सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० कोटीचे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र लवकरच – राणे

रत्नागिरी : केंद्र सरकारतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच मोठे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे मंत्री नारायण राणे यांनी आज (२७ ऑगस्ट) रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.

श्री. राणे यांची दोन दिवसांपूर्वी स्थगित झालेली जनआशीर्वाद यात्रा आज रत्नागिरीतून सुरू झाली. त्यादरम्यान श्री. राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की या प्रशिक्षण केंद्रात उद्योगांविषयीची सर्व प्रकारची माहिती, यंत्रसामग्री, कर्जपुरवठा इत्यादी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाईल. कोकणातील नारळ, आंबा, काजू, फणस कोकम इत्यादी फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग कोकणात सुरू व्हावेत, ही त्यामागची अपेक्षा आहे. देशातील ८० टक्क्यांहून अधिक उद्योग केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. त्याचा उपयोग कोकणातील औद्योगिकीकरण वाढवण्यासाठी मी करणार आहे. अगदी छोट्या महिलांपासून जास्तीत जास्त लोकांना उद्योग उभारण्यासाठी मदत केली जाईल. या मंत्रालयातर्फे ३५ टक्क्यांपासून ९० टक्‍क्यांीपर्यंत अनुदान देणाऱ्या तसेच एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज देणाऱ्या योजना राबविल्या जातात. त्यांचा उपयोग कोकणवासीयांना व्हावा, यासाठी मी अधिकाधिक प्रयत्न करणार आहे.

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेली विविध विकासकामे लोकांना सांगावीत, जगाला प्रगतीकडे नेणाऱ्या आणी महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या देशातील विकासकामांची माहिती लोकांना सांगावी आणि लोकांचे आशीर्वाद पंतप्रधानांपर्यंत पोहोचावावेत, असा जनआशीर्वाद यात्रेचा उद्देश आहे. यात्रेला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळाला. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही यात्रेचे चांगले स्वागत झाले. या यात्रेच्या निमित्ताने जनतेचे प्रश्न, महापूर, वादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्या काळात सरकारने दिलेली मदत जनतेला मिळाली का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचा संपूर्ण अहवाल पंतप्रधानांना दिला जाईल. या यात्रेच्या काळात संगमेश्वर येथील माझ्या अटकेची घटना घडली. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न काहींनी केला. मी गुन्हेगार असल्याचे आरोप केले जातात. पण मग मला शिवसेनेने मुख्यमंत्री कसे केले, हा प्रश्न निर्माण होतो. शाखाप्रमुख, नगरसेवक, बेस्ट समितीचा चेअरमन, आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री ही सारी पदे शिवसेनेनेच मला दिली. माझ्या शिवसेनेतील ३९ वर्षांच्या काळात मी पक्षासाठी भरपूर काही केले होते. आता केस केल्याने राणे घाबरणार, असे वाटले असेल. पण मी घाबरणारा नाही, ते रक्तात नाही, असेही राणे यांनी म्हटले. आम्ही काही कायम विरोधी पक्षात राहण्यासाठी आलो नाही. भविष्यात आम्हीही सत्तेत येऊ. त्यामुळे अधिकारी, पोलिसांनी कायद्यानुसार काम करावे. कायद्याच्या बाहेर जाऊन काम कराल तर तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा राणेंनी अधिकारी आणि पोलिसांना दिला.

महाराष्ट्रातील स्थितीविषयी श्री. राणे म्हणाले की करोनाच्या काळात महाराष्ट्रात एक लाख ५७ हजार जणांचा मृत्यू करोनामुळे झाला. देशातील सर्वांत अधिक मृत्यू महाराष्ट्रात घडले. आता करोना कमी झाल्यानंतर मात्र बंधने लादली जात आहेत. आमच्यावरही एवढ्याच गाड्या पाहिजेत, असे सांगून बंधने घालण्यात आली. आम्ही आमच्या देशात फिरताना अशी बंधने आणि करोना संपल्यानंतर अशी बंधने कशासाठी, असा सवाल श्री. राणे यांनी उपस्थित केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडलेली आहे. घरात घुसून बलात्कार केले जातात. मारामाऱ्या आणि खूनही केले जातात. निशांत सिंगचा खून झाला, दिशा सालियनवर बलात्कार करून तिची हत्या झाली. अशी राज्यातील स्थिती आहे. घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला.

रत्नागिरी जिल्हा परिषदही कर्जबाजारी करून ठेवली आहे. आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. राज्य शासनाचा हा कारभार जनतेला दाखवून देणार आहे. कोकणासाठी आणलेले सी-वर्ल्ड प्रकल्पासारखे अनेक प्रकल्प या सरकारने मार्गी लावले नाहीत. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मी गडकरी साहेबांशी बोलून मार्गी लावले आहे. महिला उद्योग मीच सुरू केला. विकासात्मक कामांसाठी जनआशीर्वाद यात्रा आहे. पुढील काळात इतर प्रश्न हाताळण्यासाठी मी येणार आहे, असे श्री. राणे यांनी नमूद केले.

मुंबई महापालिकेसह कोकणातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यापुढच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षालाच बहुमत मिळेल, असा विश्वास श्री. राणे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केला. तसेच निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाशी भाजपची युती झाली, तर पक्ष जे धोरण ठरवेल, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही ते म्हणाले.

सायंकाळी श्री. राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे रवाना झाली.

कोकणात जास्तीत जास्त फळप्रक्रिया केंद्रे उभारणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिलेल्या खात्यामध्ये फळप्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. येत्या महिन्याभरात आपण संबंधित अधिकारी आणि बागायतदारांची बैठक घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू आणि कोकणात जास्तीत जास्त फळप्रक्रिया केंद्रे उभारली जातील, अशी ग्वाही केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी बागायतदारांना दिली. बागायतदारांच्या परताव्याबाबतही आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

गोळप (ता. रत्नागिरी) येथे आंबा, काजू बागायतदारांची बैठक श्री. राणे यांनी घेतली. त्यावेळी माजी मंत्री, आमदार आशीष शेलार, आमदार प्रसाद लाड, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, बागायतदार आनंद देसाई यांच्यासह आंबा, काजू बागायतदार उपस्थित होते. बागायतदारांच्या वतीने श्री. राणे यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी श्री. राणे म्हणाले की, बागायतदारांनी दिलेल्या निवेदनाचा अभ्यास करून प्रश्न सोडवू. परताव्याच्या रकमेबाबत पाठपुरावा करू. हा विषय पुन्हा मांडण्याची वेळ बागायतदारांवर येणार नाही, याची काळजी घेऊ. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सात वर्षांच्या काळात वर्षाच्या समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून काम केले आहे. त्यासाठी २६ योजना आणल्या आहेत. विविध योजना राबवताना त्यांनी जगात भारताची प्रतिष्ठाही वाढवली आहे, असे ते म्हणाले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply