रत्नागिरी जिल्ह्यातील लोककलावंतांना पत्रकारांच्या संस्थेकडून मदत

रत्नागिरी : आधार प्रतिष्ठान आयोजित पत्रकार आणि मित्र तसेच पल्लवी फाउंडेशनच्या विद्यमाने लोककलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. करोनाकाळात पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पत्रकारिता करतानाच सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांनी लोककलावंतांना मदत करण्याचा केलेला प्रयत्न लोककलावंतांना प्रोत्साहन देणारा ठरेल, असे प्रतिपादन रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी केले.

माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रत्नागिरीतील ३०० गरजू लोककलावंतांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप यावेळी करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत, संदीप तावडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सचिव राजेश कळंबटे, पत्रकार विजय पाडावे, राकेश गुडेकर, तन्मय दाते, गुरुप्रसाद सांवत, गणेश भिंगार्डे, सूरज आयरे आदी उपस्थित होते.

प्रतिष्ठानचे सचिव राजेश कळंबटे यांनी स्वागत केले आणि लोककलावंतांना मदत करण्याच्या कार्यक्रमाचे स्वरूप सांगितले. कोकण म्हटले की लोककला आलीच. येथील लोककलावंत स्वत:ला झोकून देऊन त्यामध्ये काम करतात. शिमगोत्सव असो किंवा गणेशोत्सव, यावेळी लोककलांना खरी रंगत येते. कोकण म्हटले की हापूस आंबा याचबरोबर कोकणची आणखी एक ओळख म्हणजे कोकणची लोककला. नमन, जाखडी या कोकणच्या प्रमुख लोककला. या पाहण्यासाठी देशासह परदेशातील पर्यटक येथे येतात. आपले लोककलावंत शेतकरी, शेती करून कुटुंब चालवतात. त्यातूनच आपली लोककला जिवंत ठेवतात. आज आपण सर्वजण करोनामुळे अडचणीत आहोत. यासाठी खारीचा वाटा म्हणून आपल्याला मदत करण्यासाठी मुंबईतील पत्रकार आणि मित्र, पल्लवी फाउंडेशन पुढे आले. राज्यातील गरजू लोककलावंतांना मदत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. रत्नागिरीत आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांची भेट आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत आहोत, असे श्री. कळंबटे यांनी सांगितले.

यावेळी जाखडी, नमन मंडळाच्या प्रतिनिधींना प्रातिनिधिक स्वरूपात अनिल लाड यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सोमेश्वर नाट्य नमन मंडळ वांद्री, संगमेश्वरी बाज आदी मंडळांच्या प्रतिनिधींना साहित्याचे वाटप करण्यात आले.

(संपर्कासाठी : राजेंद्र चव्हाण, अध्यक्ष, पत्रकारांचे आधार प्रतिष्ठान 97646 34587)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply