‘जनयुग’कार अॅड. श्री. स. खांडाळेकर (सिंधुसाहित्यसरिता – २०)

अॅड. श्रीपाद (भाई) खांडाळेकर (२३ नोव्हेंबर १९२४ – ८ जुलै २०१०)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा शेवटचा म्हणजेच २०वा लेख… अॅड. श्री. स. खांडाळेकर यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे सदानंद कांबळी यांनी…
………
लाटामागुनि लाटा धावती सागर किनारी…
सर्व क्षेत्रांत मालवणची मिरासदारी…
माझ्या मालवणच्या लाल मातीने आणि रूपेरी वाळूने चित्रकारांपासून पत्रकारांपर्यंत अनेक थोर दिग्गज महाराष्ट्राला दिले. होराभूषण वसंत लाडोबा म्हापणकरांपासून ‘कालनिर्णय’कार ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकरांपर्यंत; नाटककार मामा वरेरकरांपासून संगीत नटवर्य मामा भार्गवराम आचरेकरांपर्यंत; तसेच मच्छिंद्र कांबळींपासून नटवर्य कमलाकर सारंगांपर्यंत; नाट्यनिर्माते मोहन तोंडवळकर, रघुवीर तळाशीलकर यांच्यापासून भार्गवराम पांगेंपर्यंत; मूर्तिकार राम-श्याम सारंग बंधूंपासून चित्रकार एम. आर. आचरेकरांपर्यंत; क्रिकेटवीर पांडुरंग साळगावकरांपासून सिनेनट मास्टर भगवानपर्यंत (पालव)… असे एक ना अनेक! मालवणच्या दोन्ही साप्ताहिकांचे संपादक मालवणवासीयांना आपल्या घरचे वाटतात. त्यापैकी आघाडीचे संस्थापक संपादक अनंतराव महाजन आणि ‘जनयुग’कार श्री. स. खांडाळेकर! पन्नास वर्षांपूर्वी मालवणसारख्या छोट्या शहरात पत्रकारिता जोपासणारे ‘जनयुग’कार अॅड. श्रीपाद सदाशिव ऊर्फ भाईसाहेब खांडाळेकर… सर्वसामान्यांचे पत्रकार!

‘जनयुग’कार भाईसाहेबांचा जन्म २३ नोव्हेंबर १९२४ रोजी झाला. ते पेशाने वकील होते आणि एक नामांकित पत्रकार होते. त्यांनी सुरू केलेले जनयुग साप्ताहिक सर्वांच्या जिव्हाळ्याचे. आजही ते तेवढेच लोकप्रिय आहे. पुणे-मुंबईकरच नव्हे, तर इतरत्र असलेले मालवणवासीय घरच्या पत्रासारखी मालवणची व आजूबाजूची बातमी समजण्यासाठी ‘जनयुग’ची आतुरतेने वाट पाहतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील लहान-मोठ्या घडामोडींची वृत्ते आजही दूरदूरचे वाचक आवर्जून वाचत असतात. जनयुग हे ग्रामीण भागात लोकजागृती करणारे साप्ताहिक! मालवणी मुलखात काय घडले, रापणीला कसले कसले मासे मिळाले, अशा गोष्टी समजण्यासाठी वाचक आतुर असत. बाहेरच्या वाचकांना काही कारणामुळे ‘जनयुग’चा अंक वेळीच मिळाला नाही, तर फोन लावून चौकशी करत. ‘जनयुग’मध्ये विविध सदरे असत. सदा वराडकरांची ‘फिरकी’ तर लोकप्रियच! सुप्रसिद्ध मालवणी लेखक अरविंद म्हापणकर सुंदर कथा लिहीत. जनयुग साप्ताहिक वाचकांच्या जिव्हाळ्याचे होते आणि तो वारसा आजही सुरू आहे.

सर्वसामान्यांचे पत्रकार
जनयुग साप्ताहिकात सर्वसामान्यांच्या प्रश्नांची दखल कशी घेतली जात असे, त्याबद्दलचा चाळीस वर्षांपूर्वीचा हा एक किस्सा! आमचा गाव रेवंडी, आमची कोणीवाडी एका बाजूची! आमच्या वाडीतून वीजवाहिन्या गेलेल्या होत्या; पण चार-पाच घरांना वीज नव्हती. संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार अर्ज-विनंत्या करूनही वीजपुरवठा होत नव्हता. मी त्याबाबतचे वृत्त घेऊन जनयुग कार्यालयात गेलो. भाईसाहेबांशी तसा जवळून परिचय नव्हता; पण भाईसाहेबांनी माझी आस्थेने चौकशी केली. संबंधित वृत्त आपल्या साप्ताहिकात प्रसिद्ध केले. पंधरा दिवसांनंतर आमच्याकडे वीजजोडणी झालीही! असे होते ‘जनयुग’कार!

मॅट्रिकचे निकाल पोहोचवण्यातही पुढाकार…
आज इंटरनेटमुळे आपल्याला सर्व काही घरबसल्या समजते. चाळीस वर्षांपूर्वी मॅट्रिकच्या निकालासाठी ‘जनयुग’ची खास पुरवणी असे. मॅट्रिकला बसलेल्या विद्यार्थ्यांचे पालक ही पुरवणी घेण्यासाठी दूर-दूरवरून पायी येत असत. आपल्या पाल्याचे व जवळपासच्या विद्यार्थ्यांचे पेपरातील नाव वाचून ते खूश व्हायचे!

मॅट्रिकच्या निकालाबाबत ज्येष्ठ साहित्यिक आणि भंडारी हायस्कूलचे माजी विद्यार्थी ह. मो. मराठे यांनी मालवणनगरीची माहिती लिहिताना एक आठवण लिहिली आहे. ती अशी – ‘माझ्या वेळी मॅट्रिकचा निकाल असताना माझे शेजारी पहाटेच जनयुग घेऊन आले आणि म्हणाले, ‘अरे झोपलास काय? मालवण केंद्रात तू पहिलो इलंस’! वृत्तपत्रात छापून आलेले ते माझे पहिले नाव ‘जनयुग’मध्ये होते.’

अशी ही जनयुगची लोकप्रियता! अलीकडे ‘जनयुग’चे राजाभाऊ खांडाळेकर यांनी एक वेगळीच हकीकत मला सांगितली, ‘आमच्या दुकानात दोन महिन्यांपूर्वीच पुणे येथील एक ज्येष्ठ व्यक्ती आली. तिच्यासमवेत त्यांची दोन उच्चशिक्षित मुले होती.’ ते आपल्या मुलांना म्हणाले ‘ माझ्या कपाटात माझ्या मॅट्रिकच्या रिझल्टचा जो जनयुग अंक आहे, त्या ‘जनयुग’चे हे खांडाळेकर! त्यांच्या तुम्ही पाया पडा! आमच्या पिढीला मॅट्रिकचा पहिला निकाल जनयुगने कळविला.’ राजाभाऊ पुढे म्हणाले, ‘त्यांच्या त्या भावनांनी मी भारावून गेलो.’ अशी ही वाचकांची ‘जनयुग’वरची श्रद्धा!

अनेक लेखकांना घडविणारे पत्रकार
भाईसाहेबांनी ‘साहित्य झंकार’ ही ‘जनयुग’ची साहित्यविषयक पुरवणी अरविंद म्हापणकर यांच्या सहकार्याने दरमहा सुरू केली. लुई फर्नांडिस, ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे, वैशाली पंडित, सदा वराडकर, रवींद्र धामापूरकर, रवींद्र वराडकर, भाऊ कामत, शरद पेडणेकर, वा. भा. जोशी, गजानन वालावलकर, चंद्रकांत गोखले, अरविंद जाधव, सुरेश ठाकूर असे अनेक लेखक ‘जनयुग’मुळे लेखन कलेत पारंगत झाले. याबाबत मालवणचे साहित्यिक अरविंद म्हापणकर यांनी एका लेखात असे लिहिले आहे – ‘साहित्यिक म्हणून जनयुगने माझी ओळख करून दिली. त्यानंतर अनेक दैनिकांनी, साप्ताहिकांनी, दिवाळी अंकांनी विविध विषयावर माझे लिखाण प्रसिद्ध केले.’

भाईसाहेब खांडाळेकरांनी घालून दिलेली परंपरा त्यांचे पुतणे राजाभाऊ खांडाळेकर तेवढ्याच आत्मीयतेने पुढे चालवित आहेत. म्हणूनच ताजे फडफडीत मासे आणि ताज्या फडफडीत जनयुग बातम्या यांबद्दलची मालवणवासीयांची ओढ आजून कायमच आहे आणि ती तशीच राहणार.

वैचारिक प्रबोधन करणारे अग्रलेख
‘जनयुग’कारांचे अग्रलेख म्हणजे वैचारिक प्रबोधन करणारे वाचकांचे एक बौद्धिक खाद्य असे. त्यांचे अग्रलेख म्हणजे त्यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे साक्षीदार! समाजकारण, अर्थकारण, साहित्य, अध्यात्म, शिक्षण अशा विषयांवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. ते उत्तम राजकारणी असल्याने त्यांच्या अग्रलेखामुळे तत्कालीन राजकारणावर उत्तम प्रकाश पडत असे. ते अनेक विषयांवरचे अग्रलेख अतिशय अभ्यासू वृत्तीने लिहीत असत. स्थानिक विषयांना वाचा फोडून ते रोखठोकपणे, पण समतोल वृत्तीने अग्रलेख लिहीत. त्यामुळे त्यांचे अग्रलेख लोकांना आवडत असत. जनयुग दिवाळी अंकातही कथा-कविता, विनोदी चुटके यांबरोबर ते वैचारिक लेखनालाही प्राधान्य देत असत.

एका दिवाळी अंकाच्या संपादकीयमध्ये त्यांनी लिहिले होते – ‘वैचारिक लेखन लोप पावत चालले आहे; पण मनोरंजनाबरोबर विचारांनाही खाद्य मिळावे या हेतूने वैचारिक लेखन दिले आहे.’

पत्रकारितेबरोबर सामाजिक कार्य
भाईसाहेबांचे मालवणच्या सांस्कृतिक व सामाजिक चळवळीत फार मोठे योगदान होते. सहा जुलै १९६३ रोजी मालवणात गीता मंडळ स्थापन करण्यातही भाईंचा पुढाकार होता. गीता पठण स्पर्धेसाठी ते स्वतः पदरमोड करून खर्च करीत. गीता जयंतीच्या दिवशी संपूर्ण गीता पठण करण्यावर त्यांचा कटाक्ष असे. गीता मंडळामार्फत भाईंनी अनेक सुप्रसिद्ध वक्त्यांची भाषणे, प्रवचनकारांची प्रवचनेही आयोजित केली होती. पठण स्पर्धेचा पारितोषिक समारंभही ते दिमाखाने साजरा करीत.

उन्नती मंडळाच्या स्थापनेतही भाईंचा पुढाकार होता. मालवण शहराच्या उन्नतीसाठी या संस्थेचे योगदान होते. मालवणच्या शिवाजी वाचन मंदिराचे ते अध्यक्षही होते. ही संस्था मोठी करण्यासाठी भाईसाहेबांनी जिवाचे रान केले. मालवण नगरपालिकेचे ते दहा वर्षे नगरसेवक होते. त्या नात्याने मालवण शहराच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

सामान्यांना न्याय मिळवून देणे, परोपकारासाठी कार्य करणे हे भाईसाहेबांच्या रोमारोमात भरलेले होते. असे हे ‘जनयुग’कार आठ जुलै २०१० रोजी वयाच्या ८६व्या वर्षी देवाघरी गेले. सर्वसामान्यांच्या ह्या असामान्य पत्रकारास विनम्र अभिवादन!

 • सदानंद मनोहर कांबळी
  (निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, लेखक, कवी)
  पत्ता : मु. पो. रेवंडी ओझर, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.
  मोबाइल : ९४२३८ ७८६४६.
  (सौजन्य : राजाभाऊ  खांडाळेकर, सुरेश ठाकूर, रवींद्र वराडकर. संदर्भ : जनयुग दिवाळी अंक २०१०)
  (लेखमाला समाप्त)
  ………..
  सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
  ……
  (‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply