पुनःपुन्हा तेच ते

कवी विंदा करंदीकर यांची ‘पुन्हा पुन्हा तेच ते’ ही कविता प्रसिद्ध आहे. कवितेच्या अखेरच्या कडव्यात ते म्हणतात,
आत्माही तोच तो
हत्याही तीच ती
कारण जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते

करोनासारख्या जागतिक महामारीने संपूर्ण जग व्यापलेले असताना या कवितेचे प्रत्यंतर प्रत्यही येत आहे. करोनाचा प्रसार, त्याची बाधा, कंटेन्मेंट झोन, होम क्वारंटाइन, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन, टाळेबंदी, लॉकडाउन, इशारे, भीती, कमीजास्त होणारे रुग्णांचे प्रमाण आणि मृत्यू हे सारे शब्द वर्षभर सर्वत्र व्यापून राहिले आहेत. करोनाच्या विषाणूने घेतलेल्या नव्या स्वरूपामुळे पुन्हा एकदा त्याच शब्दशृंखला दैनंदिन जीवन व्यापू पाहत आहेत. विषाणूची बाधा होणे, रुग्णालयात राहणे, होम आयसोलेशनमध्ये राहणे आणि मरण हेच आता जगणे झाले आहे. सर्वसामान्य माणसे मात्र त्यापासून काहीही बोध घ्यायला तयार नाहीत, ही स्थिती नाकारता येण्यासारखी नाही. करोनाप्रतिबंधक निर्बंध कमी झाल्यानंतर सारे जग सुसाट सुटले आहे. कोणत्याच बंधनात कोणालाही राहायला नको आहे. त्यामुळे शासकीय निर्बंध पुन्हा एकदा वाढवावे लागत आहेत.
शासकीय यंत्रणेसमोर सध्या तरी दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही. त्यामुळेच ती स्थिती पुन्हा पुन्हा उद्भवत आहे.

रुग्ण दररोज वाढत आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. त्याबाबतची आकडेवारी दररोज प्रसिद्ध होत असली तरी त्यापासून आपण काहीतरी समजून घ्यावे, असे बहुसंख्य लोकांना वाटत नाही. मास्कचा वापर नियमितपणे करणे ही तशी फारशी कठीण गोष्ट नाही. मात्र ती टाळण्याचीच प्रवृत्ती असते. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा तर प्रत्येक ठिकाणी पुरता बोजवारा उडाला आहे. लग्न समारंभ थाटात सुरू आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळून सर्व कार्यक्रम होणार असल्याचे आवर्जून सांगितले जाते. निमंत्रण पत्रिकांमध्ये तसा उल्लेख असतो. प्रत्यक्षात मात्र ते काहीही पाळले जात नाही. राजकीय पक्षांची शक्तिप्रदर्शने ठिकठिकाणी सुरू आहेत. तेथील जोश आणि जल्लोष पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. मधल्या काळात काही घडलेच नाही, अशा पद्धतीने तो साजरा केला जात आहे. तो पाहिल्यानंतर सर्वसामान्य जनताही मोकळेपणाने वागली, नियम पाळत नसली, तर त्याला दोष देता येणार नाही.

या पार्श्वभूमीवर लवकरच येऊ घातलेल्या कोकणातील सर्वांत मोठ्या शिमगोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा काही निर्बंध घातले आहेत. मुंबई-पुण्यातून कोकणात येणार्याय चाकरमान्यांनी शक्यतो कोकणात येऊ नये, अशी सूचना त्यांनी केली आहे. त्यातही कोणी येणार असेल तर आल्यानंतर त्यांनी स्वतःहून करोनाविषयक चाचणी त्वरित करून घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे; पण या सर्व सूचनांना कोणी भीक घालेल, असे वाटत नाही. मुंबईतील काही मंडळांनी मुख्यमंत्री, आमदार-खासदारांना भेटून कोकणात होळीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांना कोणतेच निर्बंध घालू नयेत, अशी मागणी करणारी निवेदने सादर केली आहेत. हा तर गांभीर्यशून्यतेचा अतिरेक आहे.

करोनाप्रतिबंधक लसीकरणाची आकडेवारी दररोज प्रसिद्ध होत आहे. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची आकडेवारीही प्रसिद्ध होत आहे. लसीकरणानंतर काही जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही येत आहेत. त्यामुळेच याबाबत साराच संभ्रम आहे. करोना विषाणूचे मूळ अजून सापडलेले नाही, हेच त्यातून सिद्ध होते. त्यामुळे त्यावरचा उपायही अजून दृष्टिपथात आलेला नाही. म्हणूनच जगण्यासाठी धडपड करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःच स्वतःवर निर्बंध घालून घेतले पाहिजेत. शासनाने जाहीर केलेले नियम म्हणून नव्हे, तर स्वतःच्या अस्तित्वासाठीची धडपड प्रत्येकाने करायला हवी आहे. नाहीतर तेच ते आणि तेच ते दररोजचे मरण किती काळ जगावे लागेल, याचा अंदाज बांधता येणार नाही.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १९ मार्च २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा १९ मार्चचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply