सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे अपघाती निधन; पत्नीसह हेलिकॉप्टरमधील अन्य १२ जणांचाही मृत्यू

नवी दिल्ली : भारताच्या तिन्ही सैन्य दलांचे पहिले आणि विद्यमान सरसेनापती अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाल्याचं अखेर भारतीय हवाई दलाकडून नुकतंच ट्विटरवरून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं आहे. त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या अन्य ११ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या एका अधिकाऱ्यावर उपचार सुरू आहेत.

तमिळनाडूत निलगिरी पर्वतरांगेत कुनूर येथे आज (८ डिसेंबर २०२१) हा हेलिकॉप्टर अपघात झाला. जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी यांच्यासह एकूण १४ जण या हेलिकॉप्टरमध्ये होते. निलगिरी हिल्समधल्या वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधील प्राध्यापक आणि स्टाफ कोर्समधल्या विद्यार्थी ऑफिसर्सना मार्गदर्शन करण्यासाठी जनरल बिपिन रावत भारतीय हवाई दलाच्या Mi-17V5 या हेलिकॉप्टरमधून तेथे जात होते. डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधील डायरेक्टिंग स्टाफमधील ग्रुप कॅप्टन वरुण सिंग या अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वेलिंग्टनमधील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर रशियन बनावटीचे असून, २०१२ पासून ते भारतीय हवाई दलात कार्यरत होते. ते अत्याधुनिक लष्करी वाहतूक हेलिकॉप्टर होते. त्यावर वेदर रडार आणि लेटेस्ट नाइट व्हिजन डिव्हाइसेसदेखील होती. ऑटो पायलट सिस्टीमही त्यात उपलब्ध होती. एका वेळी १३ हजार किलो वजन घेऊन आणि ४००० किलो वजनाचा दारूगोळा घेऊन उड्डाण करण्याची त्याची क्षमता होती. दोन इंजिन्स असलेल्या या आधुनिक हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कसा झाला, याबद्दल अनेक तर्क लढवले जात आहेत.

१६ मार्च १९५८ रोजी जन्मलेले जनरल बिपिन रावत यांचे वडीलही सैन्यातच होते. वडील लष्कराच्या ज्या ११ गोरखा रायफल्समध्ये होते, त्याच ११ गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये जनरल बिपिन रावत १६ डिसेंबर १९७८ रोजी रुजू झाले. लष्करात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावून त्यांनी देशाच्या लष्करप्रमुख पदापर्यंत वाटचाल केली. ३१ डिसेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत ते देशाचे २६वे लष्करप्रमुख होते. त्यानंतर ३० डिसेंबर २०१९ रोजी त्यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस या पदावर नियुक्ती करण्यात आली. तिन्ही सैन्यदलांमध्ये समन्वय राखण्यासाठी देशात प्रथमच हे पद निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे जनरल बिपिन रावत हे पहिलेच सीडीएस होते. १ जानेवारी २०२० रोजी त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांचा अपघाती मृत्यू चटका लावून जाणारा आहे.

रावत यांचे अकाली आणि दुर्दैवी निधन झाल्यामुळे देशाचे आणि देशाच्या सैन्यदलाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवरांनी बिपिन रावत यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून, आदरांजली वाहिली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply