रत्नागिरी जिल्ह नगर वाचनालयाचा बालवाचकांसाठी टेरेस वाचनालय उपक्रम

रत्नागिरी : शाळांच्या सुट्या सुरू झाल्या असून बालगोपाळांच्या आनंदात भर घालण्यासाठी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय बालगोपाळांसाठी टेरेस वाचनालयाच्या उपक्रमातून पुस्तक खजिना उपलब्ध करून देणार आहे.

रत्नागिरीतील हौसिंग सोसायट्या, वाड्या-वस्त्यांमध्ये त्या-त्या ठिकाणची मुलांची संख्या लक्षात घेऊन त्या त्या हौसिंग सोसायटीत, वाडीत किंवा वस्तीत मुलांचे ग्रंथमित्र ग्रुप तयार करून त्याची वाचनालयात नोंद करून त्या ग्रुपला बालवाचन साहित्य, पुस्तके उपलब्ध करून देण्याचा निर्णय वाचनालयाने घेतला आहे. येत्या १० मे ते १० जून या कालावधीत हा उपक्रम बालवाचकांसाठी सुरू राहील.

ग्रंथालयात नोंद करणाऱ्या अशा ग्रुपला त्यातील बालवाचकांच्या संख्येनुसार गोष्टीरूप पुस्तके उपलब्ध करुन दिली जातील. ती वाचून झाली की पुन्हा दुसरी पुस्तके बदलून दिली जातील. या उपक्रमात सहभागी होऊन बालवाचकांनी एकत्र बसून वाचनाचा आनंद लुटावा अथवा ते शक्य नसल्यास ती आपल्या घरी नेऊन वाचावीत व ती वाचून झाली की पुस्तकात काय वाचले याची एका स्वतंत्र वहीत नोंद करून ठेवावी. उपक्रमाची मुदत संपताना या वह्या वाचनालयाकडे सादर कराव्यात. या नोंदवहीतील नोंदींचा आढावा घेऊन बक्षीस जाहीर केले जाईल. मात्र या नोंदी मुलांनी स्वतः केलेल्या व स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या असाव्यात.

वाचनालयामध्ये मुलांसाठी भरपूर बालसाहित्य उपलब्ध आहे. मुलांनी वाचाव्यात अशा अनेक मराठी, इंग्रजी पुस्तकांच्या सिरीज उपलब्ध आहेत. ज्यामध्ये हॅरी पॉटर, फास्टर फेणे, फेमस फाइव्ह इत्यादींचा समावेश आहे. त्याच बरोबरच लहान गोष्टींच्या स्वरूपातील थोर व्यक्तित्वे, समाजसुधारक यांचा परिचय करून देणारी पुस्तके, चातुर्यकथा, युद्ध कथा, साहसकथा तसेच १६९५ स्मार्ट रोबो-ए आय आणि औरंगजेब यासारखी विज्ञानाची, एआयबाबतची जिज्ञासा वाढवणारी पुस्तके असा मुबलक ग्रंथखजिना ग्रंथालयात बालवाचकांची वाट पाहत आहे.

या उपक्रमाबरोबरच जवळपासच्या मुलांसाठी सकाळी साडेनऊ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मोफत वाचनालय सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी मुलांना बसून वाचता यावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ही मुलेही या उपक्रमातील नोंदवही स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. त्यामुळे या सुटीत मुलांनी वाचनालयात येऊन आपल्या आवडीची पुस्तके मनसोक्त वाचावीत व त्यावर व्यक्त व्हावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply