रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे करोनाच्या काळाकरिता रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य विभागासाठी डॉक्टर्स आणि १०० परिचारिकांसह १६६ पदांची तातडीने भरती करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निवेदन जाहीर झाले आहे. या पदांना तीन महिने कालावधीसाठी नेमणूक देण्यात येणार आहे. थेट मुलाखतीद्वारे नियुक्ती केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा कोविड-१९ निवड समितीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे.
फिजिशियनच्या ६ जागा भरण्यात येणार असून एमडी मेडिसिन पदवीधारक डॉक्टरांना नियुक्ती दिली जाईल. मासिक एक लाख २० हजार रुपयांचे मानधन या पदाकरिता दिले जाणार आहे. भरती होणार असलेल्या इतर पदांचे नाव, भरावयाची पदे, शैक्षणिक अर्हता आणि मासिक मानधनाचा तपशील पुढीलप्रमाणे – भूलतज्ज्ञ, पदे १५, शैक्षणिक अर्हता एमडी अॅनस्थेशिया डीए, डीएनबी, मानधन एक लाख २० हजार, मायक्रोबायोलॉजीस्ट, पदे २, एमडी मायक्रोबायोलॉजी, ७५ हजार रुपये, वैद्यकीय अधिकारी, पदे १५ एमबीबीएस, ९० हजार रुपये, आयुष वैद्यकीय अधिकारी पदे १२, बीएएमएस, बीयूएमएस, बीडीएस (मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन आवश्यक), मानधन ४० हजार रुपये, स्टाफ नर्स पदे १०० जीएनएम, नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे रजिस्ट्रेशन आवश्यक) मानधन २० हजार रुपये, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदे १६ बीएस्सी, डीएमएलटी, मानधन १७ हजार रुपये. परिचारिका पदासाठी जीएनएम म्हणजेच बीएस्सी नर्सिंग उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, तर एएनएम म्हणजे आरोग्यसेविका उमेदवारांचा विचार केला जाणार आहे. या पदासाठी १८ हजार रुपये मानधन दिले जाईल.
निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा कोविड रुग्णालय, जिल्हा कोविड हेल्थ सेंटर किंवा कोविड केअर सेंटर यापैकी आवश्यकतेनुसार नियुक्ती दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य आरोग्य सोसायटीकडून मिळालेल्या अटी आणि शर्ती शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपरवर लिहून करारनामा सादर करणे बंधनकारक आहे. वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस आणि स्पेशालिस्ट या पदांच्या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा ६१ वर्षे असून सेवेच्या समाप्तीची मर्यादा ७० वर्षे राहील. इतर पदांच्या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा ५९ वर्षे आणि सेवासमाप्तीची मर्यादा ६५ वर्षे राहणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी rtnzpcovid2021@gmail.com या ईमेलवर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी आणि विहित नमुन्यातील अर्जांसाठी 7666924276 किंवा (02352) 221403 या फोनवर संपर्क साधावा.


