माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक १६ (माणगाव हायस्कूलमधील चव्हाण सर)

श्री. अजय चव्हाण

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील १६वा लेख आहे श्रद्धा वाळके यांचा… माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अजय चव्हाण यांच्याविषयीचा…
………
माझ्या मनातल्या शिक्षकांच्या आठवणींना अगरबत्तीचा सुगंध आहे… मन प्रसन्न करणारा… आदराने भारून टाकणारा…

‘वाडोस नंबर एक’ शाळेमध्ये सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुलांनी अमोल अनुभव घेतलेत. शाळा म्हणजे दुसरं घरच होतं. माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात म्हणजेच माणगाव हायस्कूलमध्येही मला उत्तमोत्तम शिक्षक लाभले, ज्यांनी मुलांवर पोटच्या मुलांसारखी माया केली. श्री. अजय चव्हाण सर तर माझे सर्वांत आवडते सर.

आठवीत आल्यावर वर्गांच्या पाच-पाच तुकड्या, शेकडो मुलं. त्यातली बरीच तर पाचवीपासूनच होती शाळेत. प्रत्येक तासाला नवीन शिक्षक मुलांना आडनावाने हाक मारणारे, मैत्रिणीही अजून झाल्या नव्हत्या. कळपातून चुकल्यासारखंच झालं मला!

बीजगणिताच्या तासाला चव्हाण सर वर्गात आले. नवागतांची ओळख झाली. क्लू देत उत्तरापर्यंत नेण्याच्या सरांच्या हातोटीमुळे मी नवखेपण विसरून गेले. नैसर्गिक संख्या संच शिकवताना सर म्हणाले, ‘रेश्मा, फळ्यावर नैसर्गिक संख्या संच लिहून दाखव.’ सरांनी मला नावाने हाक मारली. मी घाबरतच म्हटलं, ‘मला महिरपी कंस काढता येत नाही सर.’ सर हसले आणि म्हणाले, ‘का? तुझे केस आहेत ना महिरपी कंसासारखे.’ मला एकदम मोकळं वाटलं. सरांबद्दल वाटणाऱ्या भीतीची जागा आदराने घेतली. त्या वर्षात सरांनी आमचा बीजगणिताचा पाया पक्का केला.

खरंतर सर ‘उच्च माध्यमिक’चे प्राध्यापक; पण आठवीलाही बीजगणित-भूमिती शिकवायचे. पुढे अकरावीत गणित शिकवायला सर पुन्हा आम्हाला लाभले. गणिताचं पुस्तक चाळताना आतापर्यंत शिकलेल्या गणितापेक्षा काही तरी वेगळं मला दिसलं. म्हटलं, सर आहेत, तर जमणार मला! खरंच जमलंही… सरांनी शिकवलं! सरांची एक पद्धत होती, तासाच्या शेवटी विचारप्रवर्तक उदाहरणं देण्याची! सरांच्या शाबासकीसाठी मी झपाटल्यासारखी ती सोडवी, जागरण करायला लागलं तरीही.

बारावीच्या पूर्वपरीक्षेत पेपर सोडवताना शेवटचं इंटिग्रेशनचं उदाहरण मला सुटत नव्हतं. सर पर्यवेक्षकांना ब्रेक देण्यासाठी आले होते, म्हणाले, ‘तुला सुटणार.’ काय आश्चर्य! उदाहरण सुटलं. परीक्षा हॉलमध्येच मी ओरडले, ‘सर सुटलं!’ सर हसले… नेहमीसारखेच.

सर नेहमीच आम्हाला प्रोत्साहित करायचे, आत्मविश्वास द्यायचे, वाव द्यायचे. आज शिक्षक म्हणून वावरताना त्यांचा हसरा चेहरा माझ्यासाठी दिशादर्शक आहे.

– श्रद्धा सतीश वाळके (रेश्मा बाबुराव आगलावे)
पत्ता : मु. पो. मसदे विरण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०८
मोबाइल : ९४०४७ ७६६३३
ई-मेल : shraddhawalke80@gmail.com
…..
(पुढचा लेख मंदार सांबारी यांचा)
(या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply