बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे सिंधुदुर्गला दोन, तर रत्नागिरीला चार पुरस्कार

रत्नागिरी : येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे सन २०२१ या वर्षाचे पुरस्कार जाहीर झाले असून प्रथमच एकावेळी तीन महिलांना सन्मानित केले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला दोन तर रत्नागिरी जिल्ह्याला चार पुरस्कार मिळाले आहेत. एकूण तीन विभागात एक संस्था आणि पाच व्यक्ती यांचा समावेश आहे.

अनिता साळगावकर
श्रीमती शालिनी आठल्ये

पुरस्काराने सन्मानित केले जाणार असलेल्यांमध्ये शिपोशी (ता. लांजा) येथील श्रीमती शालिनी आठल्ये या वयाने सर्वांत ज्येष्ठ आहेत, तर कणकवलीतील कवयित्री कु. अनिता साळगावकर ही वयाने सर्वांत तरुण आहे. त्रैवार्षिक स्वरूपाचा संस्थात्मक पुरस्कार यावर्षी चिपळूण येथील सह्याद्री निसर्गमित्र संस्थेला मिळाला आहे. पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार मिळविणारी ही तिसरी संस्था आहे.

वार्षिक कर्तव्यनिष्ठ पुरस्कारप्राप्त दोन जणांमध्ये संगमेश्वर येथील जीवशास्त्र विषयाच्या निवृत्त शिक्षिका सौ. उमा शिरीष दामले यांचा समावेश आहे. आपल्या ३५ वर्षांच्या सेवेत त्यांनी विद्यार्थी आणि महिलांसाठी आरोग्यपूर्ण पोषण आहार देण्याचे कार्य केले. त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. महावितरणमध्ये सेवा बजावताना डोंगरदऱ्या, झाडी, काळोख, वारा, पाऊस आणि वादळे यांची पर्वा न करता अगदी निवृत्तीपर्यंत आघाडीवर राहणारे कुरधुंडा (ता. संगमेश्वर) येथील हरिश्चंद्र भिकाजी निंगावले हे कर्तव्यनिष्ठ पुरस्काराचे दुसरे मानकरी आहेत. या दोघांनाही सन्मानपत्र व एक पुस्तक दिले जाणार आहे.

वसंत काळे

वार्षिक कार्यगौरव पुरस्काराचे एकूण तीन मानकरी आहेत. नि:स्वार्थी वृत्तीने सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या शिपोशी (ता. लांजा) येथील ८९ वर्षीय श्रीमती शालिनी धोंडदेव आठल्ये आणि नियतीने दिव्यांग बनवले तरी न खचता समुपदेशन करत इतरांना जगण्याची स्फूर्ती देणारी कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथील कवयित्री कु. अनिता मुरलीधर साळगावकर या दोघांचा त्यात समावेश आहे. कोकणातील निसर्गाचे वाचन करून दुर्मीळ रानफुले, कीटक, वृक्ष, फुले यांच्या माहितीचा समाजमाध्यमातून जगभर प्रसार करणारे आणि एक जिवंत संदर्भ बनलेले पडेल (ता. देवगड) येथील निवृत्त शिक्षक वसंत विनायक काळे हे तिसरे पुरस्कारविजेते आहेत. प्रत्येकी तीन हजार रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सौ. उमा दामले

सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांना पुरस्काराची रक्कम बँकेतून दिली जाणार आहे. सन्मानपत्र रजिस्टर्ड पोस्टाने पाठवण्यात येणार आहेत, असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव संतोष देसाई यांनी कळविले आहे.

हरिश्चंद्र निंगावले

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply