लक्ष्मीपुत्रांनी एक तरी साहित्यिक दत्तक घ्यावा – प्रमोद जठार

कासार्डे (ता. कणकवली) (निकेत पावस्कर) : शब्दांची श्रीमंती असलेल्या, संवेदनशील मनाच्या कवीचा सहवास आम्हाला लाभला. आपल्या परिसरात साहित्यिक, कलावंत असेल तर किमान त्याची विचारपूस झाली पाहिजे. जे लक्ष्मीपुत्र आहेत, त्यांनी एक तरी साहित्यिक दत्तक घेता येईल का, यावर विचार केला पाहिजे. मधुसूदन नानिवडेकर यांच्या स्मृती आपण जपू या, असे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे केले.

सिंधूभूमी कला अकादमी आणि आमदार प्रमोद जठार मित्र मंडळाने कासार्डे येथे आयोजित केलेल्या गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या शोकसभेत ते आज बोलत होते. नानिवडेकर यांचे गेल्या ११ जुलै रोजी तळेरे येथे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी कणकवलीच्या तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

श्री. जठार पुढे म्हणाले, राजकारणामध्ये साहित्यिकाची संगत संपते, त्यावेळी तोही संपतो. व्यक्तिशः मला अशा संवेदनशील कलावंताची संगत लागली आणि त्यांनीच साहित्याची आवड निर्माण केली. नानिवडेकर यांचा आपल्या सर्वांना दीर्घकाळ सहवास लाभला. आपल्या सर्वांचे त्यांच्याशी जवळचे नाते निर्माण झाले होते. त्यांची कायम स्मृती जागृत राहावी, यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करू या. सिंधुभुमी कला अकादमीची स्थापनाच नानिवडेकर यांच्यामुळे झाली. त्यामुळे या माध्यमातून त्यांचे साहित्यिक काम उभारू या.
स्वच्छ मनाचे आणि संवेदनशील नानिवडेकर यांचे संबंध सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी होते. त्यांचा मृदू स्वभाव आणि गोड कवितेमुळे अनेकांशी त्यांचे नाते घट्ट झाले, असे मत तहसीलदार श्री. पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी कणकवलीचे उपसभापती प्रकाश पारकर, कवी डॉ. अनिल धाकू कांबळी, लेखक प्रमोद कोयंडे यांनी नानिवडेकर यांच्या आठवणी जागविल्या.
यावेळी सिंधुभूमी कला अकादमीच्या माध्यमातून नानिवडेकर यांची स्मृती कायम रहावी यासाठी कासार्डे येथे एकत्रित काम करण्याचे ठरले. प्राथमिक टप्प्यात एवढ्या मोठ्या गझलकाराचा एकमेव काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून त्यांचे साहित्य एकत्रित करून त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचे ठरले.

यावेळी कासार्डे माजी सरपंच संतोष पारकर, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, डामरे माजी सरपंच बबलू सावंत, रवींद्र शेट्ये, संजय नकाशे, भाई मोरजकर, दिगंबर केसरकर, श्रीपत पाताडे, प्रसाद जाधव, उद्योजक प्रवीण पोकळे, सतीश मदभावे, सदाशिव पांचाळ, संजय खानविलकर, गुरुप्रसाद सावंत, सचिन राणे, निकेत पावसकर यांच्यासह दशक्रोशीतील नानिवडेकरप्रेमी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply