मानसिक तणावाच्या आजच्या जगात योगाची प्रत्येकाला नितांत गरज : राष्ट्रीय आयुर्वेद गुरू वै. मुरलीधर प्रभुदेसाई

सावंतवाडी : आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त सावंतवाडी येथे २१ जून २०२२ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवी दिल्लीचे राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि सावंतवाडीतील सौ. माया चव्हाण यांचा योगसाधना वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून त्या विद्यापीठाने नियुक्त केलेले राष्ट्रीय आयुर्वेद गुरू वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई या वेळी त्यांचा वैद्य-परिवार आणि शिष्यांसह उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्याभारतीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजशेखर कार्लेकर, विद्याभारतीच्या कार्यकारिणी सदस्य डॉ. सौ. रश्मी कार्लेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (कार्यक्रमाचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

योगशास्त्राचे आद्य प्रणेते महर्षी पतंजली यांच्या प्रतिमा-पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रार्थना झाली. वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ‘भारताने जगाला खूप मौल्यवान देणग्या दिल्या आहेत. त्यात स्थापत्य, शिल्पकला आदींसह असंख्य गोष्टींचा समावेश आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास आयुर्वेद आणि योगशास्त्र ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. आयुर्वेद शारीरिक आरोग्याचा विचार करतो, तर योग त्याच्या जोडीने मानसिक संतुलन साधण्यासाठी मदत करतो. सध्याच्या जगात जवळपास प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या मानसिक तणावाखाली आहे. त्यामुळे आज योगाची खऱ्या अर्थाने प्रत्येकाला गरज आहे,’ असे प्रतिपादन वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई यांनी केले.

वैद्या सौ. उमा प्रभुदेसाई यांनी ‘आरोग्य संरक्षणासाठी दैनंदिन उपयोगी आसने आणि त्यांचे फायदे’ याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘आयुर्वेद आणि योग ही एकमेकांच्या हातात हात घालून आलेली आणि मोठी परंपरा असलेली शास्त्रं आहेत. यांना शास्त्रं म्हटलं जातं. कारण त्यांना वैज्ञानिक आधार आहे. शरीर आणि मनाचा संयोग करतो तो योग, असं योगाची व्याख्या सांगते. माणसाचं शरीर आणि मन एकमेकांशी जोडलेलं राहण्यासाठी, त्यांचं संतुलन साधलं जाण्यासाठी जी साधना करावी लागते, ती योगसाधना. योगसाधना कोणी कोणी करावी, हेही शास्त्रात सांगितलेलं आहे. युवकांनी आपला भविष्यकाळ सक्षम करण्यासाठी, वृद्धांनी आपलं वृद्धत्व लांबवण्यासाठी, अतिवृद्धांनी आपला वृद्धापकाळ सुखाचा जावा म्हणून आणि आजारी, तसंच दुर्बल असलेल्यांनीही आवश्यक असलेली बंधनं पाळून योगसाधना करावी, असं शास्त्र सांगतं. थोडक्यात, योगसाधना सर्वांनीच करावी, असं त्यात सुचवलेलं आहे,’ असे प्रतिपादन वैद्या सौ. उमा प्रभुदेसाई यांनी केले.

त्याच वेळी माया चव्हाण योगवर्गाच्या भगिनींनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यानंतर आभारप्रदर्शन आणि शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply