दापोलीत पर्यावरणदिनी सायकल फेरी, संथ सायकल स्पर्धा

दापोली : जागतिक सायकल दिन आणि पर्यावरण दिनानिमित्त उद्या (दि. ५ जून) दापोली येथे सायकल फेरी आणि स्लो सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

दरवर्षी ३ जून रोजी जागतिक सायकल दिवस आणि ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. मनुष्य आणि पर्यावरण यांचे अतूट नाते आहे. निसर्गाशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही. त्यासाठी प्रदूषणकारी वाहनांपेक्षा सायकल चालवणे केवळ पर्यावरणासाठीच चांगले नाही, तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. सायकलचे महत्त्व आणि आरोग्यादायी फायदे समजून सांगण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धन जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सायकल फेरी झाल्यावर आझाद मैदान दापोली येथे स्लो सायकल स्पर्धा होतील.

ही सायकल फेरी आझाद मैदानातून सकाळी सात वाजता सुरू होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कोकंबा आळी, श्री भैरीभवानी मंदिर-गिम्हवणे, सोनार वाडी, तेली वाडी, एकता नगर, टांगर गल्ली, बुरोंडी नाका या मार्गाने जाऊन ती आझाद मैदानात समाप्त ईल. ही ६ किलोमीटरची फेरी असेल. सायकल फेरी झाल्यावर आझाद मैदानात सव्वाआठ वाजता स्लो सायकल स्पर्धा ३ गटात होतील. प्रत्येक गटातील ३ विजेत्यांना चषक, भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

सायकल फेरीसाठी आणि स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतील. अधिक माहितीसाठी ८६५५८७४४८६, ९६७३७५०५५८ या क्रमांकावर संपर्क साधावा. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे सर्वांसाठी दर महिन्याला विनामूल्य एक सायकल फेरी आयोजित केली जाते. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नेहा जोशी, दापोली यांनी रेखाटलेले चित्र

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply