आरोग्य आणि सक्षम आयुष्यासाठी योग आणि आयुर्वेदाला पर्याय नाही – संजय शिंदे

रत्नागिरी : उत्तम आरोग्य आणि सक्षम आयुष्यासाठी योग आणि आयुर्वेदाला पर्याय नाही, असे प्रतिपादन रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी व्यक्त केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी, नेहरू युवा केंद्र आणि जिल्हा प्रशासनातर्फे आज येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या बॅडमिंटन कोर्टवर आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. त्याच्या उद्घाटन समारंभात श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले, केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार नेहरू युवा केंद्राच्या विद्यमाने योग दिन साजरा होत आहे. योगामध्ये मोठी ताकद आहे. अलीकडेच जगभरात झालेल्या करोनावर कोणतेही औषध नव्हते. त्यात योगासने आणि अष्टांग आयुर्वेद या दोन गोष्टींना महत्त्व मिळाले. ज्यांनी योगाभ्यास केला आणि आयुर्वेदाचा वापर केला, योगसने चालू ठेवला, त्यांच्यापैकी ९० टक्के लोकांना करोना झाला नाही. काही जणांना करोना झाला तरी त्यांना फारसा त्रास झाला नाही. युवा पिढीने हे लक्षात ठेवले पाहिजे. योग आणि आयुर्वेद हा जीवनाचा भाग करावा, जेणेकरून भविष्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. मानसिक, शारीरिक आजार होणार नाहीत. आतापर्यंत करोना आपल्याला माहीत नव्हता. भविष्यात आणखी कोणते रोग निर्माण होतील, हे माहीत नाही. त्यांना सक्षमपणे सामोरे जायचे असेल, तर योग आणि आयुर्वेदाला पर्याय नाही.

नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी म्हणाले की, योगदिन जगात साजरा केला जात आहे. आजची प्रत्येकाची जीवनशैली धावपळीची झाली आहे. ताणतणाव वाढले आहेत. त्यावर योग उपयुक्त आहे. अनेक प्रकारची आयात-निर्यात चालते. पण योगासने ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. इंग्लंड, अमेरिकेत योग लोकप्रिय झाला आहे. स्वास्थ्यपूर्ण आणि आनंदी जीवनासाठी योगाचा दैनंदिन जीवनात वापर प्रत्येकाने करावा.

समारंभाचे सूत्रसंचालन योगशिक्षक राजेश आयरे यांनी केले. सूर्यनमस्कार म्हणजे विविध आसने, प्राणायाम आणि योगासनांचा तिहेरी संगम आहे. जलद गतीने सूर्यनमस्कार घातल्यास व्यायाम साधला साधला जातो.

उद्घाटन समारंभानंतर योगगीत सादर करण्यात आले. शिर्के प्रशालेच्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी योगाची आणि दहा आणि बारा आसनांच्या सूर्यनमस्कारंची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर झालेल्या योगाच्या प्रात्यक्षिकांमध्ये एनसीसी आणि इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविजय मुळ्ये यावेळी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी आभार मानले.

योग दिन कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ आणि प्रात्यक्षिके सोबतच्या व्हिडीओमध्ये

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply