रत्नागिरीत उत्साहात पार पडली सुपरहिरो ऑन व्हील किड्स सायक्लोथॉन

रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने तीन मे रोजी रत्नागिरीत आयोजित केलेल्या किड्स सायक्लोथॉनला उदंड प्रतिसाद लाभला. तारांगण ते शांतिनगर या मार्गावर झालेल्या या सायक्लोथॉनमध्ये तब्बल पाचशेहून अधिक मुलांनी सायकल चालवून जल्लोष केला. सुपरहिरो ऑन सायकल अशा संकल्पनेवर ही सायक्लोथॉन आयोजित करण्यात आली होती. महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून या सायक्लोथॉनमध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ हा संदेश मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आला.

तारांगण येथून उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी मनोज पाटणकर, हिरो सायकल्सचे एरिया मॅनेजर प्रेम सागर, ज्येष्ठ नगरसेविका स्मितल पावसकर, पूजा पवार, पायल किड्सचे विनोद शाह, क्रेडाईचे वीरेंद्र वणजू आणि मान्यवरांनी झेंडा दाखवला. आधी दहा किलोमीटरच्या व नंतर पाच किलोमीटरच्या सायक्लोथॉनला प्रारंभ झाला. माळनाका, थिबा पॅलेस रोडमार्गे नाचणे पॉवरहाउस येथील गजानन महाराज मंदिरला वळसा घालून पाच किलोमीटरचे सायकलिस्ट परत आले. दहा किलोमीटरसाठी नाचणे, गोडाउन व शांतिनगरला वळसा घालून सायकलिस्ट तारांगण येथे परतले.

जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या बहुमोल सहकार्याने या सायक्लोथॉनमध्ये बेटी बचाओ हा नारा दिला. सर्व सहभागींसह उपस्थित सर्व पालकांनी बेटी बचाओ ही शपथही घेतली. या उपक्रमाबद्दल पालकांनी कौतुक केले. उत्कृष्ट नियोजन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य, वाहतूक पोलीस आणि जिल्हा प्रशासन, पालकांचे सहकार्य यामुळे उपक्रम चांगला झाला. सायक्लोथॉन पूर्ण झाल्यानंतर सर्वांना आकर्षक पदक, प्रमाणपत्र व नाश्त्याचे वितरण करण्यात आले. पोदार स्कूलच्या म्युझिकल बॅंडने उत्तम सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली. सायक्लोथॉनसाठी हिरो सायकल्स व हिंद सायकल ट्रेडिंग कंपनी, सुरस स्नॅक्स, पलाश ब्लूम, सुवर्णसूर्य फाउंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, पायल किड्स, क्रेडाई रत्नागिरी आणि फ्लेवर्स बेकरी, रुचकर कोकण व सी फॅन्स हॉटेल यांचे बहुमोल सहकार्य लाभले. जिल्हा शासकीय रुग्णालयाने रुग्णवाहिकेचीही सुविधाही उपलब्ध करून दिली. सायकलस्वारांनी आणलेल्या विविध प्रकारच्या सायकल्सही उत्तम होत्या. सुरक्षिततेसाठी सर्वांनी डोक्यावर हेल्मेट घातले होते. यापूर्वी दोन वेळा सायक्लोथॉनच्या मार्गावर प्रॅक्टिस राइडचे आयोजन केले होते. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढला.

‘रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने अतिशय सुंदर, नेटके व काटेकोर नियोजन केले. यासाठी सर्व सदस्य व कार्यकर्त्यांचे आभार. पदकाचा दर्जा अतिशय छान आहे. वाहतूक व्यवस्था, नाश्ता, हायड्रेशन पॉइंटची व्यवस्था व प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते, पालकांकडून प्रोत्साहन मिळाले. मुलांनी राइडचा मनसोक्त आनंद लुटला,’ अशी प्रतिक्रिया सुशील साळवी यांनी व्यक्त केली. ‘रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आयोजित केलेला सायक्लोथॉन उपक्रम अत्यंत सुंदर व उत्साहवर्धक ठरला. हा उपक्रम उत्तम नियोजनासह सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊन पार पडला. मुलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. लहान मुलांमध्ये फिटनेसची आवड निर्माण करून आनंदाचा संदेश देणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे,’ अशी प्रतिक्रिया कौसल्या शेट्ये यांनी व्यक्त केली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply