मुंबई : करोना साथीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्राला नवी उभारी देणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) इंटर्नशिप कार्यक्रम सुरू करत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पर्यटन उद्योगाला असलेला वाव लक्षात घेता या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी इंटर्नशिपचा हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. इच्छुकांनी येत्या २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करायचे आहेत. (अर्ज करण्यासाठी थेट लिंक बातमीच्या शेवटी दिली आहे.)
नवपदवीधरांसाठी इंटर्नशिपचा कार्यक्रम एमटीडीसी सुरू करीत आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना सोशल मीडिया बिझनेस डेव्हलपमेंट, एचआर, आयटी अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच एमटीडीसीच्या अखत्यारीत असलेली निसर्गरम्य रिसॉर्ट, अॅडव्हेंचर पार्क, डायव्हिंग संस्था इत्यादींच्या विकासासाठी आपल्या कल्पना मांडता येतील आणि विकासप्रक्रियेत सक्रिय सहभाग घेता येईल. त्याचप्रमाणे विभागाचे मंत्री तसेच महामंडळाचे अधिकारी यांच्यासोबत काम करण्याची संधीदेखील उपलब्ध होणार आहे. सहभागी तरुणांना दहा हजार रूपये मानधन आणि एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या सहीने अनुभव प्रमाणपत्र दिले जाईल. त्यांना काम करण्यासाठी कार्यालयात येणे अनिवार्य आहे. सोशल मीडियाचे काम करणाऱ्या उमेदवारांचे मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभुत्व असावे. इंटर्नशिप कार्यक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा असेल, मात्र जे उमेदवार आपले काम कुशल व निर्विवाद करतील, त्यांना ५ महिन्यांचा वाढीव कालावधी दिला जाईल. २५ वर्षांपेक्षा खालील वयाचे उमेदवार या इंटर्नशिप कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबर २०२० रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यात युवकांच्या नवकल्पनांचीही आवश्यकता आहे. एमटीडीसीसोबत महाराष्ट्राचे पर्यटन पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे पर्यटन वैभव संपूर्ण विश्वाला दाखवण्यासाठी या कार्यक्रमात तरुणांनी सहभागी व्हावे. प्रवास व पर्यटनाची आवड असेल तर तरुणांनी एमटीडीसीच्या या नवीन मोहिमेचा भाग व्हावे. कार्यकुशल उमेदवारांच्या संकल्पनांना यात निश्चित चालना दिली जाईल, असे ते म्हणाले.
कोकणात पर्यटन उद्योगाला मोठा वाव आहे. मात्र कोकणातील तरुणांना त्यादृष्टीने मार्गदर्शन मिळत नाही. एमटीडीसीने आयोजित केलेल्या इंटर्नशिप कार्यक्रमामुळे या उद्योगात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना दिशा मिळण्याची शक्यता आहे.
थेट अर्ज करण्याकरिता लिंक : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdAr2u-vbWn4tuEM6xdGjUKCIXRvovaVFrPEFaczyv7CqCE4A/viewform


It’s a good initiative. Will also help the young minds to give their interesting ideas. I would love to be a part of it.