वसई-सावंतवाडी प्रवासी संघटनेची मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची मागणी

रत्नागिरी : मुंबईतील केईएम, जे जे हॉस्पिटलच्या धर्तीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची मागणी वसई-सावंतवाडी प्रवासी संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांत कोकणावर अस्मानी संकटे आली. परंतु स्वाभिमानी कोकणी माणसाने मदतीसाठी केव्हाच सरकार दरबारी हात पसरला नाही. हा शांत आणि संयमी कोकणी माणूस अनेकदा दुष्काळात होरपळला, चक्रीवादळात भरकटला, महापुरात बुडाला, पाण्याविना तडफडला मात्र त्याने कधीच निराश होऊन इतरांप्रमाणे झाडाला लटकवून आपली जीवननौका संपवली नाही किंवा उपोषण, आंदोलने, मोर्चा काढून कधी त्याचा निषेधही केला नाही. तो नेहमीच समर्थपणे संकटाचा सामना करून पुन्हा नव्या जोमाने उभा राहिला आहे. मात्र आता समस्त कोकणवासीय करोनाच्या महामारीत आरोग्य सेवेविना पूर्णतः कोलमडून हतबल झाले आहेत. कोकणात आरोग्य व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे. शासकीय हॉस्पिटलअभावी अनेक जण हकनाक करोनाचे बळी ठरत आहेत. यासाठीच मुंबईतील केईएम, जे जे हॉस्पिटलच्या धर्तीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रत्येकी एक सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करावे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करून ही हॉस्पिटल उभारण्याचे नियोजन करावे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत एकही चांगले शासकीय हॉस्पिटल नसल्याने अनेक रुग्णांना गंभीर झाल्यानंतर डॉक्टर पुढील उपचारासाठी लगतचे गोवा राज्य, कोल्हापूर किंवा मुंबईला न्यायचा सल्ला देतात. मात्र अनेकदा प्रवासातच रुग्णाला आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात हा तातडीचा विषय घेऊन पुढील कार्यवाही करून दोन जिल्ह्यांना दोन सुसज्ज हॉस्पिटल उपलब्ध करून द्यावीत. अन्यथा आरोग्याच्या या मुद्द्यावर कोकणी माणूस आक्रमकही होऊ शकतो, याची ही नोंद घ्यावी, असे अध्यक्ष शांताराम नाईक आणि सचिव यशवंत जड्यार यांच्या सहीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

या पत्राची प्रत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, रत्नागिरी पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार नारायण राणे, खासदार सुरेश प्रभू, खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पाठविण्यात आली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply