पोंभुर्ले (देवगड) : ‘आज तंत्रज्ञानाच्या व्यापकतेमुळे छापील वृत्तपत्रांची मक्तेदारी कमी झाली असली, तरी प्रसारमाध्यमांची गती वाढली आहे. त्यामुळे पत्रकारितेमध्ये व्यापक होण्याला चांगली संधी आहे; मात्र घडामोडींच्या मागे धावताना सर्वांना झटपट पत्रकारिता हवी असल्याने पत्रकारितेतील आशय निघून चालला आहे. पत्रकारितेमध्ये समाजाचे प्रतिबिंब उमटत नाहीये. त्यामुळे पत्रकारितेचा मूलभूत उद्देश कमी होऊ न देता नागरिकांच्या आशा-अपेक्षांना बळ देण्याचे काम पत्रकारितेतून ताकदीने केल्यास ते बाळशास्त्री जांभेकर यांचे खरे स्मरण ठरेल,’ असे विचार ज्येष्ठ पत्रकार व दैनिक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले यांनी व्यक्त केले.
राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्या राज्य पातळीवरील प्रतिष्ठित ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण वसंत भोसले यांच्या हस्ते पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात करण्यात आले. त्या वेळी भोसले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, पोंभुर्ले गावचे उपसरपंच प्रदीप फाळके, सुधाकर जांभेकर, शांताराम गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
वसंत भोसले म्हणाले, ‘बाळशास्त्री, लोकमान्य आदी समाजधुरीणांचा पत्रकारितेचा दृष्टिकोन उदात्त होता. लोकशिक्षणाच्या उद्देशाने त्यांनी वृत्तपत्रे सुरू केली. ही परंपरा टिकवण्यासाठी, लोकशाही समृद्ध होण्यासाठी पत्रकारांनी आपली भूमिका बजवावी. वृत्तपत्रसृष्टीचा विस्तार झाला; पण जनकाचे स्मरण व्हावे यासाठी इतिहासाच्या संवर्धनात आपण मागे राहिलो आहोत. बाळशास्त्रींच्या कार्याला उजाळा देण्याचे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे काम उल्लेखनीय असून मराठी पत्रकारितेचा इतिहास सुवर्णाक्षरांनी नोंदवला जावा, यासाठी पत्रकारांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे.’
निरनिराळ्या प्रकारचे प्रश्न मांडताना पत्रकारांनी अभ्यास करण्याची गरज बोलून दाखवून पत्रकारितेतील मोठ्या परंपरा जतन करून पुढे नेल्या पाहिजेत, असे भोसले म्हणाले. ‘भरपूर माहिती उपलब्ध होण्याची संधी आज आहे. तिचा उपयोग करून लोकशाही समृद्ध करण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करावेत. इतिहासातील महत्त्वाच्या नोंदी ठेवण्यात आणि उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्तींची उचित स्मारके उभारण्याबद्दल आढळणारी उदासीनता सोडण्याची गरज आहे. शासनकर्त्यांना आणि पत्रकारांना जनतेच्या सुखदुःखांची माहिती नाही अशी आज अवस्था आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि समाजमाध्यमे आल्यावर माध्यमांची विश्वासार्हता संपली आणि त्याचा फटका वृत्तपत्रांना बसला,’ असेही ते म्हणाले.
‘पोंभुर्ले गावाला ऐतिहासिक महत्त्व असल्याने या ठिकाणी दर्पण पुरस्कारांचे वितरण केले जाते. संस्थेच्या अथक परिश्रमातून, लोकवर्गणी व लोकसहभागातून येथे बाळशास्त्रींचे स्मारक दृश्य स्वरूपात उभारले आहे. पत्रकारांनी या आपल्या पंढरीतून प्रेरणा घेऊन उज्ज्वल पत्रकारिता करावी,’ असे रवींद्र बेडकिहाळ अध्यक्षीय भाषणात म्हणाले. कर्मभूमी मुंबईमध्ये बाळशास्त्रींचे स्मारक व्हावे आणि नियोजित कोकण विद्यापीठाला बाळशास्त्रींचे नाव द्यावे, यासाठी पत्रकारांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी सभागृहातील जांभेकरांच्या अर्धपुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दर्पण स्मरणिकेचे प्रकाशन होऊन सन २०१९ व सन २०२० च्या दर्पण पुरस्काराचे वितरण वसंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. २०१९ च्या ‘दर्पण’ पुरस्कारप्राप्त पत्रकारांमध्ये ज्येष्ठ संपादक पुरस्कार – शिवाजीराव शिर्के (संपादक, सा. पवनेचा प्रवाह, पुणे), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत धाडसी पत्रकार पुरस्कार राहुल तपासे (सातारा जिल्हा प्रतिनिधी, एबीपी माझा), ‘दर्पण’ पुरस्कार मुंबई विभाग – विनया देशपांडे (मुंबई ब्युरो चीफ, सीएनएन न्यूज 18), पश्चिम महाराष्ट्र विभाग – गुरुबाळ माळी (सहायक संपादक, महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर), मराठवाडा विभाग – दयानंद जडे (संपादक, दै. लातूर समाचार, लातूर), विदर्भ विभाग – अनिल अग्रवाल (संपादक, दै. मातृभूमी, अमरावती), कोकण विभाग – संतोष कुळकर्णी (प्रतिनिधी, दै. सकाळ, देवगड), उत्तर महाराष्ट्र विभाग – निशांत दातिर (संपादक, निशांत दिवाळी विशेषांक, अहमदनगर), विशेष दर्पण पुरस्कार – जयपाल पाटील (संपादक, सा.रायगडचा युवक, अलिबाग), सुभाष भांबुरे (प्रतिनिधी, दै. नवराष्ट्र, फलटण) यांचा समावेश होता.

सन २०२०च्या दर्पण पुरस्कारप्राप्त पत्रकारांमध्ये ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार – योगेश त्रिवेदी (मुक्त पत्रकार तथा माध्यमतज्ज्ञ, मुंबई), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत धाडसी पत्रकार पुरस्कार – मंगेश चिवटे (पत्रकार, मुंबई), महिला दर्पण पुरस्कार – नम्रता फडणीस (प्रतिनिधी, दै. लोकमत, पुणे), दर्पण पुरस्कार मुंबई विभाग – रवींद्र मालुसरे (मुख्य संपादक, पोलादपूर अस्मिता, मुंबई), पश्चिम महाराष्ट्र विभाग – विनोद शिरसाठ (संपादक, सा. साधना, पुणे), मराठवाडा विभाग – आनंद कल्याणकर (आकाशवाणी प्रतिनिधी, नांदेड), विदर्भ विभाग – डॉ. रमेश गोटखडे (स्तंभलेखक, दै. हिंदुस्थान टाइम्स, अमरावती), कोकण विभाग – प्रमोद कोनकर (संपादक, सा. कोकण मीडिया, रत्नागिरी), उत्तर महाराष्ट्र विभाग – मिलिंद चवंडके (पत्रकार, अहमदनगर), विशेष दर्पण पुरस्कार – अॅड. बाबूराव हिरडे (संपादक, सा. कमलाभवानी संदेश, करमाळा), प्रा. रमेश आढाव (प्रतिनिधी, दै. तरुण भारत, फलटण), शिवाजी पाटील (प्रतिनिधी, दै. लोकमत, तारळे खुर्द) यांचा समावेश होता.
पुरस्कारप्राप्त पत्रकरांच्या वतीने योगेश त्रिवेदी, मंगेश चिवटे, मिलिंद चवंडके, जयपाल पाटील, संतोष कुळकर्णी, प्रा. रमेश आढाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विजय मांडके यांनी केले. सूत्रसंचालन करून आभार अमर शेंडे यांनी मानले.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media