माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक २० (ओसरगाव शाळेतील काणेकर बाई)

काणेकर बाई

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील शेवटचा म्हणजेच २०वा लेख आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) रामचंद्र आंगणे यांचा… जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा ओसरगाव नंबर १ (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) या शाळेतील शिक्षिका सुनंदा गोविंद काणेकर यांच्याविषयीचा…
………
शिकावे कसे? जगावे कसे? परिस्थितीशी झगडावे कसे, हे ज्या पवित्र वास्तूत शिकलो, ती तलावाशेजारी निसर्गरम्य वातावरणात वसलेली माझी आठवणीतली शाळा ‘ओसरगाव नंबर १.’

या शाळेत ज्यांचा परीसस्पर्श झाला त्या गुरुमाऊली म्हणजेच आमच्या लाडक्या काणेकर बाई. श्रीमती सुनंदा गोविंद काणेकर (व्रता चंद्रकांत हुले) हे त्यांचे नाव. मी प्राथमिक शिक्षण घेतानाची परिस्थितीच वेगळी होती. जवळजवळ सर्वच शाळांमध्ये अपुरी शिक्षकसंख्या. आमची शाळाही त्याला अपवाद नव्हती.

‘सहामाही परीक्षा जवळ इली, तरी इंग्रजीचा पुस्तक उघडला नाय आम्ही’ हे आमचे निरागस शब्द ऐकून बाई चिंतित झाल्या. या विषयाला शिक्षक नसल्याने आमचे तास होत नव्हते. बाईंनी थोडा विचार केला आणि आमचे चिंताग्रस्त चेहरे बघून म्हणाल्या, ‘काळजी करू नका. आजपासून मी तुम्हाला सगळेच विषय शिकवते. अभ्यास मात्र वेळेत आणि भरपूर केला पाहिजे.’

… आणि मग बाई थांबल्याच नाहीत. प्रत्येक विषयाकडे आणि विद्यार्थ्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन अभ्यास घेतला. बाईंची आणि आम्हा मुलांची छान केमिस्ट्री जुळली. मला तर वाटतं इयत्ता सहावीमध्ये माझ्या भराडीदेवीने या गुरुमाऊलीची आणि माझी भेट घडविली. त्यामुळेच मी पुढे जाऊ शकलो. बाईंच्या स्वभावातील प्रामाणिकपणा, नम्रता, शिस्त, श्रमनिष्ठा, श्रमप्रतिष्ठा, वक्तशीरपणा, कर्तव्यतत्परता हे उत्तम गुण माझ्या अंगी बाणवण्याची तिथूनच सुरुवात झाली. माझ्या शालेय जीवनाला ‘टर्निंग पॉइंट’ देणाऱ्या काणेकर बाईच…

‘स्पर्धा परीक्षांचा अनुभव परीक्षेला बसूनच घ्या’ म्हणून सांगणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीत मार्ग कसा काढावा हे शिकवणाऱ्या, घोकंपट्टीवर जास्त भर न देता प्रत्यक्ष अनुभूती देणाऱ्या, शाळा चार भिंतींत न ठेवता त्याहीपलीकडे दैनंदिन जीवनातील अनुभव देणाऱ्या, पुस्तकी ज्ञानाबरोबरच स्वच्छता, सारवण, सजावट कशी करावी हे स्वतः प्रात्यक्षिकाद्वारे शिकवणाऱ्या काणेकर बाई आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य.

स्नेहाचा स्पर्श!
कौतुकाची थाप!!
सदैव आहे ज्यांना
प्रगतीचा ध्यास!!!
अशा आहेत माझ्या
गुरुमाऊली खास!!!!

अशा माझ्या लाडक्या काणेकर बाईंना सुदृढ आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना…

– रामचंद्र विष्णू आंगणे
(उपशिक्षणाधिकारी – प्राथमिक, जि. प. सिंधुदुर्ग)
पत्ता : मु. पो. ओसरगाव गवळवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०३
सध्या वास्तव्य : रुई कॉलनी, कलमठ गावडेवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०२
मोबाइल : ९४२२९६३६२४, ९३२२०३३६७३
ई-मेल : anganeram@gmail.com
…..
(‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील हा शेवटचा लेख आहे.या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply