रत्नागिरीचे तरुण न्यूरोसर्जन डॉ. श्रीविजय फडके यांना सुवर्णपदक; शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा

रत्नागिरी : मेंदूसारख्या गुंतागुंतीच्या आणि शरीरातल्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवाच्या शस्त्रक्रिया रत्नागिरीसारख्या ठिकाणी अत्यंत कुशलतेने आणि अल्प खर्चात पार पाडून अनेकांना नवं आयुष्य देणारे तरुण न्यूरोसर्जन डॉ. श्रीविजय अनिरुद्ध फडके यांच्या शिरपेचात आता मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. नवी दिल्लीच्या ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस’ (NBEMS) या संस्थेतर्फे घेतल्या DrNB च्या अंतिम परीक्षेत (DrNB Exit Exam) त्यांना न्यूरोसर्जरी या विषयात सुवर्णपदक मिळालं आहे. जून २०२०मध्ये त्यांनी ही परीक्षा दिली होती. जून २०१९ ते जून २०२१ या कालावधीत ही परीक्षा दिलेल्यांकरिता दीक्षान्त सोहळा २० जून २०२२ रोजी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये होणार आहे. त्या वेळी डॉ. श्रीविजय यांच्यासह अन्य सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्यक्ष गौरवण्यात येणार आहे. NBEMS च्या वेबसाइटवर याबद्दलची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. NBEMS चा हा २१वा दीक्षान्त सोहळा असेल.

कोलकात्यातील इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेतून डॉ. श्रीविजय फडके यांनी ही परीक्षा दिली होती. डॉक्टरेट ऑफ नॅशनल बोर्ड (Doctorate of National Board – DrNB) हा तीन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट किंवा पोस्ट डॉक्टरल दर्जाचा शिक्षणक्रम असतो. यापूर्वी डॉ. श्रीविजय यांनी २०१८मध्ये न्यूरोसर्जरी या विषयात कोलकाता विद्यापीठातून सुवर्णपदक मिळवले होते. अवघ्या ३४ वर्षांच्या असलेल्या डॉ. श्रीविजय यांनी आतापर्यंत एमबीबीएस, एमएस, एमसीएच (न्यूरोसर्जरी) आणि डीएनबी (न्यूरोसर्जरी) या पदव्या आतापर्यंत प्राप्त केल्या आहेत. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजिकल सोसायटीजची (WFNS) अत्यंत प्रतिष्ठेची अशी फेलोशिपही त्यांना मिळाली होती.

रत्नागिरीतील (दिवंगत) वेदशास्त्रसंपन्न पुरुषोत्तमशास्त्री फडके यांचे डॉ. श्रीविजय हे नातू. डॉ. श्रीविजय यांचे वडील डॉ. अनिरुद्ध हे दापोलीतील प्रख्यात बालरोगतज्ज्ञ. ज्ञानाचा हा वारसा डॉ. श्रीविजय यांनीही समर्थपणे पुढे चालवला आहे. डॉ. श्रीविजय यांचे शालेय शिक्षण दापोलीतील ए. जी. हायस्कूलमध्ये झाले. शाळा-महाविद्यालयात असतानाही ते गुणवत्ता यादीत आले होते. सोलापूरच्या डॉ. व्ही. एम. गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS चे शिक्षण घेतले. त्यानंतर कोलकात्यात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. काही काळ त्यांनी नागपूरच्या गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये रेसिडेंट सर्जन म्हणून सेवा दिली. कोलकात्यात SSKM हॉस्पिटलमध्ये निवासी न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत असताना त्यांनी तीन वर्षांत मेंदूवरच्या सुमारे ५०० शस्त्रक्रिया केल्या होत्या.

शैक्षणिक कारकीर्द अत्यंत उज्ज्वल असल्यामुळे त्यांना देश-परदेशात कुठेही अत्यंत उत्तम पगाराची नोकरी मिळू शकली असती; मात्र आपल्या गावातल्या पेशंट्सना कमी खर्चात मेंदूवरचे उपचार उपलब्ध व्हावेत, म्हणून त्यांनी २०१९मध्ये रत्नागिरीत यायचा निर्णय घेतला. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात न्यूरोसर्जन म्हणून ते रुजू झाले. ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारांसाठी रत्नागिरीत येतात; मात्र सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कोल्हापूर किंवा मुंबई-पुण्याला पाठवावे लागत असे. डॉ. श्रीविजय रत्नागिरीत आल्यामुळे इथेच उपचार मिळणे शक्य झाले. ते रुजू झाल्यानंतर अगदी पहिल्या महिन्यातच मणका आणि मेंदूवरच्या सुमारे ११ महत्त्वाच्या, मोठ्या शस्त्रक्रिया डॉ. श्रीविजय यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात केल्या. या उपचारांची किती गरज होती, हे सांगण्यासाठी हा आकडा पुरेसा ठरावा. न्यूरोसर्जरीसाठी आवश्यक असणारी सामग्री रुग्णालयात उपलब्ध नसल्याने त्यांनी ती स्वखर्चाने आणली, हेही दखल घेण्यासारखे आणि प्रशंसनीय.

त्यांनी रत्नागिरीत अनेक महत्त्वाच्या आणि अवघड शस्त्रक्रिया लीलया पार पाडल्या. अगदी एका दिवसाच्या बाळावरही शस्त्रक्रिया करून त्यांनी त्याला नवे जीवन दिले. रुग्णाला जागे ठेवून केली जाणारी क्रॅनिओटॉमी नावाची शस्त्रक्रियाही त्यांनी केली. महानगरात नव्हे, तर त्यांनी रत्नागिरीसारख्या छोट्या शहरात केलेल्या अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांपैकी ही निवडक उदाहरणे. गेल्या वर्षी चक्रीवादळाच्या दिवशी ते दापोलीत होते. तेव्हा रत्नागिरीतून एका रुग्णासाठी तातडीचा फोन आला. तेव्हा ते बाकी कशाची पर्वा न करता त्या दिवशी रत्नागिरीत आले आणि रात्री उशिरापर्यंत ऑपरेशन करून त्या रुग्णाला जीवदान दिले.

रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासह चिरायू हॉस्पिटलमध्येही डॉ. श्रीविजय फडके सेवा देतात. तसेच, रत्नागिरी शहरात आरोग्य मंदिर येथे श्रीयश कॉम्प्रिहेन्सिव्ह ब्रेन अँड स्पाइन क्लिनिक हा त्यांचा स्वतःचा दवाखानाही आहे. याव्यतिरिक्त ते चांगले बॅडमिंटनपटूही असून, मेंदूतील गुंतागुंत अगदी सहजपणे सोडवणारी त्यांची बोटे हार्मोनियमवरही तितकीच लीलया फिरतात. पावसजवळच्या कुर्धे या मूळ गावी असलेल्या उत्सवांनाही ते व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून हजेरी लावतात, उत्सवातील भोवत्यांत हौशीने नाचतात आणि पेटीची साथही करतात. शंभर नंबरी सोने असलेल्या या व्यक्तिमत्त्वाला आता मिळालेल्या सुवर्णपदकामुळे अधिकच झळाळी मिळाली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply