नवी दिल्ली : लॉकडाउन टप्प्याटप्प्याने उघडण्याच्या प्रक्रियेतील पुढचा टप्पा म्हणजेच ‘अनलॉक ४’च्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने आज (२९ ऑगस्ट) रात्री जाहीर केल्या. त्यानुसार, कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्वीपेक्षा अधिक कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे; मात्र कंटेन्मेंट झोनमधील कडक निर्बंध सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरूच राहतील, असेही त्यात म्हटले आहे. या मार्गदर्शक सूचना विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून, तसेच सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांशी चर्चा करून तयार करण्यात आल्या आहेत. या सूचना एक सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.
नव्या मार्गदर्शक सूचना
- सात सप्टेंबरपासून मेट्रो रेल्वे टप्प्याटप्प्याने सुरू होणार. त्यासाठी वेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी होणार.
- सामाजिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम, तसेच अन्य कार्यक्रम जास्तीत जास्त १०० माणसांच्या उपस्थितीत करता येणार. यासाठी २१ सप्टेंबरपासून परवानगी मिळणार. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हँड वॉश आदींचा वापर बंधनकारक.
- २१ सप्टेंबरपासून खुली म्हणजेच ओपन एअर थिएटर्स सुरू करण्यास परवानगी.
- शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस आदी शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांसाठी, तसेच शैक्षणिक कामकाजासाठी ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार. ऑनलाइन/दूरशिक्षणाला प्राधान्य/प्रोत्साहन.
- कंटेन्मेंट झोन नसलेल्या ठिकाणी खालील शैक्षणिक कामकाजांना २१ सप्टेंबरपासून परवानगी देता येऊ शकेल. त्याची अंमलबजावणी कशी करायची, याच्या सूचना वेगळ्या दिल्या जातील.
- ऑनलाइन शिक्षण, टेलि कौन्सिलिंग आदी कामकाजासाठी ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत बोलावण्याची परवानगी राज्य सरकारे देऊ शकतात.
- कंटेन्मेंट झोन नसलेल्या ठिकाणी नववी ते बारावी या वर्गांतील विद्यार्थ्यांना शंकानिरसनासाठी शाळेत येऊन शिक्षकांची भेट घेण्याची परवानगी देता येऊ शकेल. अर्थात, हे ऐच्छिक असेल आणि त्यासाठी त्यांच्या पालकांची लेखी परवानगी आवश्यक असेल.
- राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य वा केंद्र सरकारकडे नोंदणी केलेल्या अल्पकालीन प्रशिक्षण संस्थांमध्ये कौशल्य किंवा व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली जाईल.
- पीएचडीचे विद्यार्थी, तसेच तांत्रिक किंवा व्यावसायिक शाखांतील पदव्युत्तर शिक्षणक्रमांचे विद्यार्थी आदींसाठी उच्च शिक्षण संस्थांना परिस्थितीनुसार विचार करून परवानगी दिली जाऊ शकते.
- सिनेमा हॉल्स, स्विमिंग पूल्स, एंटरटेन्मेंट पार्क्स, थिएटर्स आणि यांसारख्या अन्य ठिकाणांवर बंदीच.
- गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्याव्यतिरिक्तची आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणे बंद
- या दोन मुद्द्यांतील बाबी वगळता अन्य बाबींना कंटेन्मेंट झोनबाहेर परवानगी
- कंटेन्मेंट झोनमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत कडक लॉकडाउन लागूच. तेथे फक्त अत्यावश्यक बाबींनाच परवानगी.
- जिल्हा प्रशासनाने लहानात लहान कंटेन्मेंट झोन आखण्याची सूचना, जेणेकरून कमीत कमी ठिकाणचे कामकाज बंद राहील.
- कंटेन्मेंट झोन वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केले जातील.
- कंटेन्मेंट झोनबाहेर राज्य सरकारांनी वेगळे लॉकडाउन निर्बंध लादू नयेत. असे निर्बंध लागू करायचेच झाल्यास केंद्र सरकारशी चर्चा आवश्यक.
- राज्यांतर्गत, तसेच राज्याबाहेरील मालवाहतूक, तसेच व्यक्तींच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत. अशा प्रवासासाठी वेगळी परवानगी, ई-पास, संमती यांची आवश्यकता नाही.
- रेल्वेद्वारे होणारी प्रवासी वाहतूक, देशांतर्गत हवाई वाहतूक, परवानगी दिलेली सागरी वाहतूक, वंदे भारत मोहिमेअंतर्गत होणारी हवाई वाहतूक आदी प्रवासी वाहतूक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरनुसार सुरू राहणार.
- कोविड १९च्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळणे आवश्यक. व्यापाऱ्यांनी दुकानांमध्ये ग्राहकांना पुरेसे शारीरिक अंतर राखता येण्यासारखी व्यवस्था करणे आवश्यक.
- १० वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील व्यक्ती, गर्भवती महिला, तसेच काही आजार असलेल्या व्यक्तींनी घरीच राहणे इष्ट. अगदीच महत्त्वाचे कारण किंवा वैद्यकीय तपासणी या कारणांव्यतिरिक्त शक्यतो त्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला.
- आरोग्य सेतू अॅप्लिकेशन वापरणे सुरूच ठेवणे इष्ट. संस्था, कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना हे अॅप वापरण्याच्या सूचना देणे गरजेचे.
(केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेले पत्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
