रत्नागिरी : राष्ट्रीय महामार्ग विभागाने सूचित केल्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवरील दोन्ही पूल, तसेच संगमेश्वरजवळील शास्त्री पूल या पुलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. त्याकरिता या दोन्ही पुलांवरील वाहतूक १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत दुपारी १२ ते सायंकाळी चार या वेळेत चार तास बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणमधील वाशिष्ठी नदीवरील पूल क्र. १ वरील वाहतूक १० सप्टेंबर रोजी, पूल क्र. २ वरील वाहतूक ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत बंद राहणार आहे. संगमेश्वरजवळच्या शास्त्री नदीवरील पूल १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत बंद राहणार आहे.
या पुलांपैकी वाशिष्ठी पुलाकरिता पर्यायी रस्ता म्हणून चिपळूण बायपास फरशी तिठा हा मार्ग तर शास्त्री पुलाकरिता पर्यायी रस्ता म्हणून शास्त्री पूल कसबा अंत्रवली फाटा, कडवई-तुरळ वापरता येऊ शकेल, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सूचित केले आहे.

