सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अॅम्ब्युलन्स कंट्रोल रूम

सिंधुदुर्गनगरी : करोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांपर्यंत पोहोचवणे आणि उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यासाठी खासगी मालकीच्या नोंदणी झालेल्या रुग्णवाहिका नागरिकांना माफक दरात आणि वेळेवर मिळण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे ॲम्ब्युलन्स कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली आहे.

कंट्रोल रूमकडून नागरिकांना त्यांच्या नजीक असणाऱ्या रुग्णवाहिकांची माहिती पुरवण्यात येणार आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चोवीस तास ही कंट्रोल रूम कार्यान्वित असणार आहे. सदर कंट्रोल रूमचा संपर्क क्रमांक (02362) 229020, तर मोबाइल क्रमांक 9359788334 असा आहे. या क्रमांकावर नागरिकांना 24 तास संपर्क साधता येणार आहे.

ज्या नागरिकांना खासगी रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे, त्यांनी संपर्क साधल्यानंतर संबंधित नागरिकांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाजवळील रुग्णवाहिका चालकाचे नाव आणि मोबाइल क्रमांक देण्यात येईल. रुग्णवाहिकांसाठी पुढीलप्रमाणे भाडे निश्चित करण्यात आले आहे. मारुती व्हॅनसाठी २५ किलोमीटर किंवा २ तासाकरिता ७५० रुपये आणि २५ कि.मी.पेक्षा जास्त वापरासाठी प्रतिकिमी १४ रुपये, टाटा सुमो, मारुती ईको, मॅटॅडोरसदृश वाहनासाठी २५ कि.मी. किंवा २ तासाकरिता ९०० रुपये आणि २५ कि.मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रतिकि.मी. १४ रुपये, टाटा ४०७, स्वराज माजदा, टेम्पो ट्रॅव्हलर इत्यादी वाहनांसाठी २५ कि.मी किंवा २ तासांसाठी एक हजार रुपये आणि त्याहून अधिक वापरासाठी प्रतिकि.मी. २० रुपये आणि आय.सी.यू. वातानुकूलित वाहनांसाठी २५ कि.मी. वा २ तासांकरिता एक हजार २०० रुपये आणि २५ कि.मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रतिकि.मी. २४ रु..

रुग्णवाहिका चालक, मालक यांनी मंजूर भाडेदरापेक्षा जादा दराची आकारणी केल्यास अथवा रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्यास कंट्रोल रूमकडे तक्रार दाखल करता येईल. तक्रारकर्त्याने रुग्णाने नाव, रुग्णवाहिका क्रमांक, कोठून कोठे असा प्रवास, प्रवासाचा दिनांक आणि वेळ इत्यादी नमूद करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply