लांजा : ‘बदलत्या काळानुसार पत्रकारिता बदलली असली, तरी सर्वसमावेशकता व तळागाळातील जनतेचे प्रश्न मांडणे हा पत्रकारितेचा गाभा आजदेखील कायम असून, यासाठीच पत्रकारांनी पारदर्शक असले पाहिजे,’ असे मत सुप्रसिद्ध नाटककार ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
लांज्यातील न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी सभागृहात लांजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर सभापती मानसी आंबेकर, उपसभापती दीपाली दळवी, नगराध्यक्ष मनोहर बाईत, जगदीश राजापकर, संदीप दळवी, उपनगराध्यक्ष स्वरूप गुरव, संस्थाध्यक्ष जयवंत शेट्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वंजारे, अनंत साळवी, संतोष म्हेत्रे, मुख्याध्यापक रमाकांत सावंत, दिलीप मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो. लांजा तालुक्यात १९८७मध्ये स्थापन झालेल्या लांजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने हा कार्यक्रम गेली ३७ वर्षे साजरा केला जात आहे. गेल्या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लांजाच्या तलाठी प्रणाली रेडीज, साप्ताहिक आंदोलनचे संपादक गजाभाऊ वाघदरे, माजी मुख्याध्यापक गणपत शिर्के, मुख्याध्यापक रमाकांत सावंत, सामाजिक कार्यकर्ते अविनाश उर्फ राजू जाधव, प्रसाद भाईशेट्ये, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. हेमंत पत्की, आनंदी भोजनालयाचे संचालक संतोष तुळसणकर, व्हेल हायस्कूलचे शिक्षक महेंद्र साळवी आदी मान्यवरांना लांजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने गौरविण्यात आले.
‘माझ्या जीवनात आलेल्या व्रतस्थ शिक्षकांमुळे मी घडलो असून, १९६०च्या दशकापासून आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, अग्रलेखाचे बादशहा खाडिलकर यांची पत्रकारिता पाहत मोठ्या झालेल्या पिढीतील मी एक साक्षीदार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पत्रकारांनी पारदर्शकपणे काम करण्याची गरज आहे,’ असे मत प्रमुख पाहुणे गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केले. लांजा तालुका पत्रकार संघाचे क्रियाशील व समाजाभिमुख वाटचालीबद्दल त्यांनी अभिनंदनही केले.
जगदीश राजापकर यांनी आपल्या मनोगतात सामाजिक बांधिलकीचे व्रत जोपासणाऱ्या लांजा तालुका पत्रकार संघाला त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल शुभेच्छा देऊन समाजात निरपेक्ष कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित करणाऱ्या संघाच्या या उपक्रमाला दाद दिली. या कार्यक्रमाचे निवेदन विजय हटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिल कासारे, रिझवान मुजावर, विनय बुटाला आदींनी मेहनत घेतली.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media