माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक ६ (त्रिंबक जनता विद्यामंदिरातील मेहेंदळे सर)

प्रसाद मेहेंदळे

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील सहावा लेख आहे बाबू गोविंद घाडीगांवकर यांचा… त्रिंबक (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जनता विद्यामंदिरातील प्रसाद विद्याधर मेहेंदळे यांच्याविषयीचा…
………
मी माझे माध्यमिक शिक्षण त्रिंबक (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जनता विद्यामंदिर या शाळेत पूर्ण केले. या शाळेत आम्हाला आठवीनंतर प्रसाद विद्याधर मेहेंदळे सर गणित शिकवत. एकाच आडनावाचे दोन शिक्षक शाळेत असल्याने आम्ही त्यांना प्रसाद सर याच नावाने हाक मारत असू. दोनच वर्षांपूर्वी शाळेत रुजू झालेले प्रसाद सर खूप रुबाबदार दिसत. गणितातले महत्त्वाचे संबोध शिकवत असताना प्रसाद सर गणितातल्या प्रत्येक घटकाची दैनंदिन व्यवहाराशी सांगड घालत. त्यामुळे किचकट संबोध चांगल्याप्रकारे स्पष्ट होत.

मी त्या वयात प्रकृतीने खूपच किरकोळ व मरतुकड्या असल्याने सर कधी मारत नसत. याउलट माझ्या घरची सगळी परिस्थिती त्यांना माहीत असल्याने माझे खूप लाड करत. माझ्या अभ्यासातील प्रगतीचे सगळ्यांसमोर कौतुक करत. प्रसाद सर गणित शिकवत असले, तरी कधी कधी मराठीही शिकवत. एकदा माझे अशुद्धलेखन बघून प्रसाद सर माझ्यावर खूप चिडले. त्यांनी माझ्या वहीतली पाने टराटरा फाडली. सगळे पुन्हा लिहावयास लावले. मला त्या दिवशी सरांचा रागही आला; पण संध्याकाळी सरांनी मला आपुलकीने जवळ बोलावून योग्य व वळणदार अक्षरलेखनाचे मार्गदर्शनही केले. नंतर शाळेतील सर्व निबंध व लेखनस्पर्धेत माझा पहिला किंवा दुसरा क्रमांक ठरलेला असे.

पूर्वी नारळाच्या झावळ्यांपासून झाप व केरसुण्या बनविण्याचा आमचा छोटासा व्यवसाय होता. मी माझ्या बाबाबरोबर प्रसाद सरांच्या बागेत गेल्यावर झावळीवर बसून झाप विणताना तुरुतुरु चालणारे माझे हात बघून प्रसाद सर थक्क होत असत. एके दिवशी ‘बाबू, मला शिकवशील का रे झाप विणायला?’ असं सरांनी विचारताच मी खूप लाजलो; पण प्रसाद सरांनी माझ्याकडून झाप आणि केरसुणी दोन्ही शिकून घेतलं. ‘मी बाबूचा अभ्यासातला गुरू आणि बाबू माझा ह्या कलेतला गुरू!’ असे प्रसादसर चारचौघांत निःसंकोचपणे सांगत.

मात्र जेमतेम पाच-सहा वर्षांचीच सेवा झाली असताना माझ्या या गुरुमाऊलीवर काळाने झडप घातली. शाळेच्या कामासाठी कणकवली येथे जात असताना वरवडेनजीकच्या धोकादायक वळणावर स्कूटर घसरून झालेल्या अपघातात प्रसाद सर आम्हां सर्वांना पोरके करून कायमचे निघून गेले; पण आजही कधी हायस्कूलमध्ये गेलो तर समोरून प्रसाद सर येतायत आणि मला पोटाशी कवटाळतायत असाच भास होतो.

 • बाबू गोविंद घाडीगांवकर
  (दापोली (जि. रत्नागिरी) येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत, लेखक, कवी)
  पत्ता : मु. पो. त्रिंबक, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६१४
  मोबाइल : ९४२१७ ९५९५५
  …..
  (पुढचा लेख अर्चना कोदे यांचा)
  (या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply