वसई-सावंतवाडी पॅसेंजरबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटना आग्रही

वसई : वसई-सावंतवाडी पॅसेंजरबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटना आग्रही झाली आहे. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नालासोपारा येथील राजा शिवाजी विद्यालयात पार पडली. त्यावेळी हा आग्रह व्यक्त झाला.

शांताराम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन सेक्रेटरी यशवंत जड्यार यांनी केले. प्रारंभी दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

वसई-सावंतवाडी पॅसेंजर सुरू करण्याबाबत प्रवासी संघटनेने गेल्या चार वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्यांची माहिती श्री. जड्यार यांनी दिली. गाडी सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे शिफारस करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्याची सूचना सुनील मासये यांनी केली. पंकज कदम यांनी रेल रोकोची, तर रंजन पाळेकर यांनी मोर्चा किंवा उपोषणाची सूचना केली.

याशिवाय बैठकीत विविध विषयांवर व्यापक चर्चा झाली.

वसई रोड स्टेशनला टर्मिनल बनवणे

पालघरमधील वसई, नालासोपारा, विरार हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. वसई,बो ईसर, भिवंडी, वाडा परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग असल्याने तेथे पूर्ण भारतातून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मुंबईच्या बाहेर रायगड जिल्ह्यात जसे पनवेल टर्मिनस आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये जसे ठाणे, कल्याण टर्मिनस आहे त्याप्रमाणे पालघर जिल्ह्यातील वसई रोड स्टेशनला टर्मिनस बनवले जावे, अशी संघटनेची मागणी आहे. यासाठी १८ जानेवारी २०२२ रोजी पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर आणि २८ जून २०२२ रोजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेले आहे.

रिक्षाचे वाढीव भाडे
वसई, विरारमधील वाढीव रिक्षाभाड्यासंदर्भात ११ डिसेंबर २०२१ रोजी प्रवासी संघटनेने वसईचे आरटीओ दशरथ वाघुले यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. त्यासंदर्भात रिक्षा युनियन आणि रिक्षा चालक-मालक यांच्यासोबत चर्चा केली. तसेच १३ डिसेंबर २०२१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन वसई, विरारमध्ये रिक्षा भाडे कमी करा अन्यथा दिनांक २० डिसेंबर २०२१ पासून सर्व वसई, विरारकर रिक्षावर बहिष्कार टाकतील, असा निर्वानिचा इशारा देण्यात आला. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने २० डिसेंबरपासून रिक्षावर बहिष्कार टाकला. त्यामध्ये पाच हजार वसई, विरारकर सहभागी झाले. मात्र आता वसई आरटीओकडून आलेल्या माहितीनुसार नवीन नियमानुसार विरार शहरामध्ये रिक्षा दरांसंदर्भात सर्व्हे करण्यात आला असून नालासोपारा, वसई आणि नायगाव येथील सर्वेक्षण करणे बाकी आहे. ते पूर्ण झाल्यावर वसई, विरारमध्ये लॉकडाऊनपूर्वीचे किंवा नवीन नियमानुसार येणारे रिक्षाभाडे आकारले जाईल.

डहाणू पनवेल मेमूच्या फेऱ्या चिपळूणपर्यंत
डहाणू, वसई, दिवा, पनवेल मार्गावर रेल्वेच्या काही ठरावीक मेमू गाड्याच धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी १ नोव्हेंबर २०२० रोजी पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना भेटून निवेदन देऊन प्रवासी संघटनेने गाड्या वाढविण्यासंदर्भात मागणी केली आहे. तसेच कोकण रेल्वेवरील खेड आणि चिपळूण ही स्टेशन खूप गर्दीची असल्याने तेथपर्यंत ही गाडी चालवल्यास कोकण रेल्वेवरील गर्दीचा भार कमी होईल, असे सुचविण्यात आले.

नायगाव जूचंद्र येथील फाटकाच्या कामाला मंजुरी
पश्चिम रेल्वेवरून कोकणात किंवा उर्वरित महाराष्ट्रात जाणारा मार्ग नसल्यामुळे त्या गाड्या वसई रोड स्टेशनवर आल्यावर तेथे इंजिन बदलावे लागते. त्यासाठी किमान अर्धा तास लागतो. ही वेळखाऊ पद्धत असल्याने पश्चिम रेल्वे वरून म्हणजेच वांद्रे आणि मुंबई सेंट्रल येथून उर्वरित महाराष्ट्रात आणि कोकणात रेल्वे सोडली जात नाही. यासाठी नायगाव जूचंद्र येथील फाटकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. यासाठी प्रवासी संघटनेच्या वतीने खासदार राजेंद्र गावित यांना १ नोव्हेंबर २०२० रोजी तर गोपाळ शेट्टी २० फेब्रुवारी २०२१ रोजी निवेदन देण्यात आले.

प्रा. मधू दंडवते यांच्या नावाने गाडी किंवा स्थानक
कोकण रेल्वेच्या प्रकल्पासाठी प्रा. मधू दंडवते यांचे मोठे योगदान आहे. खऱ्या अर्थाने ते कोकण रेल्वेचे शिल्पकार आहेत. त्यासाठीच प्रा. मधू दंडवते वसई-सावंतवाडी पॅसेंजर किंवा एक्स्प्रेस गाडी कोकण रेल्वे मार्गावर सुरू करावी किंवा ते शक्य न झाल्यास सावंतवाडी टर्मिनसला त्यांचे नाव द्यावे, अशी प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे.

पहाटे साडेतीनपासून चर्चगेट- विरार, डहाणू लोकल
पहाटे मुंबईच्या बाहेरून येणारे प्रवासी दादर, अंधेरी, बोरिवली टर्मिनसला साधारणतः साडेतीन ते चारच्या दरम्यान उतरतात. मात्र चर्चगेट ते विरारच्या दरम्यान सव्वाचारची लोकल असल्यामुळे वसई, विरारकरांची मोठी गैरसोय होते. यासाठी प्रवासी संघटनेने १९ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई सेंट्रलच्या डीआरएमकडे प्रत्यक्ष भेटून मागणी केली आहे.

पश्चिम रेल्वेवरील जादा एसी लोकल कमी करणे
पश्चिम रेल्वेवर अधिक प्रमाणात एसी लोकल सुरू केल्याने सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवासी संघटनेच्या वतीने दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई सेंट्रलच्या डीआरएमची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

मुंबई लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा
मुंबईतील लोकलमध्ये सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यांना लगेज आणि हॅंडीकॅपप्रमाणे स्वतंत्र डबा मिळावा, असे प्रवासी संघटनेने दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी पश्चिम रेल्वेच्या जनरल मॅनेजरकडे मागणी केली आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
कोकणामध्ये मोठे हॉस्पिटल नाही. परिणामी अनेक डॉक्टर रुग्णांना ऐनवेळी मुंबई किंवा गोवा येथे पेशंटला नेण्याचा सल्ला देतात. अशावेळी अनेक पेशंटना प्रवासादरम्यान आपला जीव गमवावा लागतो. यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिळावे, अशी मागणी प्रवासी संघटनेने १६ जून २०२१ रोजी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

वसई-विरारला सुसज्ज हॉस्पिटल
वसई, विरारमध्ये महापालिकेचे सुसज्ज एकही हॉस्पिटल नाही. परिणामी लॉकडाऊन काळात अनेक वसई, विरारकरांना आपले प्राण गमवावे लागले. त्यासाठी प्रवासी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडून यासंदर्भात मागणी केली आहे.

भाईंदर-नायगाव खाडीवरील पुलाला मंजुरी
वसई-विरार परिसर भाईंदरच्या खाडीच्या अलीकडे येत असल्यामुळे वसई, विरारकरांची मोठी गैरसोय होते. घोडबंदर मार्गावर नेहमीच मोठी वर्दळ असल्याने रहिवाशांचा वेळ वाया जातो. यासाठी भाईंदरच्या खाडीवर लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी आहे.

वसई, विरारमध्ये मेट्रो सेवा
वसई, विरार ही जास्त गर्दीची ठिकाण असल्याने तेथे मेट्रो सेवा सुरू करावी अशी मागणी प्रवासी संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम कित्येक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. त्यासाठी प्रवासी संघटनेने ७ जुलै २०२१ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच ८ जानेवारी २०२३ च्या वसई येथील मुंबई-गोवा जनअक्रोश समितीच्या सभेमध्येही प्रवासी संघटनेने आपला पाठिंबा दर्शवलेला आहे.

सायंकाळी मांडवी एक्स्प्रेस पनवेल स्टेशनला आल्यानंतर तेथून डहाणूला येणारे एखादी मेमू रेल्वेची मागणी प्रवासी संघटनेने करावी, अशी सूचना प्रकाश दळवी यांनी केली. बाळ वेळकर यांनी मुंबई-गोवा महामार्गासाठी काम करणाऱ्या जनआक्रोश समितीच्या कामाची माहिती दिली. प्रवीण कुडव, प्रकाश दळवी, संजय परब, सुभाष रेवाळे, भरत पंडित, जनार्दन कातकर, रंजन पाळेकर यांची कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

प्रवासी संघटनेचा जमाखर्च
प्रवासी संघटनेची एकूण जमा ६७ हजार ३७७ रुपये, तर ३१ जानेवारी २०२३ पर्यंत विविध उपक्रमांसाठी ५० हजार ५९५ रुपये खर्च झाला. संघटनेकडे १६ हजार ६८२ रुपये शिल्लक आहेत, असे सेक्रेटरी श्री. जडयार यांनी सांगितले.

सभेमध्ये विद्याधर शेलार (१००१ रुपये), रंजन पाळेकर (१००१), विजय दळवी (५००), भरत पंडित (२०००) अशी एकूण चार हजार ५०० रुपयांची देणगी प्रवासी संघटनेकडे जमा करण्यात आली.

सभेला अध्यक्ष शांताराम नाईक, सेक्रेटरी यशवंत जड्यार, प्रसाद धोंड, चंद्रकांत पाष्टे, संदेश लाड, प्रसाद दळवी, अनिल मोरे, चंद्रकांत सागवेकर, श्रीकांत चव्हाण, रामचंद्र गावडे, सुभाष रेवाळे, दीपक हातेकर, विजय दळवी, सचिन नाचणेकर, जनार्दन कातकर, अनंत मालवणकर, प्रकाश धोंड, धोंडू वेळकर, सुनील मासये, भरत पंडित, विजय सिंगारे, एकनाथ कुर्तडकर, सतीश पवार, संतोष मुळीक, संजय परब, रमेश शिवगण, प्रवीण कुडव, संजय देसाई, प्रकाश मोरे, सुदीप गावडे, विनायक शेलार आणि भरत परब उपस्थित होते.

संजय कदम, प्रकाश दळवी, संजय देसाई, विद्याधर शेलार, पंकज कदम, रंजन पाळेकर, जनार्दन कातकर, सतीश पवार, प्रवीण कुडव आणि भरत पंडित यांनी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्ष श्री. नाईक यांनी सांगितले की, आपली प्रवासी संघटना असली तरीही एखाद्या मोठ्या संस्थेला लाजवेल, असे काम ४ वर्षांत संघटनेने केले आहे. चर्चा केलेल्या अनेक कामांचा आपण पाठपुरावा करत आहोत. प्रवासी संघटनेच्या वतीने लॉकडाऊन काळात १५० कुटुंबांना धान्यवाटप करण्यात आले. चिपळूणच्या पूरग्रस्तांना दोन टेम्पो भरून धान्य आणि कपडे वाटप करण्यात आले. लॉकडाउनमध्ये मुंबई लोकल, कोकण रेल्वे, वसई, विरारमधील बससेवा, रिक्षाभाडे वाढ यासंदर्भात शासनाकडे मागणी करून त्याचा पाठपुरावा केला. प्रवासी संघटना प्रत्येक वेळीच सर्वसामान्यांच्या मागे उभी राहिली आहे.

बाळ वेळकर यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply