करोनाकाळातील एका काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभानिमित्ताने लांजा येथे उपस्थित असलेले देवगड येथील कवी प्रमोद जोशी यांच्याविषयी राजापूर लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी केलेली कविता. तसेच श्री. जोशी यांच्या सहवासातून झालेल्या त्यांच्या व्यक्तिदर्शनाविषयी आणि कवितेविषयी विजय हटकर तसेच निबंध कानिटकर यांनी लिहिलेला लेख. श्री. जोशी यांच्या वाढदिवसानिमित्ताने.
…………
कविराज प्रमोद जोशी
शब्दप्रभूंनी लांज्यात
उधळली शब्दसुमने
स्वर्गसुखाच्या आनंदाने
प्रफुल्लित केली मने
धीरगंभीर डोहाच्या जवळी
उफाळत यावा कडा
कधी टाळ्या कधी शून्य शांतता
नकळत ओल्या नयनकडा
कधी चिंतन कधी हळूच चिमटा
कधी विदूषकी मनरंजन
हास्य फवारे पाहून गाफील
घाली माणुसकीचे अंजन
नाही नुसती वाचायची
नाही नुसती ऐकायची
प्रबोधनाचे हे अजोड माध्यम
कविता आत आत रिचवायची
काहीच नाही झाले असा
पीठ उतरला राजा
पुन्हा प्रेक्षकात बसला
क्षणिक मोठेपण करून वजा
कितीक नद्यांना उदरी घेऊन
सागर शांत आहे
विष पचवितो तरीही हसतो
कवी ‘देवगडी’ निवांत आहे.
- सुभाष लाड, मुंबई
……………………

अमृताचा सहवास : ‘प्रमोद जोशींची कविता : मराठी काव्यसृष्टीचे अक्षय लेणे’
एकविसाव्या शतकात मराठी कविपरंपरेत अग्रक्रमाने उल्लेख करावा असे कवी म्हणजे देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथील कविराज प्रमोद जोशी. संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अढळ निष्ठा जोशी सरांनी ढळू दिली नाही. त्यांच्या कवितेतून अलौकिक काव्य अनुभूतीचे मोरपीस अंतर्मनाला आल्हाद देत असते.
सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकावर जोशी सरांनी आपल्या सात्त्विक व्यक्तिमत्त्वाची मुद्रा उमटवली आहे. प्रेमळ स्वभाव आणि शब्दकळेतून माणसे जोडणाऱ्या या कविराजांचा आज जन्मदिवस.
जोशी सरांची कुटुंबवेल्हाळ वृत्ती त्यांच्या आत्मनिष्ठ कवितातून प्रकट होते. त्यांनी लिहिलेल्या ‘आई’ या कवितेतील गोडवा आणि आईचे वादातीत महत्त्व मनाला भावते.
आई म्हणजे असेतोवर
प्रत्येक क्षणी श्रम आहे!
मी जगतो आईला हाच,
शंभर टक्के भ्रम आहे.
या ओळीत जगण्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आई कुटुंबासाठी कार्यरत असते. ती वृद्ध झाल्यानंतरही आपण नाही तर तीच आपल्याला सांभाळते याची जाणीव समुचित शब्दांत कविराजांनी वर्णिलेली आहे.
नुसतं आई आठवून बघा
मनात आभाळ दाटून येतं!
आई असो आई नसो
काळीज क्षणात फाटून जातं!
मातेचे महत्त्व परिणामकारक शब्दात कविराजांनी मांडले आहे. ‘दुनिया का सर्वश्रेष्ठ योद्धा है माँ ‘ हा सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटातील डायलॉग आठवतो.
जोशी सरांनी राष्ट्रीय वृत्तीचा परिपोष करणारी आणि सामाजिक आशयाची कविता लिहिली. इतिहासातील स्फूर्तिप्रद क्षणांचे शब्दांकन करणारी, महापुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी भावनात्मक आवाहन करणारी कविता लिहितानाच, सहवासात आलेल्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि विधायक कामी धडपडणाऱ्या सहकाऱ्यांविषयी, स्नेह्यांविषयी कौतुकाचे चार शब्द कवितेच्या माध्यमातून लिहीत चांगले काम करणाऱ्यांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत अनेक ज्येष्ठ कवी एकापाठोपाठ एक दृष्टिआड होत होते. याच दोन दशकांत आधुनिक मराठी कवितेचे सामर्थ्य आणि सौंदर्य प्रकट करणारे विविधगुणी कविता घेऊन अनेक नवे प्रतिभावंत कवीही पुढे आले. नामदेव कोळी यांचा ‘काळोखाच्या कविता’, गीतेश शिंदे यांचा ‘निमित्तमात्र’, दासू वैद्य यांची ‘तूर्तास’ आणि ‘क कवितेचा’, ‘तत्पूर्वी’ हे काव्यसंग्रह, सौमित्र यांचा ‘गारवा ‘, ‘जावे कवितांच्या गावा ‘ हे काव्यसंग्रह याच काळात प्रसिद्ध झाले. याचवेळी स्वर्गीय सुंदर कोकणातून प्रमोद जोशींचा महाराष्ट्रभूषण, पद्मश्री कवी मंगेश पाडगावकर यांची मनस्वी प्रस्तावना लाभलेला ‘अक्षर ऋतू’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
जोशी यांना रंगछटांचे खूप आकर्षण आहे. त्यांच्या निसर्गवर्णन करणाऱ्या कवितेत रंगांची उधळण जागोजागी येते. निसर्गाचे नुसते रूप कवितेतून ते मांडत नाहीत, तर त्यात ते जीव ओततात. म्हणून त्यांच्या कविता सर्वश्रेष्ठ ठरतात. निसर्गात रमणारे, सुंदर सुंदर वर्णन करणारे, आनंदाची पखरण करणारे कविराज जोशी प्रेमकविताही उत्कटपणे लिहितात. याची प्रचीती खालील ओळीत येते.
तुझे नि माझे प्रेम निरामय,
नको करूया मुळी प्रदर्शन!
सहवासाने झाले आहे,
दोघांनाही सात्त्विक दर्शन!
प्रत्येक कवी थोड्याफार फरकाने आनंदयात्री असतो, पण जोशींच्या कवितेतील रसधुंद वृत्ती, सौंदर्याचे विभ्रम, सुकुमार शब्दकळेत पकडण्याची अंतर्दृष्टी, जीवनेच्छेतील उत्कटता, उत्फुल्लता आणि चैतन्यशीलता पाहिली, की आनंदयात्री ही संज्ञा जोशी यांना चपखलपणे लागू पडते. जोशी सर कवितेच्या नित्य सहवासात सुखावले. निरंतर अलौकिक अनुभूतीच्या शोधात ते मग्न राहिले. त्यांच्या आजवरच्या प्रवासात ‘कविता’ सदैव त्यांच्यावर प्रसन्न राहिली. त्यांच्या कवितेतील लय आणि लावण्य मनाला आल्हाद देतात. रूप-रस-गंध-स्पर्शमय संवेदनविश्वाला जाग आणणारी कविता ते लिहीत राहिले. कवितेबरोबर तेही आजवर बहरत गेले आहेत. जोशी सरांनी दैवदत्त गुणांचा विकास वाचनाने, चिंतनाने, मननाने आणि निदिध्यासाने केला. उत्कृष्ट संवेदनशीलता, तल्लख स्मरणशक्ती, व्युत्पन्नता, श्रुतयोजन कौशल्य आणि सूक्ष्म अवलोकन शक्ती या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्या कवित्वशक्तीचे पोषण झाले आहे.
निसर्गलयींशी साधलेली एकतानता हा जोशी सरांच्या प्रतिभासृष्टीचा गुणविशेष. निसर्ग अनुभूतीच्या साहचर्याने ते प्रेमानुभूतीचे प्रकटीकरण करतात. पर्जन्याच्या उत्सवाची विविध रूपे त्यांच्या कोकणी कवितेत आढळतात. ही पर्जन्यसूक्ते लिहिताना पावसाची बेहोशी ते अनुभवतात. रसिकांनाही चिंब भिजण्याचा आनंद देतात. कवित्वशक्ती हा त्यांच्या प्रतिभाधर्माचा केंद्रबिंदू आहे. काव्यनिर्मिती हाच त्यांचा ध्यास आहे. रसज्ञ कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि वाङ्मयीन कर्तृत्वाचा त्यांचा आलेख दिवसेंदिवस उंचावतो आहे.
आज (२८ फेब्रुवारी) त्यांचा जन्मदिवस. मराठी साहित्यजगतात त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो सहृदयांच्या शुभेच्छांचा वर्षाव आज त्यांच्यावर होईल. आम्हा लांजावासीयांच्या हृदयातही ते विराजमान झाले असल्यानेच हा शब्दप्रपंच. कविराज प्रमोद जोशी सरांचे वाढदिवसानिमित्ताने अभीष्टचिंतन करताना मनात एकच भावना दाटून येते,
काव्यांकुराचे अक्षय लेणे नित्य बरसत राहो.
शतायुषी प्रतिभेची लेणी मायमराठी पाहो!
- विजय हटकर
सहाय्यक शिक्षक
न्यू इंग्लिश स्कूल आणि
तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा
(संपर्क : ८८०६६३५०१७)
……………………..
शतायुषी व्हा कविराज…
आज एका शब्दप्रभूचा वाढदिवस….
प्रमोद जोशी अस त्यांचं नाव
.
अर्थात प्रमोद आणि जोशी ही दोन्ही नावं जितकी कॉमन आहेत, तेवढाच हा माणूस असामान्य आहे , शब्दभांडार आणि प्रतिभा यांच्या ठायी ठासून भरलेल्या …सामान्य माणसाच्या डोळ्याxसमोर असणाऱ्या कवीच्या प्रतिमेला अगदी छेद देणारं व्यक्तिमत्त्व, साधा शर्ट आणि पॅन्ट असा वेष असलेला माणूस कधी कवी असतो का हो? पण हे रसायनचं वेगळं… सकृतदर्शनी लांबून त्यांच्याबद्दल आपलं मत बनवायला जाल तर नक्की फसाल .. त्यांना अनुभवण्यासाठी त्यांच्या जवळ जावं लागेल. नुसतं शरीरानं नाही, मनानंसुद्धा आणि मग त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा रसास्वाद असा काही मिळेल की तुम्ही त्यांच्यापासून लांब जाऊच शकणार नाही…
तर असे हे आमचे मित्र, माझ्यापेक्षा तब्बल १४ वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसाला आणि तेही ज्यांच्या प्रतिभेचा तीळही माझ्याजवळ नसूनसुद्धा मी त्यांना मित्र म्हणण्याचं धाडस करतोय, ते केवळ आणि केवळ प्रेममयी संबंधामुळेच… जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
हे मान्यच, पण माझ्यासारख्या एका अतिसामान्य माणसावरसुद्धा त्यांनी एक नाही दोन नाही तीन – तीन कविता करून उगाचच मला नसलेला मोठा केला, याला किती प्रतिभा लागत असेल नाही का?
पण एक नक्की सांगतो, या माणसाला शब्द शरण आहेत, जणू काही शब्द हात जोडून यांच्या उंबरठ्यावर उभे असतात आणि वाट पाहत आळवणी करतात – ‘ कविराज, आम्हाला तुमच्या कवितेत जागा द्या ना ‘ अशी…. इतकं प्रचंड शब्दसामर्थ्य असलेला हा माणूस, माणूस तरी कसं म्हणावं हा प्रश्न पडतो. कारण त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार आणि व्यक्त होण्याचा वेग पाहिला की अचंबित व्हायला होतं…आपण १ ते १० अंक जेवढ्या सहजतेने लिहावेत, तेवढ्या सहजतेने हे कविता करतात. ही दैवी देणगीच नाही का? बरं त्यात शब्दयोजनाही एवढी अचूक की याजागी याच्याऐवजी हा शब्द हवा होता का, असा विचारही आपल्या मनात येत नाही. माडगूळकर , बोरकरांसारखे कवी बघण्याचं भाग्य आम्हाला लाभलं नाही, पण आम्ही अभिमानाने सांगू शकतो की, आम्ही प्रमोद जोशींना पाहिलंय, आम्हाला प्रमोद जोशींचा सहवास लाभलाय…. त्यांनी माझ्यासारख्या अनेक जणांचं जगणं समृद्ध करण्यास मदत केलीय….
आणि म्हणून आम्हा रसिकांसाठी कविराज तुम्हाला शतायुषी व्हावचं लागेल…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कविराज…आपणास उत्तम आयुरारोग्य लाभो ही कर्णेश्वरचरणी प्रार्थना करून शब्दप्रभूंना शुभेच्छा देण्याइतकी शब्दसंपदा माझ्याकडे नसूनसुद्धा ते धाडस केल्याबद्दल सर्व रसिकांची क्षमा मागून इथेच थांबतो.
- निबंध कानिटकर, संगमेश्वर
(९४२२३७६३२७)