निःस्वार्थी, निःस्पृह सुभाषपर्वाचे करोनाकाळातील तप

राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) या संस्थेचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी करोनाच्या काळातही माणुसकीला सर्वोच्च स्थान दिले. त्यातून लाड सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा उलगडा अनेकांना झाला. या संकटात अनेकांसाठी आधारवड ठरलेल्या सुभाष महादेव लाड यांचा २ मे हा जन्मदिवस. त्यानिमित्ताने करोना काळातील त्यांच्या सत्कार्याचा घेतलेला आढावा.
…….

अपेक्षन्ते न च स्नेहं न पात्रं न दशान्तरम् |
सदा लोकहिते युक्ताः रत्नदीपा इवोत्तमाः ||

(अर्थ : ज्याप्रमाणे रत्नरूपी दिवे स्नेहाची [तेलाची] पात्राची [समई वगैरे वस्तूंची] दशेची [वातीची] अपेक्षा न करता नेहमी प्रकाश पाडण्यात मग्न असतात, त्याप्रमाणे श्रेष्ठ लोक स्नेहाची [त्यांना प्रेम दिल पाहिजे अशी, ज्याला द्यायचे तो] पात्र [लायक] पाहिजे किंवा [वाईट] दशेतला पाहिजे, अशी अपेक्षा न ठेवता सतत लोकांचे कल्याण करण्यात मग्न असतात.

या सृष्टीतील सर्वाधिक सक्रिय आणि प्रभावी जीव म्हणजे सूक्ष्मजीव. गेल्या वर्षी करोना नामक सूक्ष्म विषाणूने जगभर धुमाकूळ घातला. जागतिक आपत्ती उद्भवली. करोनाविरुद्ध संपूर्ण देशासह महाराष्ट्र गेल्या सव्वा वर्षांपासून अधिक काळ लढा देत आहे. या महामारीच्या काळात अनेकांचे आप्तस्वकीय सोडून गेले. करोनाविरुद्ध लढणाऱ्या अनेक करोनायोद्ध्यांनाही आपल्या प्राणाचे बलिदान करावे लागले. देशाची अर्थव्यवस्था जशी कोलमडली, त्याचप्रमाणे अनेकांचे व्यवसाय-धंदेही बंद पडले. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्याने कुटुंब सांभाळायचे कसे, या चक्रव्यूहात सापडलेल्यांची संख्या वाढू लागली. अशा काळात हतबल झालेल्या तरुणांच्या आत्महत्येच्या बातम्या सुभाष लाड यांना अस्वस्थ करू लागल्या. समाजभान जागृत असलेल्या लाड सरांच्या मनात असंख्य विचारांचे मोहोळ उठले आणि त्यांनी आपल्या परीने ‘खार’ होऊन अशक्यप्राय सेतू बांधण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले.

राज्य आपत्कालीन निधी
सामाजिक दायित्व असलेली माणसे विखुरलेल्या स्वरूपात का असेना, समाजात आहेत यावर विश्वास असलेल्या सुभाष लाड यांनी करोना काळात अडचणीत सापडलेल्या बांधवांना मदत करण्यासाठी संघाच्या माध्यमातून “राज्यव्यापी आपत्कालीन निधी” उभारण्याचे ठरविले. याकरिता संपर्कात असलेल्या आणि सामाजिक संवेदना जागृत असलेल्या लोकांचा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करून सोशल मीडियाचा उपयोग कसा करावा, याचा आदर्श परिपाठ देत लाखाच्या वर आर्थिक निधी संकलित केला. समाजाने केलेले दान कृतज्ञतेच्या भावनेतून समाजालाच परत करावे, या उदात्त भावनेतून आपण जमा केलेल्या आपत्कालीन निधीतून संकटात सापडलेल्या देवरूख येथील मातृमंदिर संस्थेच्या गोकुळ अनाथालयाला आर्थिक सहाय्य केले.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सरकारी पातळीवरून आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत सुभाष लाड यांनी संघातील सहकारी अनिल कारेकर, गणेश चव्हाण, विलास मुरूडकर यांच्यासह मंत्रालयात जाऊन लेखाधिकारी शिरीष पालव यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ हजार रुपये सुपूर्द केले.

करोनायोद्ध्यांचा सन्मान
करोनाकाळात अनेकांनी करोना संसर्गाची टांगती तलवार आसपास असतानाही योग्य ती काळजी घेऊन कुणी आपल्या सेवेत प्रामाणिक राहून काम केले, तर कोणी सामाजिक बांधिलकी म्हणून मदतकार्य केले. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वॉर्डबॉईज, पोलीस दलातील अधिकारी ते हवालदार, सनदी अधिकारी, गावागावातील कृती दलातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी सामाजिक कार्यकर्ते आपापल्या परीने मदत कार्य आणि करोना रोखण्यासाठी जिवाची पर्वा न करता थेट रणांगणात लढताहेत, याची जाणीव ठेवून त्यांना नमन करण्यासाठी लाड सर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने मुंबई तसेच लांजा-राजापुरातील विविध सामाजिक संस्था आणि व्यक्तींचा करोनायोद्धा म्हणून गौरव केला.

मास्कवाटप
करोना विषाणूपासून नागरिकांचा बचाव व्हावा याकरिता लाड सरांच्या नेतृत्वाखाली करोना काळात लांजा आणि राजापूर या दोन तालुक्यांत ३७०० मास्कचे वाटप करण्यात आले.

सॅनिटायझर्स स्टॅण्डचे वितरण
बाजारात सॅनिटायझर स्टॅण्डच्या किमती जास्त असल्याने लाड सर यांनी आपल्याला सुचलेल्या कल्पनेचे गणेश पांचाळ यांच्याशी आदान प्रदान करीत अल्प किमतीत उत्कृष्ट सॅनिटायझर स्टॅण्ड बनविले आणि त्याचे मोफत वितरण सरकारी रुग्णालये, ग्रामपंचायत कार्यालये, माध्यमिक, प्राथमिक शाळांमध्ये केले.

आशा सेविकांना रेनकोट वाटप
करोनाच्या काळात मोठ्या संख्येने मुंबई-पुण्याहून सुरक्षेच्या कारणास्तव चाकरमानी कोकणात गावी परतले. अशा काळात राजापूर, लांजा या सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या दोन्ही तालुक्यांतील आशासेविकांनी उत्कृष्ट काम केले. कोकणात वाड्या, घरे एकमेकांपासून दूरवर असतात. अशा वेळी मुसळधार कोसळणाऱ्या पावसात काम करणे आशा सेविकांसाठी जिकिरीचे असते. तरीही राष्ट्रकार्य समजून अल्प मानधनातही आशासेविका तळमळीने काम करीत आहेत. त्याची दखल घेऊन संघाच्या वतीने अध्यक्ष सुभाष लाड यांच्या संकल्पनेतून लांजा आणि राजापूर तालुक्यातील ३० आशासेविकांना कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले आणि रेनकोटचे वाटप करण्यात आले.

मासिक निवृत्तीवेतनाचे गरजवंताना वाटप
प्राथमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या लाड सरांनी करोनाकाळात व्यवसाय-धंदे बंद पडल्याने, नोकऱ्या गेल्याने हतबल झालेल्या आपल्या अनेक सहकाऱ्यांना मदतीचा हात दिला. त्यांना मिळणाऱ्या मासिक निवृत्तीवेतनाचा विनियोग करीत अनेक सहकाऱ्यांना सहा-सात महिने आर्थिक सहकार्य करून त्यांचा संसार चालविला. परंतु त्याची कोठेही वाच्यता केली नाही. दुसऱ्याचे दु:ख जो समजतो, तोच समाजसेवक होऊ शकतो असे म्हणतात. पेन्शन म्हणून येणाऱ्या सर्वच्या सर्व ३० ते ३५ हजार रुपयांचा विनियोग आपल्या सहकाऱ्यांसाठी करून खिसा रिकामा करणारा लाड सरांसारखा संवेदनक्षम माणूस खिशात असतानाही खिशात हात न घालणाऱ्या गर्दीत अधिक हृदयाला भिडतो.

जीवन संवर्धन फाऊंडेशन – गुरुकुल म्हसकळ, टिटवाळा
सामाजिक समस्यांनी व्यथित अशा बेघर मुलांसाठी जीवन संवर्धन फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने टिटवाळ्यापासून जवळच असलेल्या म्हसकळ गावात गुरुकुल उभारले आहे. तेथील मुलांच्या भोजनाच्या गैरसोयीचे वृत्त लाड सरांना समजताच त्यांनी सोहम संगीत विद्यालयाचे सुनीलबुवा जाधव यांच्या मदतीने करोना काळात या गुरुकुलात जाऊन फेसबुक लाइव्ह संगीत मैफिलीचे आयोजन केले. त्यातून या गुरुकुलासाठी अर्थसाह्य करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत लाड सरांना प्रेरणास्थान मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी भरभरून मदत केल्याने या गुरुकुलाला करोनाच्या कठीण काळात भक्कम आधार मिळाला. सरांनी आपली नात कु. ब्रह्मस्मीचा वाढदिवसही तेथे साजरा करून बेघर मुलांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण केले. सरांच्या माध्यमातून या गुरुकुलात मदतीचा ओघ आता वाहतो आहे. यामुळेच खऱ्या अर्थाने समाजातील विषमतेच्या तळाशी काम करणाऱ्या लाड सरांविषयी अनेकांच्या मनात ममत्व आणि आदर दृढ होतो आहे.

करोना रुग्णांचे मनोबल वाढविण्याचे कामही लाड सर करत आहेत. त्यांच्या संपर्कातील एखादी व्यक्ती करोनाबाधित झाल्याचे कळताच त्याच्याशी संपर्क साधून त्याच्या मनातील करोनाविषयक भीती घालवून त्याचे मनोबल वाढविण्याचे काम लाड सर गेले काही महिने तळमळीने करत आहेत. कारण करोनाची भीती, दडपण, दहशतीने अनेकजण जीव गमावत असल्याने करोना रुग्णांचे मानसिक बळ वाढविणे गरजेचे असल्याचे ते मानतात.

करोनाकाळात स्वत:च्या जिवाची बाजी लावत कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर्स, नर्सेससाठी अनेक पीपीई किट, फेस शील्डचे मोफत वाटप लाड सरांनी केले आहे.

या संकटकाळात दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे, मराठी भाषेतील अनेक वर्षांची परंपरा असलेले दिवाळी अंक यंदा बंद पडत असताना मोडीदर्पण दिवाळी अंकाचे प्रकाशन करून मराठी साहित्यरसिकांना दर्जेदार दिवाळी अंक उपलब्ध करून देणे, अनेकांच्या जन्मदिवशी त्यांच्याविषयी लेख लिहून त्यांचे चरित्र समाजासमोर मांडत आगामी काळातही असेच सकारात्मक काम करण्यासाठी त्यांना प्रेरणा देणे अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी निरपेक्षपणे सरांनी केल्या आहेत. म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यातला माणुसकीचा निर्मळ झरा इतरांनाही कळावा, यासाठीच त्या आपल्यासमोर मांडल्या आहेत.

येशू ख्रिस्ताने ल्यूक ऑफ बायबलमध्ये सांगितलेली एक कथा आज मला आठवते आहे. एका प्रवाशाला लुटून, मारून अर्धमेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिलेले असते. तो प्रवासी ज्यू असतो. एक ज्यू पाद्री तेथे येतो, तो त्याला पाहतो. पण त्याला मदत न करता पुढे निघून जातो. मग सॅमॅरिटन येतो. सॅमॅरिटन आणि ज्यू मंडळी या दोघांमध्ये विस्तव जात नसतो. पण तो शत्रुत्व विसरतो आणि त्या ज्यूला मदत करतो. तो त्याला खायला अन्न देतो, त्याला कपडे देतो, त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढतो.. तेथून परोपकारी माणसाला ‘गुड सॅमॅरिटन’ असे म्हटले जाऊ लागले. असे परोपकारी ‘गुड सॅमॅरिटन’ आयुष्यात मला मूठभर का होईना, पण भेटले. त्यात सुभाष लाड सरांचा क्रमांक खूप वरचा आहे. कारण लोकांचे दु:ख, वेदना, संवेदना जाणण्याचे काम धर्म, जात, पंथ, विचारधारा यापलीकडे जाऊन त्यांनी केले आहे. फक्त जाणलेच नाही तर आपल्या परीने त्या कमी करण्यासाठी त्याला कृतीची जोड दिली आहे.

ज्ञानदानासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत असताना समाजसेवेच्या आंतरिक ओढीने राजापूर लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई), माझी मायभूमी प्रतिष्ठान (मुंबई), राणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्ट, नाटककार ला. कृ. आयरे ट्रस्ट, मोडी लिपी मित्रमंडळ अशा अनेक क्रियाशील संस्था स्थापन करून गेली ४० वर्षे शिक्षण, कला, साहित्य, संस्कृती, सामाजिक क्षेत्रात निःस्वार्थी, निःस्पृह कार्य सरांनी केले आहे. या दीर्घ वाटचालीत त्यांना अनेकांची साथ मिळाली आहे. त्यांच्या विधायक कामाच्या या प्रवाहात अनेक माणसे सामील झाल्याने ती चळवळ बनली आहे. या पाच तपातील सुरुवातीची दोन तपे संघर्षात घालविल्यानंतर वात्सल्यमूर्ती आईने दिलेल्या संस्काररूपी शिदोरीच्या जोरावर आत्मभान, समाजभान, राष्ट्रभान जपत सुभाष लाड यांनी विधायक कामांचा डोंगर उभा केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिवकाळात राज्य लिपी म्हणून मिरवणाऱ्या मोडी लिपीचे संवर्धन आणि प्रचार, कोकणातील गावागावांत सहा वर्षे अविरतपणे माय मराठीच्या अभिवृद्धीसाठी आयोजिलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनांचा जागर, ग्रंथ चळवळ, पुस्तक प्रदर्शने, वसुंधरेच्या रक्षणासाठी घेतलेला पुढाकार, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, शेतकरी मेळावे आदी कार्यक्रमांचा उल्लेख करावाच लागेल. मानव जातीवर उदात्त श्रद्धा असलेल्या व्रतस्थ लाड सरांचे निराळेपण त्यांच्या अशा निःस्वार्थी, निःस्पृह कार्यातून अधिक ठळक होऊन नव्या पिढीसमोर प्रेरक व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे आले आहे. पाच तपांचे हे यशस्वी सुभाषपर्व पुढच्या काळात अधिक जोमाने बहरेल आणि सेवाधर्माचा प्रसार करेल याचा विश्वास मला आहे.

आज लाड सर आपल्या वयाची षष्ठ्यब्दीपूर्ती करत आहेत. आगामी काळातही त्यांची कीर्तिपताका अशीच फडकत राहो आणि त्यानंतरचे त्यांचे आयुष्य प्रदीर्घ, निरामयी, आनंददायी होवो हीच शुभकामना.

  • विजय हटकर, लांजा
    (संपर्क – ८८०६६३५०१७)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply