होळीने दहन व्हावे अराजकाचे

महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात सध्या जे काही सुरू आहे, त्याने साऱ्यांचीच मती गुंग झाली आहे. राजकारणाची हीन पातळी म्हणजे काय, त्याचे प्रत्यंतर सध्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला येत आहे. राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीचे सुरुवातीचे वर्ष करोनामुळे कोणताही विकास न करता गेले. त्याला इलाज नव्हता. पण करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर काही चांगले निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा जनतेला होती. ती पूर्ण व्हायचे तर जाऊ द्या पण ज्यांच्या हाती राज्य सोपविले आहे आणि ज्यांच्या हाती राज्याची सुरक्षा सोपविली आहे, या दोघांचाही भ्रष्टाचाराचे धिंडवडे दररोज निघत आहेत. अराजक म्हणजे वेगळे काही नाही. सत्ता एका विश्वासावर चालत असते. राज्यकर्त्यांनी किमान नैतिकतेचे पालन करावे, असे संकेत असतात. जे शासनाच्या भूमिकेत आहेत, त्यांनी प्रजेचे रक्षण केले पाहिजे, जनतेच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत, अशी अपेक्षा असते. मात्र सध्याची राज्यातील परिस्थिती पाहिल्यानंतर कोणावर विश्वास ठेवावा, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कोण चांगले, कोण वाईट, कोण योग्य, कोण अयोग्य, कोण दिशाभूल करत आहे, हे काहीच समजेनासे झाले आहे.

राज्यात तीन पक्षांची महाआघाडी आणि विरोधकांच्या रणधुमाळीत राज्यकारभाराचा पार चोळामोळा झाला आहे. पण त्याच वेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी उदयाला आली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याची निवड झाली आहे जो पक्ष कालपर्यंत विरोधी पक्ष होता तो अचानकच सत्तारूढ झाला आहे. शरीराने एका पक्षात आणि मला ने दुसऱ्या पक्षात राहणाऱ्या नेत्याला अध्यक्षपद मिळाले आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा, जुने हिशेब, भविष्यातील आडाखे यांची गोळाबेरीज असलेली महाआघाडी रत्नागिरी जिल्हा परिषदेत अस्तित्वात आली आहे. सर्वसामान्यांच्या विचारांचा बळी देऊन निष्ठांचा तोफा निष्क्रिय झाल्या आहेत.

असे असले तरी, सामान्य जनता कितीही भोळी असली आणि आपल्या नेत्याच्या मागे अनेक वेळेला अंधपणाने जात असली तरी जनतेला सदसद्विवेकबुद्धी असते. ती बऱ्याच वेळेला सुप्त असते. ती जागृत व्हावी लागते.‌ राजकीय विषय राजकीय अंगाने जातात आणि समाजात ते विचारांचे गट निर्माण करतात. सदसद्विवेकबुद्धीचा विषय राजकीय नाही. राजधर्म आणि नैतिकता यांचे पालन करणारे शासनकर्ते आणणे, हे या सज्जनशक्तीचे काम आहे. समाजात दुष्ट शक्ती प्रबळ होतात, कारण त्याचा प्रतिकार करण्यासाठी सज्जनशक्ती उभी राहत नाही. सज्जनशक्तीची निष्क्रियता दुष्ट शक्तींना बळ देते. म्हणूनच सज्जनशक्तीला तिला जागृत करणे, हे सर्वांत मोठे काम आहे. प्रश्न केवळ आजचे सरकार जाऊन दुसरे सरकार येण्याचा नाही. एक मुख्यमंत्री जाऊन दुसरा मुख्यमंत्री त्याजागी आणण्याचा नाही. केवळ मंत्र्यांची खाती बदलण्याचा नाही. प्रश्न आहे तो राजधर्माचे पालन करणारे शासन आणण्याचा, समाजाच्या सदसद्विवेकबुद्धीशी प्रामाणिक राहणाऱ्या शासनाचा आहे. त्यासाठी सज्जनशक्तीचा दबाव निर्माण होणे गरजेचे आहे.

कोकणात सध्या होळीचा उत्सव सुरू आहे. जुने, वाईट, अनिष्ट ते जाळून टाकणे हा या सणाचा संदेश असतो. तोच अमलात आणताना अनिष्ट ते सारे होळीच्या होमात जळून जावे, त्यातून उपयुक्त ते सारे उदयाला यावे. समाजमनाची स्मरणशक्ती क्षीण असते, असे मानले जाते. तो समज दूर करून सज्जनशक्तीची निष्क्रियता दूर व्हावी आणि ती भविष्यात जेव्हा केव्हा प्रकट करायची वेळ येईल, तेव्हा आठवणीने ती प्रकट करण्याची शक्ती मिळावी, हीच अपेक्षा.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २६ मार्च २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा २६ मार्चचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply