१२ जानेवारी ही स्वामी विवेकानंदांची जयंती. त्यांनी भारतीयांना केलेले आवाहन त्या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.
…..
स्वामी विवेकानंदांचे भारतीयांना आवाहन
स्वामी विवेकानंद म्हणतात, जगातील कोणत्याही देशाहून भारतातील संस्थांची ध्येये आणि उद्दिष्टे ही अधिक उच्च आहेत. जगातील प्रत्येक देशात मी भिन्न भिन्न प्रकारची जातिसंस्था पाहिली आहे. परंतु भारतात जातिसंस्थेची एक उत्कृष्ट व्यवस्था आहे. तिच्या मुळाशी जो एक उद्देश आहे, तसा इतरत्र कोठेही आढळत नाही. जाती विभाग जर टाळताच येत नसेल तर धनावर अधिष्ठित असलेल्या जाती विभागापेक्षा पावित्र्य, संस्कृती आणि त्याग यावर आधारलेला जाती विभाग मी पसंत करीन. म्हणूनच भारतीयांनो, निषेधाचे आणि निंदेचे शब्द उच्चारू नका. आपल्या हृदयाची कपाटे उघडा. आपली मातृभूमी आणि समस्त जग यांचा उद्धार करा. तुमच्यापैकी प्रत्येकाला याची जाणीव असू द्या की या कार्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावरच आहे. वेदांताची प्रकाशदायी तत्त्वे घरोघर पोहोचवा आणि प्रत्येकात ईश्वरतत्त्व जागृत करा. त्यातून यश कमी असो वा जास्त, तुम्हाला हे समाधान लाभेल की तुम्ही आपले जीवन एका महान कार्यासाठी व्यतीत केले आहे!
स्वामी विवेकानंदांनी त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांच्या पुढील कार्यासाठी कोलकात्याच्या जवळच्या बेलूर या ठिकाणी ९ डिसेंबर १८९८ रामकृष्ण मठाची स्थापना केली. मठातील कार्यकर्ते अविवाहित असावेत, असे त्यांचे मत होते. सर्व कार्यकर्त्यांनी शरीर सुदृढ करावे, सर्व व्यसनांचा समूळ त्याग करावा, तरच हे कार्य जोमाने होईल. आपल्याला भेटावयाला येणाऱ्या संसारी माणसांच्या सहवासात अधिक काळ राहू नये, समाजातल्या सर्व स्त्रिया या आपल्या माता-भगिनी आहेत, असा भाव मनात असावा. त्यांच्याशी आदराने वागावे, पण निकटचा संपर्क कधीही येऊ देऊ नये. तसेच पैसा आणि वासना यांपासून कार्यकर्त्यांनी सदैव दूर राहावे. हा संन्यस्त वृत्तीचा गाभा आहे. संन्यासाचे सारे सामर्थ्य त्यात सामावलेले असते. प्रचंड आत्मविश्वास धारण करावा, अशी त्यांची शिकवण होती.
जगाच्या इतिहासाला वळण देण्याचे महत्कार्य निर्धाराने करणाऱ्या आणि एखाद्या तत्त्वाला वाहून घेणाऱ्या जगात ज्या काही थोड्या व्यक्ती आहेत, त्यामध्ये विवेकानंदांचे स्थान उच्च दर्जाचे आहे. भारतीय आध्यात्मिक विचारांशी सुसंवाद साधणार्या व्यवहाराच्या पातळीवरील अशा अनेक गोष्टी विवेकानंदांनी आपल्या शिष्यांच्या मनावर बिंबवल्या होत्या. रामकृष्ण मठ या संस्थेने दुष्काळ, रोगांच्या साथीच्या काळात मदतकार्य केले आणि रुग्ण जर्जर व्यक्तींनाही मदत केली आहे. शैक्षणिक संस्था, समृद्ध ग्रंथालये तसेच उत्तम दर्जाची धार्मिक पुस्तके प्रकाशित करण्याचे काम रामकृष्ण संस्थेने मोठ्या प्रमाणावर केले. या संस्थेच्या भारतात आणि विदेशातही शाखा आहेत. स्वामींनी अशा तऱ्हेचे मोठे कार्य उभे केले आहे. त्यांना जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन.
(संग्राहक – विलास यशवंत राजवाडकर, खेड)
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
