नियम पाळू, पण उत्सव साजरा करूच!

कोकणवासीयांचा लाडका गणेशोत्सव सुरू होत आहे. दर वर्षीप्रमाणे मात्र या वर्षी या उत्सवाच्या उत्साहाला भरते आलेले नाहीत. करोनाचे संकट हे त्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. करोनामुळे जगभरातील उद्योगधंद्यांवर मोठे संकट आले. मुंबई बंद पडली. मुंबईवर अवलंबून असलेले चाकरमानीही संकटात आले. ते काही प्रमाणात सौम्य करण्यासाठी कोकणात आपल्या गावी येऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसमोर नियमांचे मोठे संकट उभे ठाकले. एसटी, रेल्वेच्या गाड्या वेळेवर सुरू झाल्या नाहीत, त्यामुळे प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे ई-पास, गावी पोहोचल्यानंतरच्या गृह विलगीकरणाचे नियम, एसटीने आलात, तर दहा दिवस आणि रेल्वेने आलात, तर तीन दिवस विलगीकरणात राहावे लागेल, असले विचित्र नियम जाहीर झाले. त्यामुळे चाकरमानी हतबल झाले. कमालीच्या संभ्रमात टाकणाऱ्या नियमांमुळे चाकरमान्यांचे गावी राहणारे आप्तस्वकीयही गोंधळात पडले. अनेकांनी आपल्याच चाकरमानी भाऊबंदांना ठरावीक वेळेतच गावी यायचे बंधन घातले. अशी सारी विघ्ने आली तरी ती पार करून चाकरमानी गावोगावी दाखल झाले आणि बहुसंख्य घरांमध्ये त्यांच्यासह, तर काही ठिकाणी त्यांच्याविना कोकणातील गणेशोत्सव साधेपणाने का होईना, पण घरोघरी साजरा केला जाणार आहे.

गणपती हे कोकणवासीयांचे लाडके दैवतच नव्हे, तर त्यांच्या घरचा वर्षातून काही दिवसांसाठी येणारा असला तरी नित्याचा पाहुणा आहे. कोकणातील प्रत्येक गोष्ट गणपतीशी निगडीत असते. दशावतार, जाखडीसारख्या लोककलांच्या प्रारंभापासून ते देण्याघेण्याच्या व्यवहारांपर्यंत, विवाहाच्या बोलण्यांपासून ते घराचा, दुकानाचा, व्यवसायाचा प्रारंभ करण्यापर्यंत गणेशचतुर्थीचा मुहूर्त साध्य करण्यासाठी प्रामुख्याने सिंधुदुर्गवासीयांची धडपड असते. वर्षभरातील सुखदुःखे याच वर्षातून एकदा येणार्यार पण मनात कायम वसणाऱ्या पाहुण्याकडे प्रत्येक कोकणवासीयाला सांगायची असतात. करोना हे या वर्षीचे केवळ कोकणवासीयांच्या किंवा राज्याच्या किंवा देशाच्या नव्हे, तर संपूर्ण जगासमोरचे सर्वांत मोठे संकट आहे. त्यावर अजूनही उपाय सापडलेला नाही. सावधगिरी बाळगणे आणि आजार आपल्यापर्यंत येऊ नये, यासाठी प्रयत्न करणे एवढेच लोकांच्या हाती आहे. दररोज करोनाविषयीच्या भयावह आणि सुखदायक बातम्याही येत आहेत. असे असले, तरी कोकणातील उत्सव मात्र थांबणार नाही. कारण करोनासारखे संकट आले, तरी कोकणवासीयांचा उत्साह कमी झालेला नाही. करोनामुळे यावर्षी घरगुती उत्सवांच्या संख्येत घट होईल, असे मानले जात होते. प्रत्यक्षात तसे झालेले नाही. घरगुती गणपतींची संख्या वाढलीच आहे. जे चाकरमानी येऊ शकले नाहीत, त्यांच्या घरात शेजाऱ्यांनी गणपतीची यथासांग पूजा करायचे ठरवले आहे. सार्वजनिक उत्सवांनीही नेहमीचा भपका टाळून उत्सव साधेपणाने साजरा करायचे ठरवले आहे. करोनाचे नियम पाळू, पण उत्सव साजरा करूच, याच भावनेतून ते आपले लाडके दैवत असलेल्या गणपतीच्या सेवेची पर्वणी साधणार आहेत, असाच याचा अर्थ आहे.

याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समितीचे राजा सामंत यांनी व्यक्त केलेली भावना महत्त्वाची आहे. समूहाने एकत्र यायचे नसले, तरी घरोघरी जमेल तशी भजनांची सेवा गणपतीसमोर केली जाणार आहेच. संकट कोणतेही असले, तरी गणपती म्हणजे सर्व विघ्नांचे हरण करणारी देवता आहे. वर्षातून एकदा येणारा त्याचा उत्सव साजरा केल्याशिवाय भक्त गप्प बसणार नाहीत. अनेक लोककलांमध्ये अर्वाच्य शब्दप्रयोग, शिवीगाळ करण्यासारख्या अनिष्ट प्रकारांनी शिरकाव केला आहे. लोकांची गर्दी खेचण्यासाठी अशा अयोग्य मार्गांचा अवलंब केला जातो. या वर्षी मात्र त्याला चांगलाच आळा बसणार आहे. लाडक्या दैवतासमोर खरी, योग्य आणि निष्काम सेवा यावेळी सादर होणार आहे. ही इष्टापत्तीच आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सगळ्या जगाचे कल्याण करण्याचे सामर्थ्य ज्या गणपतीमध्ये आहे, त्याचा उत्सव साजरा करताना प्रत्येक कोकणवासीय स्वतःबरोबरच जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी, ‘विघ्नहर्त्या, आता सारे तुझ्याच हाती आहे,’ असे गाऱ्हाणे घातल्याशिवाय राहणार नाही.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २१ ऑगस्ट २०२०)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा २१ऑगस्टचा अंक मोफत डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply