रत्नागिरी : ‘प्रत्येक रविवारी सायंकाळी छापते’ असे बिरूद घेऊन रत्नागिरीतून प्रसिद्ध होऊन समाजप्रबोधन आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करणारे साप्ताहिक सत्यशोधक (THE SATYA SHODHAKA) शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष (१८७१-२०२१) साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने मराठी पत्रकार दिनी ६ जानेवारी २०२२ रोजी एका खास विशेषांकाचे प्रकाशन रत्नागिरीत होणार आहे.
चौऱ्याऐंशिव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, लेखक उत्तम कांबळे यांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत भूषविणार असल्याची माहिती साप्ताहिक सत्यशोधकचे संपादक नितीन लिमये आणि विशेषांकाचे अतिथी संपादक धीरज वाटेकर यांनी दिली.
रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात ६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता प्रकाशनाचा समारंभ सुरू होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाचे कोकण विभागीय उपसंचालक डॉ. गणेश मुळे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार उपस्थित राहाणार आहेत.
सुमारे साडेचारशे पृष्ठसंख्या असलेल्या या विशेषांकात ‘पत्रकारिता : काल, आज आणि उद्या’, कोकण भूमिका, ‘कोकण विकास : माझी भूमिका, माझे योगदान’, कोकण स्मरण, पर्यटन, कोकण विकास, इतिहास, ग्रंथालये, नाट्य-साहित्य परंपरा, निसर्ग, शिक्षण, मंदिरे, शेती, पाणी, बंदरे, उद्योग, मुस्लिम समाज, समाजवाद, ज्योतिष परंपरा, लोककला, खाद्य संस्कृती, कोकण भविष्य अशा विविध ६५ हून अधिक विषयांवरचे लेख आहेत. लोकप्रतिनिधी उदय सामंत, आदिती तटकरे, माधव भांडारी, प्रमोद जठार, भानू काळे, उत्तम कांबळे, राजेन्द्रप्रसाद मसुरकर, प्रमोद कोनकर, अरविंद गोखले, श्रीपाद जोशी, कुमार कदम, प्रवीण बर्दापूरकर, डॉ. सागर देशपांडे, सतीश कामत, माधव गवाणकर, धनंजय चितळे, डॉ. श्रीकांत कार्लेकर, प्र. के. घाणेकर, सुमेध वडावाला (रिसबूड), मधु मंगेश कर्णिक, निशिकांत जोशी, सुधीर रिसबूड, प्रा. पंकज घाटे, भालचंद्र दिवाडकर, संदीप तापकीर, अण्णा शिरगावकर, डॉ. सुरेश जोशी, दिलीप कुलकर्णी, रेणू दांडेकर, अरुण मळेकर, डॉ. तानाजीराव चोरगे, डॉ. श्रीरंग कद्रेकर, डॉ. आसावरी बापट, मरिनर दिलीप भाटकर, डॉ. अनंत देशमुख, अब्दुल कादर मुकादम आदींचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे या अंकात १९५१ सालचा बाळासाहेब सावंत समितीचा रत्नागिरी जिल्हा – गृहोद्योग विकास समितीचा अहवाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘निवडक सत्यशोधक’ या सदरात १८८८ ते १९९६ दरम्यानच्या अंकातील निवडक ५४ पृष्ठे पुनर्प्रकाशित करण्यात येत आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण, जातीयता आणि विकासाच्या प्रश्नांना चालना देणारे सर्वसामान्यांचे व्यासपीठ असावे, असा सुप्त हेतू मनात बाळगून संस्थापक-संपादक कै. हरि नारायण लिमये यांनी साप्ताहिकाला ‘सत्यशोधक’ नाव दिले होते. कै. हरि नारायण लिमये हे गोळप (रत्नागिरी) मराठी शाळेत शिक्षक होते. पुढे ते त्याच शाळेचे मुख्याध्यापक झाले. गणित विषय विशेष चांगला असलेल्या कै. लिमये यांनी ‘त्रैराशिक-संग्रह‘ नावाचे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले होते. या पुस्तकात त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त फायदा झाल्यावर त्यांनी नोकरी सोडली आणि ‘सत्यशोधक प्रिंटिंग प्रेस’ नावाचा छापखाना काढून ‘सत्यशोधक’ नावाचे साप्ताहिक सुरू केले. ते गेली दीडशे वर्षे सुरू आहे. ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणे, सत्याचा वेध घेत परिस्थितीनुरूप वृत्त प्रकाशित करणे, राष्ट्रीय विचाराला प्राधान्य देणे अशा प्रमुख भूमिकेतून या साप्ताहिकाने त्या काळात तळकोकणात जनजागृती करण्याचे व्रत स्वीकारले होते. तो काळ पारतंत्र्याचा होता. तेव्हा हे धाडस करणे म्हणजे तळहातावर निखारा घेऊन चालण्यासारखे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर १९२४ ते १९३७ पर्यंत रत्नागिरीत स्थानबद्ध असताना त्यांनी हिंदू समाजातील जन्मजात जातीभेद नष्ट करणे, व्यायामप्रचार, स्वदेशीचा प्रचार, साक्षरता प्रचार आदी क्षेत्रात जी कार्ये केली. त्यात साप्ताहिक सत्यशोधकचा सहभाग होता. सावरकरांच्या सुटकेनंतर अवघ्या वीस मिनिटात ‘सत्यशोधक’ने आपली खास आवृत्ती प्रकाशित करून ती नागरिकांना दिली होती. ‘सत्यशोधक’ने आपल्या कार्यालयात तेव्हा सावरकर यांचा सन्मानही केला होता. त्यावेळच्या आपल्या भाषणातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘सत्यशोधक’बाबत व्यक्त केलेल्या भावना आज ‘सत्यशोधक’साठी सर्वोत्तम पुरस्कारासारख्या आहेत. अंकाच्या मुखपृष्ठावर त्याची आवर्जून नोंद घेण्यात आलेली आहे. ‘सत्यशोधक’च्या अंकातील काही अग्रलेख स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिले असावेत, असे तत्कालीन वाचकांचे म्हणणे होते. याचा विचार करता तेव्हाचे ‘सत्यशोधक’चे अंतरंग अतिजहाल होते हे स्पष्ट होते. प्रारंभीच्या काळात हस्तलिखित, नंतर शीळा प्रेसवरचे अंक, पुढे खिळ्याचा जमाना आल्यानंतर खिळा जुळणी पद्धतीने अंक आणि आता संगणकावरील आकर्षक अक्षरजुळणीने ऑफसेट मशीनवर अंकाची छपाई होते. या छपाई क्षेत्रातील परिवर्तनाचे हे साप्ताहिक साक्षीदार आहे. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर सत्यशोधकचा खप १२/१५ हजारांच्या घरात होता. तेव्हा त्याचा अखंड भारतात वाचकवर्ग होता.
साप्ताहिक ‘सत्यशोधक’च्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी विशेषांक प्रकाशन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी नितीन लिमये यांच्याशी 9423291319 या मोबाइलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media