सिंधुदुर्गात ६६ वर्षीय दशावतारी कलाकारासह ५२६ रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, १७ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५२६ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामध्ये तेंडोली येथील ६६ वर्षीय दशावतारी कलाकाराचा समावेश आहे.

सध्या जिल्ह्यात ६ हजार १८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात २४ जणांच्या दुबार तपासणीसह ५०२ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ५६, दोडामार्ग – १८, कणकवली – ७९, कुडाळ – १२४, मालवण – ७२, सावंतवाडी – ३८, वैभववाडी – १६, वेंगुर्ले – ७३, जिल्ह्याबाहेरील २.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७४४, दोडामार्ग २११, कणकवली १०८१, कुडाळ १२५२, मालवण ११५५, सावंतवाडी ७७०, वैभववाडी ३०७, वेंगुर्ले ६४०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २७. सक्रिय रुग्णांपैकी ३५४ रुग्ण ऑक्सिजनवर तर ५४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज ५२६ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची संख्या २९ हजार १०२, तर एकूण करोनाबाधितांची संख्या ३६ हजार २०६ झाली आहे.

आज जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ९११ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – कणकवली १, मालवण ५, कुडाळ २.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १२७, दोडामार्ग – २७, कणकवली – १८२, कुडाळ – १४०, मालवण – १६७, सावंतवाडी – १३३, वैभववाडी – ६२, वेंगुर्ले – ६९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ४.

दिलासादायक वृत्त

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये झाले देवदूतांचे दर्शन

दरम्यान, वडिलांच्या उपचाराच्या काळात आम्हाला जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांमधील देवदूताचे दर्शन झाले, अशी भावना तेंडोली (ता. कुडाळ) येथील ६६ वर्षीय करोनामुक्त रुग्णाच्या मुलांनी आज व्यक्त केली. तेंडोली येथील त्या प्रसिद्ध दशावतारी कलाकाराला प्रथम कफ, खोकल्याचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांना दाखवले. पण फरक पडला नाही. त्यातच धाप लागली. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या ऑक्सिजनची पातळी ६८ पर्यंत खाली आली होती. प्रकृती गंभीर होती. पण जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि सर्वच कर्मचाऱ्यांनी केलेल्या योग्य उपचारांमुळे त्यांचे प्राण वाचले आणि आपल्या मुला-नातवंडामध्ये ते परत आले.

जिल्हा रुग्णालयामध्ये वडील दाखल असतानाचा अनुभव सांगताना त्यांचा मुलगा म्हणाला, जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केले, त्यावेळी ऑक्सिजनची पातळी खूपच खाली होती. धाप लागत होती. त्यामुळे सुरुवातीस त्यांना ऑक्सिजनच्या आधारावर ठेवले. पण दोन दिवसांत प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सुमारे १६ दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या संपूर्ण काळात आम्ही फारच घाबरून गेलो होतो. आमचे वडील पुन्हा परत घरी येतील की नाही, ही शंका नेहमीच मनात येत होती. पण डॉक्टर रोज रुग्णांची तपासणी करण्यासाठी येत, त्यावेळी आम्हाला दिलासा देत होते. तुमचा रुग्ण लवकरच बरा होईल, काही काळजी करू नका, असा धीर देत होते. सुरू असलेल्या उपचारांची नियमितपणे माहिती दिली जात होती. आवश्यक ते सर्व उपचार केले जात होते. त्यांच्या प्लेटलेट्स कमी झाल्यावर प्लेटलेट्स चढविण्यात आल्या. रक्ताची रोजच्या रोज तपासणी केली जात होती. त्यानुसार योग्य ते उपचार केले जात होते. त्याशिवाय डॉक्टर रोजच्या रोज व्यायाम करण्यास सांगत असत. तो व्यायाम रुग्णांकडून करूनही घेतला जात होता. श्वसनासंबंधीचे हे व्यायाम असत. रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि सर्व कर्मचारी यांचे चांगले सहकार्य आम्हाला मिळाले. त्यांच्या या प्रयत्नामुळेच आज माझे वडील बरे होऊन घरी आले आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply