सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२० मे) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार नव्या करोनाबाधितांपेक्षा बरे वाटल्याने घरी गेलेल्यांची संख्या दुपटीहून अधिक आहे. ही जिल्ह्यासाठी आशादायक बाब आहे. आज नवे ३०९ रुग्ण आढळले, तर ७७९ जण करोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्ह्यात एक लाख ३१ हजार जणांनी करोनाप्रतिबंधक लस घेतली आहे.
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ७७९ करोनाबाधित रुग्णांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या १६ हजार १७ झाली आहे. आज ३०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता २० हजार ९८० एवढी झाली आहे.
जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागली असून आज ती ४ हजार ४२६ झाली आहे. सक्रिय रुग्णांपैकी ३८२ रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यापैकी ३३४ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यात सर्व मिळून एकूण १ हजार ४८९ बेड असून त्यातले ५८६ बेड रिक्त आहेत. त्यात ऑक्सिजनच्या १०६ बेडचा समावेश आहे.
आज ९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये देवगड, कणकवली, मालवण तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५३१ झाली आहे.
एक लाख ३१ हजार जणांनी घेतली करोनाप्रतिबंधक लस
करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाने करोनाप्रतिबंधक लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३१ हजार ३०४ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यामध्ये हजार ४८६ हेल्थ वर्करनी पहिला डोस तर ६ हजार ६०७ जणांनी दुसरा डोस घेतला. ७ हजार ७९७ फ्रंटलाइन वर्करनी पहिला डोस तर ४ हजार ९० जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच ६० वर्षावरील ५६ हजार ७३५ व्यक्तींनी पहिला डोस तर २० हजार ५४० व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षावरील ४४ हजार ८३४ नागरिकांनी पहिला डोस तर ५ हजार ५७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील १२ हजार ४५२ जणांनी पहिला डोस डोस घेतला आहे. असे एकूण १ लाख ६७ हजार ५९८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जिल्ह्याला आजपर्यंत एकूण १ लाख ६९ हजार ८९० डोस मिळाले असून त्यामध्ये १ लाख २९ हजार २८० डोस या कोविशील्डचे तर ४० हजार ६१० डोस कोवॅक्सिनचे आहेत. १ लाख ३० हजार ६७२ कोविशील्ड आणि ३६ हजार ९२६ कोवॅक्सिन मिळून १ लाख ६७ हजार ५९८ डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण १ हजार ८०० डोस असून त्यापैकी १५० कोविशील्डचे तर १ हजार ६५० कोवॅक्सिनचे आहेत. जिल्ह्यात सध्या ३ हजार ९३० डोस शिल्लक असून त्यामध्ये कोविशील्डचे १ हजार ९२० आणि कोवॅक्सीनच्या २ हजार १० डोस शिल्लक आहेत.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
