रत्नागिरी : पूर्व आफ्रिकेतील नैरोबी (केनिया) येथे महाराष्ट्रातून गेलेल्या मराठी बांधवांचा मराठीचा आवाज घुमला. दुसरे जागतिक मराठी भाषा साहित्य संमेलन तेथे उत्साहात पार पडले.
मराठी माणसांनी गेली ८० वर्षे नैरोबी येथे आपल्या मराठी भाषेची तेथे जपणूक केली आहे. तेच औचित्य साधून २९ एप्रिल ते ४ मे या कालावधीत महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नैरोबी येथे महाराष्ट्र भवनात सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. नैरोबी येथील मराठी मंडळींनी अत्यंत देखणा उत्कृष्ट कार्यक्रम सादर केला. त्यामध्ये आबालवृद्धांनी भाग घेतला. विविध नाटकांतील नाट्यछटा, पारंपरिक मराठी गाणी यांचा त्यात समावेश होता. नैरोबीतील स्थानिक लोकांनी या कार्यक्रमांमध्ये अत्यंत आकर्षक स्थानिक लोकांच्या भाषेतील नाचगाणी सादर करून कार्यक्रमाला खूपच रंगत आणली. आदिवासींची वेशभूषा, विविध प्रकारची वाद्ये, पक्ष्यांच्या पिसांचे टोप घालून नृत्ये सादर केली. यामुळे हे कार्यक्रम बहारदार झाले.
दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातून गेलेले कोकण मराठी साहित्य परिषदेचे ६० लेखक, कवी साहित्यिक व साहित्यप्रेमींनी आपला कलाविष्कार सादर केला. कवी अशोक नायगावकर, संगीतकार कौशल इनामदार, गझलकार दिलीप पांढरपट्टे, कवी अनिरुद्ध जोशी, अरुण म्हात्रे, प्रसाद कुलकर्णी यांनी आपली गीते सादर करून संगीताची मैफल जमवली. दोन्ही दिवशी सर्वांनी महाराष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाचा प्रारंभ केला.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे प्रतिनिधी विनायक हातखंबकर यांनी पावसचे थोर संत स्वामी स्वरूपानंद यांची प्रार्थना या कार्यक्रमांमध्ये सादर केली. ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच ज्ञानेश्वरी पुस्तक पालखीमध्ये ठेवून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यामध्ये महिला, मुले नटून थटून सजून पारंपरिक पोशाख करून सहभागी झाली होती. वाजत गाजत भजन-कीर्तन म्हणत टाळमृदुंगाच्या तालावर नैरोबीतील ही ग्रंथ दिंडी महाराष्ट्राच्या थोर परंपरेची साक्ष देत होती.
दोन दिवसांच्या सोहळ्यात स्थानिक महाराष्ट्रीय मंडळींनी महाराष्ट्रीयन पद्धतीच्या सुग्रास भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती. नैरोबीमध्ये असलेल्या महाराष्ट्र मंडळाने अध्यक्ष प्रशांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत देखणे असे नियोजन व प्रेमळ स्वागत करून सर्वांची मने जिंकली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा सौ. नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ या संमेलनाचे अध्यक्ष श्रीमती दीपा ठाणेकर, दिलीप ठाणेकर यांनी उत्तम नियोजन करून हे दुसरे जागतिक मराठी भाषा साहित्य संमेलन व नैरोबीची सफर यशस्वी केली.
या संमेलनाला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कोमसापचे विश्वस्त उदय सामंत व कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे आशीर्वाद मार्गदर्शन लाभले, अशी माहिती नैरोबीहून परतल्यानंतर विनायक हातखंबकर यांनी दिली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

