अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय सुवर्णमहोत्सव सांगता समारंभ

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संचालित अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवाचा सांगता समारंभ ४ आणि ५ मे २०२६ रोजी पार पडला. या समारंभातील विविध कार्यक्रमांचा वृत्तांत आणि विविध क्षणचित्रांचे व्हिडीओ

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीमध्ये क्लस्टर विद्यापीठाची क्षमता – उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीमध्ये क्लस्टर विद्यापीठ होण्याची क्षमता आहे. त्यामुळे संस्थेने त्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाला पाठवून त्याचा पाठपुरावा करावा. संस्थेने शासनाशी सामंजस्य करार केल्यास कौशल्यविकासाचे विविध नवे अभ्यासक्रम सुरू करता येतील. तसेच, देश-परदेशांमध्ये असलेल्या आणि संस्थेमध्ये शिकून पुढे नाव कमावलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांशी संस्थेने संपर्क साधून जोडून घ्यावे. पुढच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळेल आणि संस्थेच्या प्रगतीसाठीही त्याचा खूप उपयोग होईल,’ असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (चार मे) रत्नागिरीत केले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. खातू नाट्यमंदिरात हा कार्यक्रम झाला. सामंत स्वतःही याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून, आपल्याला त्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी पुढच्या वर्षभरात नावीन्यपूर्ण फूड टेस्टिंग प्रयोगशाळा उभारणार आहे. या प्रयोगशाळेसाठी पुढच्या दोन महिन्यांमध्ये एक कोटी रुपये देण्याची घोषणाही सामंत यांनी केली. या वेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले.

या वेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अ‍ॅड. विजय साखळकर, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद जोशी, अ‍ॅड. विलास पाटणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, शालेय समितीचे अध्यक्ष आनंद देसाई, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, देणगीदार प्रतिनिधी आनंद अभ्यंकर आणि निरंजन कुळकर्णी, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक आणि नियामक मंडळ सदस्य मनोज पाटणकर, डॉ. चंद्रशेखर केळकर, भरत ओसवाल, राजन मलुष्टे, प्राची जोशी, जि. प. सदस्य बाबू म्हाप व माजी विद्यार्थी प्रतिनिधी बिपिन बंदरकर आदी मान्यवरांसह महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, ‘मी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होतो तेव्हा रत्नागिरी हे शैक्षणिक केंद्र होण्यासाठी प्रयत्न केले. रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी कॉलेज, कौशल्य विकास केंद्र, संस्कृत विद्यापीठ आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय रत्नागिरीतच होत आहे. महाराष्ट्रात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीसारखी संस्था नाही, हे मी अभिमानाने सांगीन. संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांनी परदेशात नाव कमावले आहे. ते सगळे विद्यार्थ्यांचे आयडॉल झाले पाहिजेत. आजचा कार्यक्रम भावनिक आहे. कारण खातू नाट्यमंदिर व महाविद्यालयासोबत माझ्या आठवणी जाग्या झाल्या.’

अध्यक्षीय भाषणात शिल्पाताई पटवर्धन यांनी संस्था दर्जात्मक सुधारणांसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. ‘मला लोकांनी काय दिले, यापेक्षा मी लोकांना काय दिले, यावर माणूस चिंतन करतो तेव्हा देश मोठा व्हायला वेळ लागत नाही. व्यवस्थापन, शिक्षक, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थी हे शिक्षण क्षेत्राचे चार स्तंभ आहेत. हे स्तंभ एका दिशेने प्रवास करतात, तेव्हा प्रगती होते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी त्याच पद्धतीने प्रवास करते आहे. मातृऋण, पितृऋण आणि समाजऋण असे तीन प्रकारचे ऋण प्रत्येकाने फेडणे आवश्यक असते. त्यामुळे समाजासाठी प्रत्येकाने शक्य ते योगदान करावे. एआयमुळे रोजगार जाण्याची भीती अनेक जण व्यक्त करतात; मात्र मानवाला मेंदू, हात आणि काम करण्याची शक्ती देवाने दिलेली आहे. त्यामुळे नवीन क्रांती होईल, नवे उद्योग उभे राहतील. सध्याच्या काळात कृषी क्षेत्राकडे वळण्याची खूप मोठी संधी आहे. जे मनात आहे ते कृतीत आणले जाते, तेव्हा देश मोठा व्हायला वेळ लागत नाही. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी पुढील वर्षभरात फूड टेक्नॉलॉजी लॅब सुरू करणार आहे,’ असे प्रतिपादन शिल्पाताईंनी केले.

संस्थेचे संस्थापक बाबूराव जोशी व मालतीबाई जोशी यांना अभिवादन करून व दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. सुरुवातीला ईशस्तवन आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये आनंद देसाई म्हणाले, ‘बाबूराव जोशी व मालतीबाई जोशी यांच्या पुण्याईने संस्था भारतात नावारूपाला येत आहे. २२ घटक संस्थांचा नावलौकिक वाढत आहे. त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. संस्था आता नवीन प्रयोगशाळा चालू करत आहे. त्या माध्यमातून शेतकरी, आंबा बागायतदारांना व व्यावसायिकांना अल्प दरामध्ये खाद्यपदार्थ चाचणी करता येईल. त्याकरिता सामंत यांनी एक कोटी रुपये द्यावेत.’

प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. अ‍ॅड. पाटणे यांनी निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र निर्माण करण्याची मागणी पालकमंत्री सामंत यांच्याकडे केली. तसेच, ज्ञानपीठविजेते विंदा करंदीकर आणि डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्यासारख्या महनीय व्यक्तींनी या संस्थेत शिकवले आहे, याचा ठळक उल्लेखही संस्थेत करण्याची मागणीही त्यांनी केली. डॉ. मुकुंद जोशी यांनी मनोगतामध्ये बाबूराव जोशी यांच्या, तसेच १०+२+३ हा शैक्षणिक पॅटर्न तयार झाला, त्या वेळी पहिल्या वर्षी आलेल्या अडचणी आणि अन्य आठवणी सांगितल्या. शिवछत्रपती पुरस्कार विजेती माजी विद्यार्थिनी ऐश्वर्या सावंत, नगराध्यक्ष सुर्वे, प्रमुख देणगीदार श्री. कुळकर्णी आणि श्री. अभ्यंकर यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. वैभव कानिटकर यांनी केले. आभारप्रदर्शन उपप्राचार्य सुनील गोसावी यांनी केले. वेदा वाटवे हिने पसायदान सादर केले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

0000000000000000

“सुवर्ण आविष्कार” उत्साहात, भावपूर्ण वातावरणात

रत्नागिरी : अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेला माजी विद्यार्थ्यांचा “सुवर्ण आविष्कार” सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, आजीव सभासद मंडळ अध्यक्ष महेश नाईक, उपप्राचार्य सुनील गोसावी, दिलीपकुमार शिंगाडे आणि सुवर्ण महोत्सव समन्वयक वैभव कानिटकर उपस्थित होते. कला अभिव्यक्ती आणि आठवणींचा उत्सव ठरलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांना जुन्या आठवणींमध्ये रमवले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रीतम तुकाराम बनप यांच्या “देखाना हायरे सोचाना” आणि “छुकर मेरे मन को” या गीतांनी झाली. त्यानंतर रत्नेश कांबळे यांनी प्रेमकविता सादर करून रसिकांची मने जिंकली. नितीन गजानन मिरकर यांनी “मी हाय कोली” हे गीत सादर करत कोकणी रंगत वाढवली.
ममता पंडित यांनी सादर केलेल्या मूक अभिनयाने प्रेक्षकांना वेगळाच अनुभव दिला. सुदेश निवळकर यांनी “दो दिल मिल रहे है” हे गाणे सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. दुर्गेश आखाडे यांनी एकपात्री नाट्यकला सादर करून आपल्या अभिनयाची छाप पाडली. ज्योती मोरे यांनी “नच ले नच ले मेरे” या गाण्यावर नृत्य सादर करत कार्यक्रमात जल्लोष निर्माण केला.

या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक आणि सुवर्ण महोत्सव समन्वयक वैभव कानिटकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रमाने माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देत महाविद्यालयाशी असलेले त्यांचे नाते अधिक दृढ केले.

000000000000000

जागर आठवणींचा
रत्नागिरी : येथील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित माजी शिक्षक व विद्यार्थ्यांचा मेळावा आणि मुक्त चर्चा सत्र ‘जागर आठवणींचा’ हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षक-विद्यार्थ्यांनी भावनिक क्षण अनुभवले.

कार्यक्रमात माजी शिक्षक सुशील वाघधरे, माणिक बाबर, अशोक पाटील, जलील हुश्ये, शंकर ढोले, हिराजी शेजवळ, नुरुद्दीन परकार, शिवाजीराव देशमुख, सीमा बोंद्रे, शहनाज वस्ता, अस्मिता कुलकर्णी, विशाखा सकपाळ, चिंतामणी दामले, महादेव यादव, मीनाक्षी केळकर आणि शरद आपटे यांनी सहभाग घेतला. या सर्व शिक्षकांनी आपल्या अध्यापनकाळातील अनुभव, त्या वेळची रत्नागिरीतील शिक्षणाची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांचा स्वभाव याबाबत मनोगत व्यक्त केले.

अनेक शिक्षकांनी भावना व्यक्त करताना “पुन्हा जन्म मिळाला, तर याच महाविद्यालयात शिक्षक म्हणून सेवा करण्याची इच्छा आहे,” असे सांगत महाविद्यालयाशी असलेले नाते अधोरेखित केले.

माजी विद्यार्थिनी डॉ. शुभांगी बेडेकर यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगत महाविद्यालयामुळे ज्ञानाचा भक्कम पाया घडल्याचे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व माजी शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष प्रा. महेश नाईक, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर तसेच सुवर्ण महोत्सव समन्वयक प्रा. वैभव कानिटकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय वालावलकर यांनी केले.

००००००००००००००००००००

‘सुवर्णसूर’मधून पंचदशकांची सुरेल मैफल रंगली

रत्नागिरी : अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारंभानिमित्त आयोजित ‘सुवर्णसूर – पंचदशकांची सुरेल यात्रा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. विशेष म्हणजे या कार्यक्रमातील सर्व गायक-वादक महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने आठवणी, अभिमान आणि संगीताचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात सृष्टी तांबे यांच्या ‘परब्रह्म निष्काम तो हा’ या भक्तिगीताने झाली. त्यानंतर श्रीधर पाटणकर यांनी ‘तुझे नाम आले ओठी’ सादर करत रसिकांची मने जिंकली. तन्वी मोरे यांनी ‘घनरानी / आज अयोध्या सजली’ आणि ‘मी पुन्हा वनांतरी’ ही गीते प्रभावीपणे सादर केली. कश्मिरा सावंत यांनी ‘कधी रे येशील तू’ आणि ‘होले होले साजना’ या गीतांनी रंगत वाढवली.

सृष्टी तांबे यांनी ‘हृदयी प्रीत जागते’ तर अभिजित भट यांनी ‘जेव्हा तुझ्या बटांना’ आणि ‘कानडा राजा पंढरीचा’ सादर करून दाद मिळवली. श्रीधर पाटणकर यांनी ‘जय शंकरा गंगाधरा’ या भक्तिगीतातून वातावरण भक्तिमय केले. आनंद पाटणकर यांनी ‘सुरत पिया की’ आणि समारोपाला ‘भैरवी’ सादर करत मैफलीची सांगता सुरेल केली.

याशिवाय कबीर मलुष्टे यांनी ‘कधी तू’ आणि ‘अभी मुझमे कही’ (ट्रॅकवर) तर ईशानी पाटणकर यांनी ‘दिल चीज क्या है’ आणि ‘बाई माझी करंगळी मोडली’ (ट्रॅकवर) सादर करून कार्यक्रमात विविधतेची भर घातली.

या कार्यक्रमात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर आणि प्राचार्य प्रा. डॉ. मकरंद साखळकर, आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक आणि सुवर्ण महोत्सव समन्वयक वैभव कानिटकर यांच्या हस्ते सर्व माजी विद्यार्थी गायक व वादकांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाला हार्मोनियमची साथ श्रीरंग जोगळेकर, तबल्यावर प्रथमेश शहाणे व हेरंब जोगळेकर, तर व्हायोलिनवर उदय गोखले यांनी दिली. त्यांच्या समर्थ साथीने सादरीकरणांना अधिक उठाव प्राप्त झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी साक्षी चाळके यांनी समर्थपणे केले. आदी मान्यवर उपस्थित होते.

‘सुवर्णसूर’च्या या सुरेल यात्रेतून पंचदशकांचा संगीतप्रवास रसिकांसमोर उलगडत गेला आणि उपस्थितांना अविस्मरणीय अशी सांस्कृतिक मेजवानी लाभली.

कार्यक्रमाची झलक दाखविणारा व्हिडीओ


०००००००००

“ताल मिलाप”मधून सुर, ताल आणि नृत्याचा अविस्मरणीय संगम

रत्नागिरी : अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेला “ताल मिलाप” हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला. गायन, वादन आणि नृत्य यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने उपस्थितांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, उपाध्यक्ष मुकुंदराव जोशी, उपकार्याध्यक्ष विजयराव साखळकर, खातू रंगमंचाचे देणगीदार भालचंद्र श्रीराम खातू, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, आजीव सभासद मंडळ अध्यक्ष महेश नाईक, उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर, डॉ आनंद आंबेकर, सुवर्ण महोत्सव समिती समन्वयक वैभव कानिटकर, माजी शिक्षक नुरुद्दिन परकार व त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा परकार उपस्थित होते.

“ताल मिलाप”मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. गायन विभागात ऊर्जा आपटे, सार्था गवाणकर, अदिती सावंत, वृंदा दळवी आणि पृथ्वीराज जोशी यांनी सुरेल गाणी सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. नृत्य विभागात पूर्वा हातफळे, गौरी सावंत, प्रार्थना भंडारे, श्वेता गावडे, आस्था खेडकर आणि गायत्री ठीक यांनी विविध नृत्यशैलींचा अप्रतिम आविष्कार सादर केला.

वाद्यवृंदात हर्ष बोंडाळे, परितोष काळे, साहिल पेंढारी, अजिंक्य शिंदे, जाई जोशी, स्वरूप नेने, चिन्मय साठे, अभिषेक धुळप, पार्थ देवळेकर, गंधार दामले, अवधूत जोशी आणि आर्यन निकम यांनी तालबद्ध साथ देत कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मैथिली सावंत, तन्मय डांगे, शुभम रहाटे, तनिष्का शिरधनकर, गंधाली मुळ्ये आणि जान्हवी पालकर यांनी प्रभावीपणे केले. प्राध्यापक वेदांग सौंदलगेकर, डॉ. आनंद आंबेकर आणि हरेश केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम सादर केला.

संपूर्ण कार्यक्रमात सुर, ताल आणि भावनांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. “ताल मिलाप” हा कार्यक्रम सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभाचा एक अविस्मरणीय ठेवा ठरला.

(कार्यक्रमाची झलक दाखविणारा व्हिडीओ)
००००००००००

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी शिखरावर पोहोचली : डॉ. मुकुंदराव जोशी

अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवाची सांगता

रत्नागिरी : अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय स्थापनेची मुहूर्तमेढ रोवणारी सभा आमच्या घरी झाली होती. आज सुवर्णमहोत्सव पाहता आला याचा खूप आनंद वाटतो. संस्थापक कै. बाबुराव जोशी व कै. मालतीबाई जोशी यांच्या दूरदृष्टीतून हे महाविद्यालय सुरू झाले व आज कोकणातील विद्यार्थ्यांना करिअरची संधी मिळाली. आजही संस्थेची घोडदौड सुरू आहे. नवीन इमारती उभ्या राहत आहेत. या सर्व कीर्तीच्या गोष्टी मोठ्या शिखरावर घेऊन जातील, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष तथा बाबुराव जोशी व मालताबाई जोशी यांचे नातू डॉ. मुकुंद जोशी यांनी केले.

खातू नाट्यमंदिरात अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

बाबुराव जोशी व मालतीबाई जोशी काकर्यक्रम पाहत आहेत, तेव्हा कष्ट घेतले, रोपट्याचा वृक्ष झाला. खऱ्या अर्थाने तालमिलाफ कार्यक्रमाने खरी आदरांजली दिली. मुहूर्तमेढ सभेला कुलकर्णी सर, बावडेकर सर, ग. ल. सोहोनी, ल. ग. पटवर्धन आदी घरी आले होते. तेव्हा हे मोठे आव्हान होते. मी तेव्हा आठवी-नववीत होतो. हे कॉलेज सुरू केले नाही, तर नुकसान होईल, असे ठामपणे सांगितले व हे कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले, अशी आठवण श्री. जोशी यांनी दिली.

समारंभाच्या मंचायवर कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, शालेय समिती अध्यक्ष आनंद देसाई, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक डॉ. पी. पी. कुलकर्णी, उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर, आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक, देणगीदार भालचंद्र खातू, उद्योजक दीपक गद्रे, नियामक मंडळ सदस्य मनोज पाटणकर, सचिन वहाळकर, सल्लागार मंडळ सदस्य संतोष गुरव, जिल्हा परिषद सदस्य अॅड. महेंद्र मांडवकर आणि सुवर्ण महोत्सव समन्वयक प्रा. वैभव कानिटकर उपस्थित होते.

दीपप्रज्वलन, ईशस्तवन व महाविद्यालय गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रास्ताविकात श्रीकांत दुदगीकर म्हणाले, आजचा दिवस अत्यानंदाचा असून भविष्याचा वेध घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांसमोर बदल, स्पर्धा आणि अनेक प्रकारची आव्हाने आहेत. तंत्रज्ञानातील आव्हाने शिक्षकांसमोरही आहेत. विद्यार्थ्यांना रील लाइफमधून रिअल लाइफमध्ये आणणे हे मोठे आव्हान आहे.

याप्रसंगी देणगीदारांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यवाह सतीश शेवडे यांनी सांगितले की, सुवर्णमहोत्सवासाठी सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेतली. माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. माजी शिक्षक, विद्यार्थ्यांना जुन्या आठवणी जागवण्याची संधी मिळाली. आता यापुढे दर्जेदार कामगिरी करत १० वर्षांनी हीरक महोत्सव साजरा करण्यासाठी उद्यापासून तयारी करू या.

उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर यांनी कार्याध्यक्ष शिल्पाताईंचे विशेष कौतुक केले. गेल्या दहा वर्षांत संस्थेने गरुडझेप घेतली असून जांभेकर विद्यालयाचा शतक महोत्सव, शिर्के प्रशालेचा अमृत महोत्सव, कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना विद्यार्थ्यांसाठी भव्य संकुल उभारण्याचे स्वप्न शिल्पाताईंच्या कुशल नेतृत्वात पूर्ण होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रा. प्रभात कोकजे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. वैभव कानिटकर यांनी आभार मानले.

बारावीतील गुणवंतांचा सत्कार
बारावीतील गुणवंत अयमान माझगावकर, गार्गी इनामदार, श्रिया केळकर, आस्था पुनस्कर, मितेश चिके, पार्थ चितळे, जान्हवी सावंत, सई अवसरे अयमान दसुरकर, सलोनी ताम्हणकर, रिया मयेकर, साक्षी हरळीकर आणि निर्मिती सुर्वे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच संस्कृत, बुक कीपिंग अॅंड अकाउंटन्सी, कॉम्प्युटर सायन्स, आयटी आणि गणित विषयात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गौरवण्यात आले. त्यांच्या पालकांचेही कौतुक करण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply