राजापूर : करोनाच्या काळात घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्या कुटुंबावर जो मानसिक आणि आर्थिक आघात झाला, तो काहीसा हलका करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला थोडीशी आर्थिक मदत करून कुटुंबाची चौकशी करताना त्यांना धीराचे चार शब्द देण्याचे काम माय राजापूर संस्थेतर्फे अध्यक्ष जगदीश पवार, प्रदीप कोळेकर आणि हृषीकेश कोळेकर यांनी केले. संस्थेच्या सदस्यांनी वर्गणी काढून ही आर्थिक मदत बुधवार, १६ जून रोजी त्यांच्या घरी जाऊन पोहोचविली.

पेंडखले-निनावेवाडी येथे निनावे कुटुंबाची भेट घेतली. त्यांचा पती रिक्षा चालवून कुटुंब चालवत होता. जांभ्या चिऱ्यांचे आणि पत्रे असलेले स्वतंत्र घर त्याने बांधले आहे, त्या घरात आम्ही कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना रोख १० हजार रुपये, शाळेची दोन दप्तरे, साडी आणि महिन्याभराचा शिधा दिला. “आमची ही मदत पुरेशी नाही, याची कल्पना आम्हाला आहे. पण समाजातील माणसे या कठीण प्रसंगी आपल्यासोबत आहेत, हा संदेश देण्यासाठी निरपेक्षपणे आम्ही ही मदत करतो आहोत”, असे श्री. कोळेकर यांनी सांगितले. निनावे यांना दोन मुलगे आहेत, एक मुलगा नववीत, तर दुसरा प्राथमिक शाळेत आहे. दोन्ही मुलांच्या गळ्यात छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेली मण्यांची माळ होती. तो धागा पकडून मुलांना उद्देशून जगदीश पवार म्हणाले, “शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली आणि पूर्ण आयुष्य संघर्ष करत जगले. त्यांनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले. तुमच्यापुढेही आत्ता कठीण काळ आहे. संघर्ष करण्याचा काळ आहे. हा संघर्ष आपल्या आईला सांभाळण्यासाठी असेल. तसेच आपले आयुष्य चांगले घडविण्यासाठी असेल. कठीण वेळ येईल, त्यावेळी शिवरायांचे पराक्रम आठवा आणि कठीण वेळेवर मात करा. शिक्षण हे चांगले आयुष्य घडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. मन लावून अभ्यास करा आणि जीवनात यशस्वी व्हा. शाळेत शिकवतात ते समजत नसेल, आवडत नसेल तर शारीरिक कष्ट करण्याची तयारी ठेवा. झाडावर चढणे, शेतीची कामे करणे यासाठी स्वतःची तब्येत कणखर करा. पुढील आयुष्याला चांगला आकार द्या.”
मूळ वडद हसोळ येथील श्रीमती पळसमकर आपल्या माहेरी भावाकडे पेंडखळे-सातोपेवाडी येथे सध्या वास्तव्याला आहे. तिला दोन महिन्यांचे तान्हे मूल असल्याने ती सध्या माहेरीच राहणार आहे. तेथे माय राजापूर संस्थेचे सदस्य पोहोचले. त्यावेळी पाऊस चांगलाच पडत होता. खूप काळोखही होता. श्रीमती पळसमकर यांनाही रोख दहा हजार रुपये, शाळेची दोन दप्तरे, लहान मुलाला ड्रेस, साडी आणि महिन्याभराचे किराणा सामान दिले. घरातील वातावरण गंभीर, त्यात काळोख. त्यामुळे ते अधिकच भयानक वाटत होते. श्रीमती पळसमकर बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. त्यामुळे श्री. कोळेकर यांनी तिच्या भावाशी आणि दहावीत गेलेल्या मोठ्या मुलीशी (त्यांना दोन मुली आणि एक तान्हे बाळ आहे.) संवाद साधला.

वडवलीच्या सुतारवाडीत श्रीमती पांचाळ यांची भेट माय राजापूरच्या सदस्यांनी घेतली. पांचाळ वडवलीचे सरपंच होते. गेल्या वर्षी करोना योद्धे म्हणून त्यांनी चांगले काम केले होते. ते बांधकामाची छोटी मोठी कामे करायचे. अवघ्या ४३ वर्षांचे पांचाळ तब्येतीने चांगले धष्टपुष्ट होते. पण करोनाने त्यांचा जीव घेतला. पांचाळ यांच्याकडे असलेली धडाडी आणि कर्तृत्व यामुळे त्यांचे घर आणि परिस्थिती काहीशी बऱ्यापैकी आहे. मात्र ते पांचाळ हयात नसल्याने त्यांच्या कुटुंबाची स्थिती झपाट्याने खाली येऊ शकते. कारण आता त्यांच्याकडे कमावते कोणी नाही. त्यांची मोठी मुलगी दहावीला, तर तिच्या मागचा एक भाऊ शाळेत आहे. श्रीमती पांचाळ यांनी आयटीआयमधून टेलरिंग कोर्स केला आहे. टेलरिंग करून चार पैसे मिळवण्याची तयारी त्यांनी दर्शविल्याने त्यांना शिलाई मशीन आणि रोख पाच हजार रुपये शाळेची दोन दप्तरे, साडी, महिनाभराचे किराणा सामान दिले. त्यांच्या मोठ्या मुलीने दहावीनंतर काय करावे यावर मार्गदर्शन केले. विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असेल तर राजापूर हायस्कूलमध्ये घ्यावा, त्यासाठी संस्थेच्या वतीने मदत करण्याची तयारी दर्शविण्यात आली. बारावीनंतर नर्सिंग किंवा डीएड करावे. राजापूरमध्ये डीएड करणार असेल तरीही शैक्षणिक मदत केली जाईल. डीएड केले तर गावात किंवा शहरात राहून ट्युशन किंवा शिक्षिका म्हणून काम करून लवकर चार पैसे मिळवून स्वावलंबी होऊ शकते, असे मार्गदर्शन केले. यावेळी माय राजापूरचे सदस्य नरेश दसवंत उपस्थित होते.
शून्यात नजर हरवलेल्या माताना कशा प्रकारे आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि आत्मनिर्भर होऊन कुटुंबाचे भविष्य घडवता येईल, याबाबत धीराचे चार शब्द सांगून माय राजापूरचे सदस्य घरी परतले. खचलेल्या, भेदरलेल्या मुलांना योग्य वयात योग्य मार्गदर्शन करता आले, ही वेळ फार नाजूक आहे. ही लहान मुले आज अशा जागी आहेत की जर सावरली नाहीत, तर रस्ता भटकतील मुळशी पॅटर्नचा बळी ठरू शकतात, अशी साधार भीती वाटते. माय राजापूरची सामाजिक बांधिलकीची जबाबदारी वाढत आहे. याची गंभीर जाणीव सर्व सदस्यांना आहे. त्यातूनच पुढे जायचा निर्धार माय राजापूरच्या सदस्यांनी केला आहे.
(संपर्कासाठी – अध्यक्ष, जगदीश पवार – 91685 43460, प्रवर्तक, प्रदीप कोळेकर – 82751 34404)

