पुढच्या पडावाकडे जातात.
तुका-जना व मुलगा नामा हे कुटुंब पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना व व्यापाऱ्यांना वाटेतल्या मुक्कामासाठीची सोय व सेवा करणारे असते. यातून जे उत्पन्न मिळेल त्यातून त्यांचा संसार चालतो, त्यांचे घर जंगलात असते. अलीकडे वारीचा मार्ग बदलला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून येणारे वारकरी, पांथस्थ यांचे प्रमाण कमी झाल्याने कुटुंबावर आर्थिक संकटाची, उपासमारीची परिस्थिती ओढवते. तरीही हे कुटुंब विठ्ठलभक्तीत रममाण असतेय
रोजच्या उपासमारीला कंटाळून तुका-जना आपला मुलगा नामा याला बाहेरदेशी उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी मामासोबत पाठवण्याचे ठरवतात. मामा त्याला न्यायला येतो त्यावेळी तो तुकाला विनंती करतो, ”जेव्हा नामा दहा वर्षांनी परत येईल त्यावेळी माझी मुलगी शेवंता हिला तुम्ही सून करून घ्या.” सगळे मान्यता देतात, नामा मामासोबत जातो.
इकडे त्या दोघांचा दिवस नामाच्या आठवणीशिवाय जात नसे. बरेच दिवस कोणी वारकरी, पांथस्थ न आल्याने आणि घरातील अन्न संपल्यामुळे तुका-जनाची उपासमार होते. तुकाचा विश्वास विठ्ठलावर असतो. ”विठ्ठल आपली परीक्षा पाहत आहे”, असे तो जनाला समजावत असे.
एके दिवशी यादवराजांच्या दरबारातील व्यापारी रात्रीच्या विश्रांतीसाठी येतो. तुका-जना त्याचे स्वागत करतात. व्यापाऱ्याचा मौल्यवान दागदागिने, जड-जवाहीर विक्रीचा व्यवसाय असून तो पंढरपूरच्या बाजारासाठी जात असतो. तुका-जनाही उपाशी असल्याचे पाहून तो आपल्याकडील भाकरी त्यांना देतो व विश्रांतीसाठी खोलीत जातो.
गरिबीमुळे, सततच्या उपासमारीमुळे त्रस्त झालेली जना तुकाला सांगते, ”तो व्यापारी झोपला आहे. आपण त्याचे एक गाठोडे काढून घेऊ या. त्याचे काही कमी होणार नाही.” तुका तिला समजावतो, ”जर तो राजाकडे गेला तर राजाचे सैनिक आपल्याला पकडून नेतील, शिक्षा होईल.” तुकाच्या समजावण्यानंतरही जनाच्या डोक्यातून त्याच्याकडील मौल्यवान दागदागिने, जडजवाहीर काही जात नव्हते. ती तुकाला म्हणाली, ”जसे शत्रूला सैनिक मारतात, तसं आपण त्याला मारून टाकलं तर?” तुका म्हणाला, ”तो आपला शत्रू नाही. भला माणूस आहे. पांडुरंगाची भक्ती दया करायला शिकवते. तू मात्र हत्या करायची म्हणतेस? हे योग्य नाही.” मात्र तुका शेवटी जनीच्या आग्रहाला बळी पडतो. दोघेही पांडुरंगाचा गजर करतात, नाचतात आणि तुका खोलीत झोपलेल्या व्यापाऱ्याची हत्या करतो. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावतो. त्याच्या घोड्याला दूरवर सोडून देतो, मात्र आपण एका निरपराध व्यक्ताची हत्या केली ही गोष्ट मरेपर्यंत आपल्याला छळणार, असे त्याला वाटत राहते.
एकदा यादवराजांच्या दरबारातून एक सैनिक त्या व्यापाऱ्याची चौकशी करत यांच्याकडे येतो. तुकाचे घर, संपूर्ण आवार यांची तपासणी करतो, पण जनाने त्या व्यापाऱ्याची हत्या केल्यानंतर गरजेपुरते सोने, जवाहिरे आपणाकडे ठेवून बाकीचे विहिरीत टाकलेले असतात. त्यामुळे कोठेच काही सापडत नाही. त्यामुळे तो निघून जातो.
जनाची श्रीमंतीची हाव वाढतच जाते. एक हत्या पचल्यामुळे तिची भीती कमी होते आणि आणखी आठ जणांची हत्या याच पद्धतीने ती दोघे करतात.
एकदा जनाचा भाऊ येतो, जनाचे राहाणीमान सुधारलेले असते. जनाच्या अंगावर सोन्याचे दागिने, घरात पुरेसे अन्नधान्य, गुरेढोरे हे पाहून त्याला संशय येतो. तो विचारतो, ”हा बदल कसा?” त्यावर जना म्हणते, ”व्यापारी, पांथस्थ जाताना काही वस्तू, पैसे देत असल्यामुळे हे शक्य झालं.”
मामा सांगतो, ”आपला नामा चार दिवसांनी येत आहे. तो आला की आपण त्याचे व शेवंताचे लग्न लावून देऊ.” तुका व जना यांना नामा येणार याचा खूप आनंद होतो.
नामा दुसऱ्याच दिवशी वारकरी बनून घरी येतो, मोठा झाल्याने तुका-जना त्याला ओळखत नाहीत. रात्री जना त्याला मारा असे सांगते, पण तुका म्हणतो, ”चार दिवसांनी नामा येणार आहे, झालं तेवढं बस.” तुकाच्या नकारानंतरही ती दोघे पुन्हा विठ्ठलाचा गजर करतात व नाचतात. यावेळी जना खोलीत झोपलेल्या आपल्याच मुलाची हत्या करते. त्याची नेहमीसारखी विल्हेवाट लावली जाते.
चार दिवसांनी मामा शेवंताला घेऊन येतो, ”नामा आधीच आला आहे ना? कुठाय तो?” असे विचारतो. मामा त्याचे वर्णन करतो. चार दिवसांपूर्वी वारकरी बनून आलेला तो नामाच होता, तुका-जनाच्या लक्षात येते. हव्यासापायी आपण त्याची हत्या केली, हे त्यांना समजून टुकते. पश्चात्ताप होतो. शोक अनावर झाल्याने ती दोघे बेशुद्ध पडतात. कितीही उपासमार झाली, तरी वारकरी कुटुंब एकाच नव्हे, तर अनेक जणांची हत्या करू शकेल का, असा प्रश्न मागे ठेवून नाटक संपते.
नेपथ्यात तुकाचे घर, देवघर, त्यातील वीणा, मृदुंग, प्रवाशांसाठी खोल्या इत्यादी दाखवले आहे.
…….
श्रेयनामावली
नाटक – ईठ्ठला
संस्था- वीरशैव समाज, लांजा
लेखक-दिग्दर्शक – अमोल मारुती रेडीज
निर्माता – जयप्रकाश पाखरे
नेपथ्य – संदीप बाळकृष्ण सावंत, शरद वासुदेव चव्हाण
पार्श्वसंगीत – प्रदीप गणपत कांबळे
पार्श्व गायक व नृत्य दिग्दर्शक – महेश मधुकर बामणे
पखवाज – परशुराम गुरव
गीतकार – अमोल मारुती रेडीज
रंगभूषा – गजानन नारायण पांचाळ
वेशभूषा – संतोष तुकाराम डोर्लेकर, दामिनी दयानंद भिंगार्डे, अनघा देवस्थळी, जितेंद्र बाळकृष्ण कुडतरकर, प्रदीप कशेळकर
पात्रपरिचय
तुका – अमोल मारुती रेडीज
जना – अर्चना गजानन पेणकर-पांचाळ
नामा – कु. पियुष जितेंद्र कुडतरकर
मामा – शरद वासुदेव चव्हाण
व्यापारी – विजय सदाशिव शिंदे
माणूस – अमित अनंत जाधव
तरुण – शशांक वसंत उपशेट्ये
वारकरी – प्रदीप यशवंत माजळकर
वारकरी – राकेश रमेश दळवी
शेवंता – कु. सायली संजय सुर्वे
(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)




राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादर झालेले नाटक पाहा पुढील लिंकवर…
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

