इलेक्ट्रिक गिझरमुळे शॉक लागतो का?

गेली अनेक वर्षे गृहोपयोगी वस्तू आम्ही लांजा शहरात वितरित करत आहोत. विक्री करत असताना एखाद-दुसरा ग्राहक वस्तू वापरण्यासंदर्भात काही प्रश्न विचारतात, त्याला अनुसरून वस्तूची निवड कशी करावी, वापर कसा करावा, कोणती काळजी घ्यावी, अशा काही नोट्स यापूर्वी मी स्वतः काही अप्लायन्सेसच्या बाबतीत तयार करून त्याची झेरॉक्स देऊन किंवा सोशल मीडियाद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या महिन्यात एका ग्राहकाने “इलेक्ट्रिक गिझर वापरताना शॉक लागण्याचा धोका असतो का?” असा प्रश्न विचारला. मग याविषयी काही उपयुक्त माहिती एकत्रित करावी या अनुषंगाने हा आणखी एक प्रयत्न.

मित्रहो, कोणत्याही इलेक्ट्रिक अप्लायन्सेसला शॉक लागण्याचा धोका असतो का नसतो? यावर ठरावीक परिस्थितीत असू शकतो, असेच म्हणावे लागेल, इलेक्ट्रिक अप्लायन्सेसचा वापर तर आजच्या काळात अनिवार्य आहे, मग काळजी घेणे हा एकमेव उपाय आहे.
इलेक्ट्रिक गिझरमध्ये नेमके काय असते, ते ढोबळ मानाने आधी पाहू या. कॅबिनेट, हिटसिंक वूल, टॅन्क, कॉइल, टेम्परेचर कटऑफ इत्यादी. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉइल.
कॉइलमध्ये हीट एलिमेंट (जे इलेक्ट्रिक सप्लाय मिळाल्यावर हीट निर्माण करते), इन्सुलेशन पावडर (जे हिट ट्रान्सफर करते पण इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्सफर होऊ देत नाही), मेटल ट्यूब (जे हिट पुढे म्हणजे पाण्यामध्ये ट्रान्सफर करते, म्हणजेच पाणी गरम करते) असे इंटर्नल पार्ट असतात.

कॉइलसोबत टॅन्कमध्ये थर्मोस्टॅटदेखील असतात. टॅन्क व कॅबिनेट याच्या मधे हिटसिंक वूल असते.

ज्या टॅन्कमध्ये कॉइल इन्सर्ट केलेली असते, तिथून येणाऱ्या पाण्याला शॉक लागू नये, पाणी अतिगरम होऊ नये, कॅबिनेटला हात लावल्यास चटका बसू नये, अशा प्रकारची रचना ९९ टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादकांनी करणे हे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सहज शक्य आहे आणि तसेच केलेले असते.

मग शॉक लागण्याची क्वचित कधीतरी घटना कशी घडते? यालाच अपघात म्हणतात, तो कसा उद्भवू शकतो ते पाहा.

इलेक्ट्रिक गिझरची कॉइल सतत पाण्याच्या संपर्कात राहून जर त्यातील मेटल ट्युब वर पाण्यातील क्षारांचा थर तयार झाला किंवा गन्ज पकडला किंवा, किंवा अनेक वर्ष वापरामुळे जर कॉइलला छोटेसे जरी छिद्र पडले, तरी कुठेतरी मेटल ट्यूब लीक होऊन पाणी इन्सुलेशन पावडरच्या संपर्कात येते आणि त्या भागातील इन्सुलेशन पावडर हळूहळू पाण्यामध्ये मिसळून वाहून जाते. परिणामी हिट एलिमेंटमधील हिटबरोबर इलेक्ट्रिक सप्लायदेखील थेट मेटल ट्यूब आणि पुढे पाण्याला मिळाला तर शॉक लागण्याची शक्यता असते.
यावेळी अशा ठिकाणी जर योग्य पद्धतीने अर्थिन्ग केलेले असेल आणि योग्य क्षमतेची एमसीबी+ईएलसीबी व्यवस्थित कार्यरत असेल तर संभाव्य मोठा धोका टळू शकतो किंवा कमी होऊ शकतो.

.. वाहन असो वा उपकरण, अपघात होईल या भीतीने वापर टाळण्यापेक्षा (अशा किती वस्तूंचा वापर टाळणार?) अपघात होऊ नये म्हणून काळजी घेणे जास्त योग्य! बरोबर ना?

इलेक्ट्रिक गिझर वापरताना कोणती काळजी घ्यावी, यातील काही मुद्दे

 • इलेक्ट्रिक गिझरला सप्लाय देण्यासाठी किमान अडीच एम एम स्क्वेअर वायरचा आणि सोळा अॅम्पिअर बोर्डाचा वापर करणे
 • शक्यतो मीटर ते योग्य क्षमतेची एमसीबी+ईएलसीबी ते गिझर असे कनेक्शन आणि सोबत प्रॉपर अर्थिन्ग फार महत्त्वाचे.
 • पाणीपुरवठा सुरळित असल्याची खात्री करून नंतरच पॉवर ऑन करणे
 • वातावरणानुसार (उन्हाळा, पावसाळा, हिवाळा) पाण्याचा फ्लो कमी-जास्त ठेवणे. (फ्लो जास्त ठेवला – तर – कमी गरम होणार)
 • ठरावीक कालावधीनंतर उपकरणाची तपासणी वा सर्व्हिसिंग करून घेणे (पाण्याचा टीडीएस अति असेल तर (विशेष करून बोअरवेलचे पाणी वापरत असाल तर), हा कालावधी कमी असणार आहे.)
 • कधीही काही शंका असल्यास उपकरण तात्पुरते बंद ठेवून जाणकार इलेक्ट्रिशियनचा सल्ला घेणे
  तसेच
 • कंपनी आणि मॉडेलनुसार आणखी काही सूचना आहेत का, यासाठी इन्स्ट्रक्शन मॅन्युअल समजून घेणे.
  आणि
  अगदीच अतिकाळजी घ्यायची असेल तर
 • शक्यतो मेटलऐवजी चांगल्या दर्जाचे पीव्हीसी पाइप, टॅप आणि बकेट, मग वापरणे.
 • गिझर सुरू असताना पाण्याच्या धारेला किंवा बादलीतील पाण्याला हात लावणे टाळावे.
  तसे पाहता प्रॉपर अर्थिन्ग आणि योग्य क्षमतेची एमसीबी+ ईएलसीबी असेल तर फार घाबरण्याचे कारण नाही. (दुर्दैवी अपवादात्मक घटना वगळता).
  क्वचित कधीतरी होणाऱ्या अपघाताला उपकरणे वा उत्पादक याऐवजी बर्‍याच वेळा अज्ञान, दुर्लक्ष, बेफिकिरी, संलग्न इतर गोष्टी जास्त जबाबदार असाव्यात बहुधा.

खरे तर इलेक्ट्रिक गिझर हे एक सुंदर उपकरण आहे. आमच्यासह अनेक डीलर विविध कंपन्यांचे इलेक्ट्रिक गिझर विक्री करतात, एकत्रित ग्राहकांची संख्या हजारो आहे, अनेक वर्षे हे उपकरण बाजारपेठेत आणि घराघरांत आहे. इलेक्ट्रिक गिझर ज्यांच्याकडे पूर्वीपासून आहे किंवा जे नवीन घेण्याचा विचार करत आहेत, त्या सर्वांनी प्रॉपर अर्थिन्ग आणि योग्य क्षमतेची एमसीबी+ईएलसीबी असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करतो.

©.. मनिष सोल्युशन्स, लांजा
डोमेस्टिक अप्लायन्सेस
(एस. व्ही. कुलकर्णी)
(बी ई इलेक्ट्रॉनिक्स)
लांजा 416701
(संपर्क : 9970593910)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply