करोनामृतांच्या निकषात न बसणाऱ्या मुलांसाठी हवाय मदतीचा हात

राजापूर : करोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांच्या नावाने पाच लाखाची ठेव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र शासनाच्या निकषात जी मुले बसू शकणार नाहीत, अशीही कितीतरी मुले आहेत, हे माय राजापूर सामाजिक संस्थेच्या लक्षात आले. या संस्थेचे प्रदीप कोळेकर यांनी त्याविषयीची माहिती गोळा केली आणि भयानक वास्तव समोर आले.

अशा मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी माय राजापूर संस्थेने पुढाकार घेतला आहे आणि समाजाला मदतीचे आवाहन केले आहे. या मुलांविषय़ीची माहिती सोबत दिली आहे.

प्रदीप कोळेकर यांनी याविषयी व्यक्त केलेले मनोगत

विदारक

एखादी व्यक्ती जी आपला करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून आनंदात घरी येते. या आनंदात भर पडते ती.. तो आता बाप होणार आहे या गोड बातमीची… आपण एका बाळाला जन्म देणार म्हणून त्याची पत्नीही सुखावलेली असते.. र घरातील लहान मुलं आपल्यासोबत एक भावंड खेळायला येणार म्हणून खूष झालेली….
या सगळ्या आनंदावर अकस्मात काळाचा निष्ठूर घाला पडतो… आपल्या पत्नीच्या पदरात एक पंधरा वर्षांची तर दुसऱ्या अकरा वर्षांच्या चिमुकलीला टाकून केवळ बारा दिवसांनी या जगात येणाऱ्या आपल्या मुलाचे तोंडही पाहू न देता.. दोन मुली आणि पत्नीचे सर्वस्व असलेल्या घरच्या कर्ता पुरुषाला नियतीने झडप घालत या जगातून ओढून नेले… प्रारब्ध एवढे कसे निर्मम.. एवढा मोठा आघात एका गरीब कुटुंबावर … मन हेलावून टाकणारी ही घटना मला अंतर्बाह्य हादरवून गेली.

हृदय पिळवटून टाकणारी ही घटना मला कळली ती कोविड संसर्गामुळे दगावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाची माहिती गोळा करत असताना. वडदहसोळ (ता. राजापूर) येथील पळसमकरवाडीतील प्रकाश बाजी पळसमकर या व्यक्तीविषयीची ही दुर्दैवी कहाणी.. ऐकताच मनाची उलथापालथ झाली. अंतर्मुख होत मनात विचार घोळू लागले. आपण वर्षानुवर्षे जी दुःखे उराशी कवटाळून बसत आलो, ती या कुटुंबावर ओढवलेल्या अतीव दु:खाच्या पुढे अगदीच क्षुल्लक आहेत.. मला स्वतःचीच कींव करावीशी वाटली..

पुढे माहिती गोळा करताना मनाला अशा अनेक वेदना देणाऱ्या या घटना समोर आल्या.. शून्यात हरवलेल्या आया आणि त्यांच्या निरागस मुलांचे चेहरे समोर आले.. एका क्षणी तर ही माहिती गोळा करण्याचे मनावर दडपण आले. पण दुसऱ्या क्षणी झपाटल्यागत कामाला लागलो. राजापूर ग्रामीण रुग्णालयापासून ते तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्याशी संपर्क साधला. ध्यास एकच, या अडनिड्या वयात आईवडिलांचे छत्र हरपलेल्यांना मदत मिळवून देता यावी हाच.

मग आरोग्य कर्मचाऱ्यांशी सततचा संपर्क साधू लागलो… एकदा, दोनदा, तीनदा, अनेकवेळा… कधी फोन कव्हरेजच्या बाहेर, तर कधी स्विच ऑफ, मग कधी फोन उचलला गेला तर पलीकडून आज संध्याकाळी नक्की माहिती देतो, असे उत्तर येते. ‘‘आज अचानक पीएचसीमध्ये काही पॉझिटिव्ह आलेत. धांदल उडालेय..’’ तर कधी, ‘‘कोळेकर, उद्या माहिती देतो. आज एक डेथ झालाय. आत्ताच घरी आलोय.’’ डॉक्टरांच्या बोलण्यातील हताश भाव लक्षात घेऊन मी पुढे न बोलताच फोन ठेवत असे.

मला अशा या आरोग्यसेवकांच्या मानसिकतेला, त्यांच्या धैर्याला, त्यांच्या सेवाभावी वृत्तीला कशाने संबोधावे हे कळेना. मला शब्द सापडेना..
पॉझिटिव्ह रुग्णाच्या चेहऱ्यावरची भीती पाहत, मृतांच्या जिवलगांचा आक्रोश ऐकत आपली सेवा बजावणारे हे आरोग्य कर्मचारी म्हणजे देवाने एक जास्तीचे हदय देऊन पाठवलेली माणसे आहेत, असेच मला वाटू लागले. कारण हे सारे काही ते झेलत आहेत गेली जवळपास दोन वर्षे रोज…. माझी मती कुंठित झाली. मी हे काम एखाद्या यंत्रासारखे संपवण्याचा अनेकदा प्रयत्न करून पाहिला. पण प्रत्येक वेळी माझ्या हदयाने तो हाणून पाडला…

राजापूर तालुक्यातील १०३ कुटुंबांची माहिती मिळवण्याचे काम ज्या दिवशी संपले, त्या रात्री डोक्यात विचारांचे काहूर माजले. काही प्रश्नांची उत्तर मिळाली, तर काही प्रश्न निरुत्तर करून गेले. माझीच मलाच नव्याने ओळख झाली. काही बाबतीत आपण किती खुजे आणि हतबल आहोत, हे जाणवले. या विदारक परिस्थितीने शिकवलेला क्षणभंगूर शब्दाचा नेमका अर्थ समजून घेऊन आपण तसे आचरण करू शकू का? आपण कौटुंबिक पाश बाजूला सारून स्वत:ला झोकून देऊन समाजासाठी काम करू शकू का? या प्रश्नांची उत्तरे माझ्या मनाला मला कृतीतून द्यावीच लागतील… नाहीतर खूप मोठे ऋण फेडायचे बाकी राहिले, ही खंत अंतिम समयी राहील… ज्याचे ओझे शेवटच्या प्रवासात मला कदापी नको आहे..

मला खात्री आहे, या अजाण बालकांना सावरण्यासाठी असंख्य हाती पुढे येतील. माझाही खारीचा वाटा असेल. सुदैवाने राजापूर तालुक्यातील एकाही अजाण मुलाचे आई आणि बाबा दोन्ही या महामारीने ओढून नेले नाहीत. एक तरी आधार या सगळ्या दुर्दैवी घटनेत बाकी ठेवला.. हे अल्पसा दिलासा देणारे.. पण खरी गरज आहे ती या बालकांचे भविष्य शाश्वत करण्याची….. यासाठी शासनाने त्यांचे निकष थोडे बाजूला ठेवून या कुटुंबांबाबत सहानुभूती दाखवत, लेकरांबाबत दया दाखवत मुलांचे भविष्य सुरक्षित करावे. त्यांचे अधिकार ते सज्ञान होताच त्यांना मिळतील याची हमी शासनाने त्यांना द्यावी. शासनाकडून हे त्यांना मिळवून देण्यासाठी मायराजापूरने आपली सारी शक्ती पणाला लावावी ही सर्व सदस्यांनाही विनंती आहे. कोविड-19 जगण्याचे नवे सूत्र आपल्या सर्वांना देऊन जाणार आहे.
……..

राजापूर तालुक्यातील करोनामुळे मरण पावलेल्या १०३ कुटुंबांपैकी पितृछत्र हरपलेल्या १८ वर्षांखालील अजाण बालकांची एकत्रित सूची नाव, वय, पत्ता इत्यादी माहिती सोबत दिली आहे. त्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे म्हणून काही प्रयत्न करता येतील का पाहू!

ही यादी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आहे.

ओणी प्राथमिक आरोग्य केंद्र
तिवंदामाळ, मंदरूळ, शिवणे बुद्रुक, पाथर्डे, कोदवली गावातील मृत व्यक्तीच्या कुटुंबात 18 वर्षे आणि त्याखालील वयाची मुले नाहीत.

वडदहसोळ
मृत – प्रकाश बाजी पांचाळ (वय ४२) करोना निगेटिव्ह (यादीत नाव नाही)
पत्नी – प्रतीक्षा ३७, मुलगी – रोशनी १५, भक्ती ११, मुलगा – यश एक महिना

वडवली सुतारवाडी
मृत – गणेश प्रभाकर पांचाळ (वय ४५)
पत्नी- नाव कळले नाही. मुलगी- दीक्षा- १६, मुलगा – पार्थ – १४.

ओझर गोसावीवाडी
मृत- प्रकाश तुकाराम गोसावी (वय ४९)
पत्नी – प्रमिला ४४, मुलगा – विनय १८.

कोदवली तरळवाडी
मृत- गजानन पर्शुराम कोळेकर (वय ५५)
पत्नी- गायत्री ४९, मुलगी – वैष्णवी -१८, मुलगा- केतन २१.
(माहिती सहकार्य – ओणी पीएचसी आरोग्य सहाय्यक श्री.बल्लाळ तसेच आरोग्य सेवक/सेविका श्री. पोटफोडे, श्री. जानस्कर, श्रीमती नाईक, श्रीमती पटेल)

जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्र
मूर, काजिर्डा, जवळेथर, हातदे, ताम्हाणे, कोळंब पाटीलवाडी या गावांतील मृत व्यक्तीच्या कुटुंबात १८ वर्षे आणि त्याखालील वयाची मुले नाहीत.
(माहिती सहकार्य – आरोग्य सहाय्यक शैलेश वाघाटे, आरोग्य सेविका श्रीमती कुवळेकर)

कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्र
कात्रादेवी, सागवे, प्रिंदावण या गावांतील मृत व्यक्तीच्या कुटुंबात १८ वर्षे आणि त्याखालील वयाची मुले नाहीत.
(माहिती सहकार्य – आरोग्य सहाय्यक श्री. पाटील)

जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्र
जानशी, मिठगवाणे, कुवेशी, होळी या गावांतील मृत व्यक्तींच्या कुटुंबात १८ वर्षे आणि त्याखालील वयाची मुले नाहीत.
(माहिती सहकार्य – आरोग्य सहाय्यक मंगेश तावडे)

सोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र
कोतापूर, भू, तेरवण, गोवळ, सोलगाव, धोपेश्वर, तिठवली, चाफडेवाडी या गावांतील मृत व्यक्तींच्या कुटुंबात १८ वर्षे आणि त्याखालील वयाची मुले नाहीत.

खिणगिणी मराठवाडी
मृत- संतोष गंगाराम कदम (वय ३८).
पत्नी- दीपाली ३३, मुलगी – वैशाली ९, मुलगा – यश

पेंडखले – मधली निनावेवाडी
मृत- अनंत तुळाजी निनावे
पत्नी- अनुजा ३४, मुलगा – पार्वती १४, अथर्व ११.
(माहिती सहकार्य – आरोग्य सहाय्यक शैलेश रेवाळे)

केळवली प्राथमिक आरोग्य केंद्र
वाल्ये, पन्हळे, वाजवली, मोसम, मोरोशी, केळवली या गावांतील मृत व्यक्तीच्या कुटुंबात १८ वर्षे आणि त्याखालील वयाची मुले नाहीत.

कोंड्ये – बौद्ध वाडी
मृत- नीलेश मधुकर कांबळे (वय ३९).
पत्नी- दीपाली ३४, मुलगी – संगीता १३, मुलगा – सुजल १७.

प्रिंदावन – गोरुलेवाडी
मृत- सतीश दत्तात्रय गिरकर (वय ४७)
पत्नी- सोनल ४०, मुलगा – विघ्नेश ९
(माहिती सहकार्य – आरोग्य सहाय्यक उदय कुळये)

करक प्राथमिक आरोग्य केंद्र
पाचल, तळवडे, रायपाटण या गावांतील मृत व्यक्तीच्या कुटुंबात १८ वर्षे आणि त्याखालील वयाची मुले नाहीत.

करक- शेट्येवाडी
मृत- नीलेश मधुकर कांबळे (वय ५७)
पत्नी- नम्रता, मुलगी – पूजा १८, मुलगा – ओमकार.
(माहिती सहकार्य – आरोग्य सहाय्यक तानाजी पाटील, आरोग्यसेवक विवेक ढोले)

फुफेरे प्राथमिक आरोग्य केंद्र
दोनिवडे, सोलिवडे, शीळभंडारवाडी या गावांतील मृत व्यक्तीच्या कुटुंबात १८ वर्षे आणि त्याखालील वयाची मुले नाहीत.

गोठणेदोनिवडे
मृत- ब्रिजभान शांताराम आनंद
ही व्यक्ती उत्तर प्रदेश येथे आपल्या मूळ गावी स्थलांतरित झाली आहे. मुले अठरा वर्षांपेक्षा लहान आहेत.

उन्हाळे- सोड्येवाडी
मृत- रवींद्र अर्जुन सोड्ये (करोना निगेटिव्ह) (यादीत नाव नाही)
पत्नी – रविना ३७, मुलगा- अर्थव ५, मुलगी – आदिती १४, श्रवणी ८
(माहिती सहकार्य – आरोग्य सहाय्यक श्री. कळसकर, पोलीस पाटील प्रकाश पुजारे (उन्हाळे)

धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्र
मोगरा, धाऊलवल्ली, नाटे, आंबोळगड, कशेळी, कोंडसर खुर्द, शेढेकर वाडी, वरचीवाडी आगवेकरवाडी या गावांतील मृत व्यक्तीच्या कुटुंबात १८ वर्षे आणि त्याखालील वयाची मुले नाहीत.

बेनगी वारिकवाडी
मृत- जयकांत नथुराम वारीक (वय ४५)
पत्नी- योजना ४०, मुली – साक्षी १८, सानिया १५, अवनी १२, मुलगा – अर्णव १०

भालावली पिशेदवाडी
मृत- नंदकुमार हरिश्चंद्र खानविलकर (वय ४५)
पत्नी- वर्षा- ४०, मुलगा – चैतन्य – १४

देवीहसोळ – पैकडेवाडी
मृत- हरिश्चंद्र सदाशिव पैकडे (वय ४३)
पत्नी – मिताली ३८, मुलगा – सुयश -१६, मुलगी- साक्षी – १३
(माहिती सहकार्य तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे, धारतळे आरोग्य सहाय्यक श्री. वळंजू)

राजापूर शहर
गुरववाडी, बंगलवाडी येथील मृत व्यक्तीच्या कुटुंबात १८ वर्षे आणि त्याखालील वयोगटातील मुले नाहीत.
(माहिती सहकार्य – वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेस्त्री, आरोग्य सहाय्यक श्री. धानबा, आरोग्य सेवक अमित नवरे, आरोग्यसेवक श्री. यादव).

  • प्रदीप कोळेकर, माय राजापूर
    (82751 34404)

राजापूर तालुक्यातील करोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या मुलांची नावे, पत्ते आणि फोन नंबर सोबत दिले आहेत.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3988642601249382&id=724383954341946

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply