नवी दिल्ली : यंदाच्या उन्हाळ्यात देशभरात तापमानाने नवे उच्चांक गाठलेले असताना सर्वांना प्रतीक्षा आहे ती मान्सूनची. आणि तो अखेर अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज म्हणजेच १६ मे २०२२ रोजी नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमानच्या समुद्रात येऊन दाखल झाले आहेत. २७ मे रोजी मान्सून केरळला थडकणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
दक्षिण अंदमानचा समुद्र, निकोबार बेटं आणि बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे या भागांत पुढचे पाच दिवस वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस पडणं अपेक्षित आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची तारीख सर्वसाधारणपणे एक जून असते, तर तो महाराष्ट्रात म्हणजेच कोकणात सात जूनच्या सुमारास दाखल होतो. यंदा मान्सूनचं आगमन अंदमानातच लवकर झाल्यामुळे केरळमध्ये आणि महाराष्ट्रातही (कोकण) तो वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनचं आगमन झाल्याबरोबर मध्य आणि उत्तर भारतातल्या उष्णतेच्या लाटेपासूनही किंचित दिलासा मिळण्याची शक्यता असून, तीव्रता थोडी घटण्याची शक्यता आहे.
यंदा मान्सून केरळमध्ये २७ मे रोजी दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यात चार दिवस पुढे किंवा मागे होऊ शकतात. २०१७ ते २०२१ या वर्षांमध्ये मान्सून केरळला येण्याच्या तारखेचा अंदाज अनुक्रमे ३० मे, २९ मे, ६ जून, ५ जून आणि ३१ मे असा वर्तवण्यात आला होता. या वर्षांमध्ये मान्सून केरळमध्ये प्रत्यक्ष दाखल होण्याच्या तारखा अनुक्रमे ३० मे, २९ मे, ८ जून, १ जून आणि ३ जून अशा होत्या. त्यामुळे यंदा तो केरळमध्ये कधी येतोय, याची आता उत्सुकता लागून राहिली आहे.
गेली सलग दोन वर्षं अरबी समुद्रात निसर्ग आणि तौते ही चक्रीवादळं आल्यामुळे पाऊस लवकर सुरू झाला; मात्र मान्सूनच्या वितरणावर परिणाम झाला. त्यामुळेच यंदाच्या मान्सूनच्या वाटचालीकडे सर्वच जण डोळे लावून बसले आहेत.

