Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

एक फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा पुन्हा सुरू; गर्दी होणार नाही अशा पद्धतीने नियोजन

Advertisements

मुंबई : करोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा २२ मार्च २०२०पासून बंद होती. त्यानंतर गेले काही महिने ही सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरू होती; मात्र येत्या एक फेब्रुवारी २०२१पासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून उपनगरीय रेल्वे सेवा (लोकल) सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वांना यातून प्रवास करता येईल. तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी, जेणेकरून सर्वाना सुविधा होईल, असेही आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी येथे बैठक झाली होती. त्यात वरिष्ठ रेल्वे अधिकारीदेखील उपस्थित होते. सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरू करण्यासाठी गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

सर्वसामान्य नागरिकांना कधी प्रवास करता येईल?
सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत, तसेच दुपारी १२ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत आणि रात्री ९ वाजल्यापासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.

कधी प्रवास करता येणार नाही?
सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वेने प्रवास करता येणार नाही. या वेळेत फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरू करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई व उपनगर परिसरातील कार्यालये व आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांत आवश्यक तो बदल करावा अशी विनंतीदेखील मुख्य सचिव यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. या बाबतीतली सूचना मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांनादेखील देण्यात आली आहे.

उपाहारगृहे व दुकानांसाठी वेळा
मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील. तसेच उपाहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट, तसेच उपाहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version