हठयोग प्रशिक्षणार्थी पाचवीतील शाल्व कारेकरची योगासन प्रात्यक्षिके लक्षवेधी

रत्नागिरी : आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने येथील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात पाचवीतील शाल्व कारेकरची योगासन प्रात्यक्षिके लक्षवेधी ठरली. तो पंजाबमध्ये हठयोगाचे प्रशिक्षण घेत आहे.

आगाशे विद्यामंदिरात आठवा जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चौथीमधील सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची योगासने सादर करून सर्वांची मने जिंकली. वज्रासन, ताडासन, वृक्षासन, गोमुखासन आदी प्रकारची योगासने त्यांनी सुरेख सादर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे योग जागतिक स्तरावर पोहोचला आणि त्यामुळेच जागतिक योग दिन २१ जून रोजी साजरा होऊ लागला. योग, प्राणायामामुळे आपण दिवसभर उत्साही, आनंदी राहतो, निरोगी राहतो. यामुळेच मी रोटरी क्लबचा अध्यक्ष असताना विविध ठिकाणी योग वर्ग सुरू केले होते. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात योग करायलाच हवा, असे आवाहन शाळा प्रबंधक विनायक हातखंबकर यांनी यावेळी केले.

मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांनी योग दिनाची पार्श्वभूमी आणि माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी नित्य नियमितपणे योग करावा, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना आयुष्यभर होणार आहे, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमात शिक्षिका सौ. स्नेहल कारेकर यांनी दररोज योग करा आणि त्यातून चंचल मन, शरीर व बुद्धीला एकत्र आणा, असे आवाहन केले. यावेळी चौथीच्या शिक्षिका सौ. प्रीती देवरूखकर, सौ. वैदेही भिंगारे, निशा घवाळी उपस्थित होत्या.

पंजाबमधील योगगुरु ललित शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हठयोगाचे प्रशिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवीतील शाल्व कारेकर याने विविध योगासनांची प्रात्यक्षिके दाखवली. याबद्दल त्याला भेटवस्तू देऊन शाळेतर्फे श्री. हातखंबकर यांनी सन्मानित केले.

आगाशे विद्यामंदिरात योगशिक्षिका स्वाती मलुष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना नियमित योगासनांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी नेहमी आनंदी व सकारात्मक असतात. सौ. देवरूखकर यांनी सूत्रसंचालन केले.

आगाशे विद्यामंदिरातील योग दिनाची छायाचित्रे

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply