माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक ५ (पेंडूर शेतीशाळेतील आबा मास्तर)

आबा मास्तर

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील पाचवा लेख आहे सदानंद मनोहर कांबळी यांचा… पेंडूर-खरारे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जीवन शिक्षण विद्यामंदिर शेतीशाळेतील शिक्षक राघोजी जयराम सावंत (आबा मास्तर) यांच्याविषयीचा…
………
माझ्या वाचन-लेखनाचा श्रीगणेशा झाला, ती माझी पहिली शाळा म्हणजे पेंडूर-खरारे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जीवन शिक्षण विद्यामंदिर शेतीशाळा. पेंडूर गावातील कर्ली नदीच्या किनाऱ्यावर विस्तीर्ण बारमाही शेतमळ्यासह वसलेली, माझे आजोळ असलेली ही सुंदर खरारेवाडी! गावच्या मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यानजीक भव्य इमारत असलेली, सातवीपर्यंत वर्ग असलेली अशी माझी शाळा आजही डौलाने उभी आहे. आम्ही शाळेत असताना शेती हा अनिवार्य विषय होता; पण शेती हा विषय संपल्याने आता आजूबाजूचा हिरवागार मळा, केळीच्या बागा… सारे संपले आहे. सभोवार फक्त कुंपणच!!

आमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते पाटकर आणि त्यांचे सहकारी शिक्षक पाच! या सर्व शिक्षकांत मला जास्त आवडायचे ते माझ्या आजोळचेच आमचे इयत्ता सहावी-सातवीचे वर्गशिक्षक आबा मास्तर!

आबा मास्तरांचे पूर्ण नाव राघोजी जयराम सावंत. शाळेतच नव्हे, तर सारेच त्यांना म्हणायचे आबा मास्तर! मध्यम बांधा, गव्हाळ वर्ण, कानावर केस, सदा स्मितहास्य, तुरुतुरु चालण्याची सवय हे सारे आजही आठवते.

सातवीत होणाऱ्या प्राथमिक शालान्त परीक्षेला (पीएससी) त्या काळी खूप महत्त्व असायचे. त्या परीक्षेच्या निकालावरून शाळेचा दर्जा ठरायचा. म्हणूनच स्थानिक असलेल्या आमच्या आबा मास्तरांकडे सातवीचा वर्ग असायचा. आमचे सातवीचे वर्गशिक्षकच नव्हे, तर सर्व विषयांचे शिक्षक आबा मास्तर होते.

आम्हा सातवीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक हे शेतकरी आणि अर्धशिक्षित. आमच्या अभ्यासाकडे त्यांचे लक्ष कमीच. त्यामुळे आमचे आबा मास्तर आपल्या घरी आमचा अभ्यास घेत असत. जानेवारीपासून परीक्षेपर्यंत सातत्याने हा अभ्यास सुरू असे. ह्या अभ्यास वर्गामुळेच आमच्या वर्गाचा निकालही उत्तम!!

रात्रीच्या अभ्यासवर्गामुळे आम्हाला स्वयं-अध्ययनाची दिशा मिळाली. आमच्यावर अभ्यासाचे संस्कार झाले आणि पुढे बहिस्थ विद्यार्थी म्हणून पदवी मिळवताना उपयोगी पडले. रात्रीचे वर्ग कंदिलाच्या प्रकाशात विनामूल्य चालत. विद्यार्थ्यांसाठी धडपडणाऱ्या मास्तरांच्या प्रेरणेने शिक्षकी पेशात विद्यार्थ्यांच्या बहिस्थ, तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ज्यादा वर्ग घेतले. या सगळ्याची एकमेव प्रेरणा म्हणजे आबा मास्तर! गुरुजींच्या प्रेरणादायी स्मृतीस शतशः नमन.

 • सदानंद मनोहर कांबळी
  (निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, लेखक, कवी)
  पत्ता : मु. पो. रेवंडी ओझर, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.
  मोबाइल : ९४२३८ ७८६४६.
  …..
  (पुढचा लेख बाबू घाडीगावकर यांचा)
  (या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

One comment

 1. कोकण मिडियाने आम्हा सारख्या अव्यक्त माणसांना मनातल्या गुरुजनां बद्दलच्या भावना व्यक्त करण्याची संधी दिली आणि माझी शाळा माझे शिक्षक या सदरा खाली आमच्या गुरुजनाना दूरवर त्यांच्या विद्यार्था पर्यत या गुरुजनांचा महिमा पोहोचविल्या बद्दल आपल्या मिडियाला मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏 ..

Leave a Reply