कवितेमध्ये आशय आणि अभिव्यक्तीला महत्त्व : जयश्री बर्वे

रत्नागिरी : कवितेमध्ये आशयाइतकेच आणि अभिव्यक्तीला महत्त्व असते. ते दोन्ही परस्परपूरक आहेत. आशयाबरोबरच भाषा, शब्द आणि कल्पनासौंदर्य महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन निवृत्त प्राध्यापिका सौ. जयश्री बर्वे यांनी येथे केले.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे आज (दि. ६ ऑगस्ट) येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात “श्रावणधारा” या काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. दोन-तीन वर्षे कार्यक्रम होऊ न शकलेल्या कोमसापच्या रत्नागिरी शाखेने कविता वाचनाच्या कार्यक्रमातून पुन्हा सुरुवात केल्याबद्दल त्यांनी सुरुवातीलाच शाखेच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. कवितेविषयी बोलताना त्या पुढे म्हणाल्या, कलेच्या निर्मितीमागे कलावंताचे भावभावनांनी भरून राहिलेले मन असते. त्याच्या हातून कलानिर्मिती होते. आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी संस्कृत कवी पंडित विश्वनाथ, इंग्लिश कवी वर्ड्स्वर्थ, चित्रकार इंदरकुमार गुजराल, कवी केशवसुत, नारायण सुर्वे, वसंत बापट, मंगेश पाडगावकर यांच्या विविध कविता उद्धृत केल्या. त्या म्हणाल्या, एक कवी वेगवेगळ्या वेगवेगळ्या कविता लिहीत असतो. कारण कविता किंवा कोणतीही साहित्यकृती निर्माण करताना त्याच्या मनातील स्पंदनांबरोबरच आजूबाजूच्या परिस्थितीचाही त्याच्या मनावर परिणाम होत असतो. तोच त्याच्या साहित्यकृतीतून व्यक्त होत असतो. म्हणूनच आनंदीआनंद गडे कविता लिहिणारे बालकवी कोठून येते उदासीनता ही कविताही लिहितात. सौंदर्याची कविता लिहिणारे बा. सी. मर्ढेकर युद्धानंतरच्या परिस्थितीचे वर्णनही आपल्या कवितेतून करतात. आनंदयात्री मंगेश पाडगावकर यांनी उदासबोधही लिहिला आहे. तुकाराम महाराज, इंदिरा संत, वसंत बापट, कुसुमाग्रज अशा अनेक कवींच्या कवितांमध्ये असे वैविध्य दिसते.

कोमसाप रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षा सौ. तेजा मुळ्ये यांनी शाखेच्या नियोजित कार्यक्रमांविषयीची माहिती दिली. नव्या कार्यकारिणीने वर्षभरात विविध कार्यक्रम राबवण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार श्रावण महिन्यात श्रावणधारा या काव्यवाचन कार्यक्रम होत आहे. यापुढेही महिलांसाठी, मुलांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच ग्रामीण भागातही कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी कोमसाप रत्नागिरी शाखेच्या पुनरुज्जीवनाबद्दल समाधान व्यक्त केले. कोमसापचे महत्त्वाचे पाच कार्यक्रम शाखेने करावेत तसेच साहित्यविषयक इतरही कार्यक्रम वर्षभर करून कोकणात सुरू असलेल्या ६० शाखांमधून उत्कृष्ट शाखेचा पुरस्कारही मिळवावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमात २३ कवींनी आपल्या श्रावणमास आणि पावसाविषयीच्या कविता सादर केल्या. त्या कवींची नावे अशी – मुकुंद शेवडे, वैशाली हळबे, विजयानंद दामोदर जोशी, सौ. वृषाली टाकळे, सौ. काव्या रितेश पेडणेकर, विश्वनाथ तानाजी गावडे, प्रतीक गं. कळंबटे, सौ. अर्चना देवधर, सौ. मुग्धा संजय कुळ्ये, मनोज खानविलकर, सुयोग मारुती शितप, ज्ञानेश दिगंबर जोशी, अॅड. सूरज बने, दर्शन दिलीप ढेपसे, आशीष खेमा सावंत, सौ. कश्मिरा राजेश पालेकर, उमेश नामदेव मोहिते, ज्ञानेश्वर कृष्णा पाटील, सौ. समृद्धी समीर दामले, संजय बाळकृष्ण कुळ्ये, गुरुदेव सहदेव नांदगावकर, सौ. आकांक्षा भुर्के, अरुण मौर्य, धोपटकर.

सर्व कवितांना उत्स्फूर्त दाद मिळाली. एका कवीला एकच कविता सादर करायची संधी आणि नेटके नियोजन यामुळे कार्यक्रम सुटसुटीत झाला. ज्येष्ठ नागरिक आणि कवी प्रभाकर गणेश बोरकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सर्व सहभागी कवींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. आनंद शेलार यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाला शाखेचे उपाध्यक्ष दादा कदम, सचिव सुनील चव्हाण, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, कार्याध्यक्ष चंद्रमोहन देसाई आणि रत्नागिरी शाखेचे सदस्य उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply