रत्नागिरीत सायकल दिनाची फेरी उत्साहात

रत्नागिरी : जागतिक सायकल दिन आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने आयकॉनिक रत्नागिरीत आज सायकल फेरी पार पडली‌. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून फेरीचा प्रारंभ केला.

दरवर्षी ३ जून जागतिक सायकल दिवस जगभरात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये ३ जून ते १० जून दरम्यान सायकल फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील काही आयकॉनिक जिल्ह्यांमध्ये सायकल फेरीचे आयोजन केले जाणार आहे. महाराष्ट्र क्रीडा विभागाच्या वतीने रत्नागिरी, पुणे, नागपूर आणि वर्धा असे चार जिल्हे आयकॉनिक जिल्हे म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित देशव्यापी कार्यक्रमाचा भाग म्हणून आज रत्नागिरीत सायकल फेरी पार पडली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ही सायकल फेरी युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे देशभरात जागतिक सायकल दिनाचे आयोजन करण्यात आली. नेहरू युवा केंद्रातर्फे देशातील ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची राजधानी आणि देशभरातील ७५ महत्त्वाच्या ठिकाणी सायकल फेरीचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरीचा समावेश आहे.

रत्नागिरीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी क्रीडांगणापासून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मारकापर्यंत सायकल फेरी पार पडली. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह १०० जण सहभागी झाले. सायकल चालवा आणि निरोगी राहा असा संदेश देत प्रत्येकाने दररोज व्यायाम करावा आणि सशक्त व्हावे. सशक्त भारत तयार करण्यासाठी नियमित सायकल चालवणे अत्यंत उपयुक्त असल्याचे श्री. पाटील यांनी उद्घाटनाच्या वेळी सांगितले. शारीरिक तंदुरुस्तीसाठीच्या व्यायामाचा भाग म्हणून दैनंदिन जीवनात सायकल चालवण्यासाठी आणि ते अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि प्रेरित करणे हा यामागचा उद्देश आहे. सर्वसामान्य नागरिकांनी सायकल चालवण्याचा अवलंब केल्यास कार्बन उत्सर्जन कमी होण्यासही मदत होईल. जागतिक सायकल दिन साजरा करण्याच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या जीवनात दररोज किमान ३० मिनिटे शारीरिक व्यायामाचा समावेश करण्याचा म्हणजेच “फिटनेस की डोस आधा घंटा रोज” हा संकल्प करण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. रत्नागिरीत अनेकांना सायकल चालविताना दररोज पाहतो. रत्नागिरीत सायकलसाठी चांगले वातावरण आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा युवा केंद्राचे रत्नागिरीचे समन्वयक मोहित कुमार सैनी उपस्थित होते. फेरी सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनीही हजेरी लावून सायकलस्वारांना शुभेच्छा दिल्या.

सायकल दिन उद्घाटन समारंभाचा व्हिडीओ

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply