रत्नागिरी जिल्ह्याला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा आहे. त्या जोपासण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही एक सामाजिक संघटना गेली सुमारे सात दशके हा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या सहा वर्षांपासून लांजा किंवा राजापूर या आपल्या कार्यक्षेत्रात आगळेवेगळे ग्रामीण साहित्य संमेलन या संस्थेतर्फे भरविले जाते. यावर्षी सातवे संमेलन होणार असून ते लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली या ऐतिहासिक संदर्भ असलेल्या गावात भरविले जाणार आहे.
सर्वपरिचित असलेल्या साहित्य संमेलनाचे स्वरूप या साहित्य संमेलनाला नसते. जेव्हा केव्हा साहित्य संमेलनाची सुरुवात झाली, तेव्हा मराठी साहित्यिक चळवळ रुजविण्यासाठी प्रयत्न झाले. त्यातून अनेक नवे साहित्यिक जन्माला आले. साहित्याच्या चळवळीने चांगलाच जोम धरला. गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनांना भव्यदिव्यत आली. पण त्यातून साहित्य चळवळ वाढीला लागण्यापेक्षाही हेवेदावे, मानापमान, कोट्यवधींचा खर्च, राजकीय पाठबळाची अगतिकता आणि ते मिळाल्यामुळे त्यांचीच तळी उचलून धरण्याची निर्माण झालेली प्रथा यात साहित्याची चळवळ हरवून गेली आहे. सर्वसामान्य वाचक या भव्यदिव्य साहित्य संमेलनांनी बिथरून जातो. तेथे जे काही चालते, ते म्हणजेच साहित्याची चळवळ आहे, असे त्याला वाटू लागते. कवी आणि साहित्यिकांविषयीचे वेगळेच चित्र त्याच्यासमोर निर्माण होते. संमेलनामुळे साहित्याची चळवळ वाढीला लागण्याऐवजी कमकुवत झाल्याचे चित्र दिसते. परस्परविसंगतीही तेथे जाणवते.
या साऱ्या पार्श्वभूमीवर राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने सुरू केलेले ग्रामीण साहित्य संमेलन वेगळे आहे. तेथे चर्चा नसतात. परिसंवाद नसतात. काही भाषणे असतात, पण ती नक्कीच प्रबोधनात्मक असतात. त्यापलीकडेही या ग्रामीण साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे साहित्य आणि कला क्षेत्राबरोबरच शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, शासकीय कर्मचारी, गृहिणी, उद्योजक अशा समाजाच्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना दिले जाणारे पुरस्कार. या व्यक्तींचा साहित्याशी काय संबंध आहे, असे वाटेल, पण एक लक्षात घेतले पाहिजे की साहित्याचे कथा, कादंबरी, कविता, व्यक्तिचित्रे, चरित्रे असे जे विविध प्रकार आहेत, त्या साऱ्यांचे मूलस्रोत म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती असतात. कौटुंबिक समस्या, सामाजिक प्रश्न, व्यक्तीव्यक्तींमधील संबंध, सामाजिक कार्य, शेतीच्या क्षेत्रात प्रयोग अनेक सर्वसामान्य व्यक्ती करत असतात. त्यांनी केलेले कार्य तथाकथित पुरस्कारांच्या कार्यकक्षेत येत नसेलही, तरी या व्यक्तींचे प्रयोग आणि त्यांनी केलेले कार्य हेच वाङ्मयाचे खरे स्रोत आहेत. कथा-कादंबऱ्यांमध्ये कदाचित काल्पनिकता असू शकते. पण अशा सर्वसामान्य व्यक्ती जे काही करत असतात, त्यात कोणतीही काल्पनिकता नसते. ते त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले जीवन असते. राबविलेले प्रयोग असतात. सुखदुःखे खरीखुरी असतात. ती बेगडी नसतात. पुन्हा हे सारे ती सर्वसामान्य माणसे समाजासाठी करत असतात. त्याची दखल समाजाकडून घेतली जातेच असे नाही. ही उणीव राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या ग्रामीण साहित्य संमेलनांमध्ये भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. हे पुरस्कार मोठे नसतील कदाचित, पण संपूर्ण संमेलनाला आवर्जून उपस्थित राहणाऱ्या रसिकांमुळे भरून गेलेल्या सभामंडपात टाळ्यांच्या कडकडाटात हे पुरस्कार दिले-घेतले जातात. त्या व्यक्तींच्या कार्याचा खऱ्या अर्थाने सन्मान केला जातो आणि त्यांना प्रोत्साहन मिळते. हेच प्रोत्साहन साहित्यिकांना लेखनासाठी विषय देत असते. म्हणूनच राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे ग्रामीण साहित्य संमेलन म्हणजे साहित्यस्रोतांच्या गौरवाचे संमेलन ठरते.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १८ फेब्रुवारी २०२२)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – १८ फेब्रुवारी २०२२ चा अंक
प्रभानवल्ली (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथे होणार असलेल्या सातव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने खास अंक
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : साहित्यस्रोतांच्या गौरवाचे संमेलन https://kokanmedia.in/2022/02/18/skmeditorial18feb/
मुखपृष्ठकथा : सर्वत्र व्हावा असा सांस्कृतिक उत्सव : रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख
ग्रामीण साहित्य संमेलनाची आवश्यकता : प्रमोद कोनकर यांचा लेख
प्रभानवल्लीच्या राजाचा झेंडा कुडाळपर्यंत : लांजा येथील विजय हटकर यांचा लेख
ज्ञानवृक्षाच्या छायेत साहित्य-संस्कृतीचा जागर : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांचा लेख
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड