सु. द. भडभडे यांच्या `अंतरंग`ला कोमसापचा पुरस्कार

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचा वाङ्मयीन पुरस्कार निवृत्त शिक्षक सु. द. भडभडे यांच्या अंतरंग या आत्मकथनपर पुस्तकाला जाहीर झाला आहे. याशिवाय दोन वर्षांचे वाङ्मयीन पुरस्कार परिषदेने जाहीर केले आहेत.

कोकण मराठी साहित्य परिषदेने २०१८-१९ ते २०२०-२१ या तीन वर्षांच्या वाङ्मयीन व वाङ्मयेतर क्षेत्रातील पुरस्कारांसाठी ७४ जणांची निवड केली आहे. त्यामध्ये निवृत्त शिक्षिका कमल बावडेकर, पत्रकार सतीश कामत आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी श्रद्धा हळदणकर हिचा समावेश आहे. पालघर येथे सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात येत्या १२ जून रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रसारासाठी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड प्रयत्नशील असणाऱ्या कोमसापकडून गेल्या २५ वर्षांपासून वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर क्षेत्रातील योगदानासाठी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. परंतु करोनाकाळातील निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांत या पुरस्कारांचे वितरण शक्य झाले नाही. आता कोमसापकडून सन २०१८-१९, २०१९-२० आणि २०२०-२१ अशा गेल्या तीन वर्षांतील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात कादंबरी, कथा, कविता, चरित्रपर, ललित, समीक्षा, वैचारिक, बालवाङ्मय आदी साहित्यप्रकारांतील उल्लेखनीय साहित्यकृतींद्वारे तसेच वाङ्मयीन व्यवहार, पर्यावरण, शिक्षण आदी क्षेत्रांत कृतिशील योगदान असलेल्या ७४ पुरस्कार्थींचा समावेश आहे. प्रा. अशोक ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कार्थींची निवड केली आहे.

कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर,केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि पालघर येथे होणाऱ्या महिला साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष ज्योतीताई ठाकरे यांनी पुरस्कारांची घोषणा केली. हे पुरस्कार असे – २०१८-१९ वर्षीचा अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार सुभाष भडभडे (संकीर्ण- ‘अंतरंग’), सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार (महाविद्यालयीन लिहित्या विद्यार्थिनीसाठी) श्रद्धा लक्ष्मण हळदणकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय). २०१९-२० वर्षीचा कोमसापचा विशेष पुरस्कार निवृत्त शिक्षिका कमल पु. बावडेकर (संपादित- ‘कमल पुष्प’), २०२०-२१ वर्षीचा श्री. बा. कारखानीस पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, पेम संस्थेचे प्रमुख सतीश कामत (संगमेश्वर) (हा पुरस्कार साहित्य, पर्यावरण, शिक्षण- विशेषतः शिक्षण क्षेत्रात योगदान असलेल्या कोकणातील मान्यवर व्यक्तीला दिला जातो.)

सहावे महिला साहित्य संमेलन पालघरला

कोकण मराठी साहित्य परिषदेचे महिला साहित्य संमेलन येत्या ११ आणि १२ जून रोजी पालघर येथे होणार आहे. प्रसिद्ध लेखिका-संपादक मोनिका गजेंद्रगडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे सहावे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन आयोजित केले आहे. संमेलनाच्या उद्घाटन समारंभास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे,राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात विविध ७४ वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या समारंभाला खासदार सुप्रिया सुळे, अभिनेत्री निशिगंधा वाड आणि कवयित्री नीरजा विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply